अवैध शस्त्रासह शेतकरी तरुण अटकेत
By admin | Published: February 8, 2016 04:05 AM2016-02-08T04:05:37+5:302016-02-08T04:05:37+5:30
दुष्काळग्रस्त विदर्भातील बुलडाणा येथून अवैध शस्त्रविक्रीसाठी आलेल्या रामलाल खुदासिंग दुधवा (१९) या शेतकरी तरुणाला डोंगरी पोलिसांनी शनिवारी अटक केली.
मुंबई : दुष्काळग्रस्त विदर्भातील बुलडाणा येथून अवैध शस्त्रविक्रीसाठी आलेल्या रामलाल खुदासिंग दुधवा (१९) या शेतकरी तरुणाला डोंगरी पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तुलासह ७ काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
डोंगरी परिसरातील वाडी बंदर येथील मेनगेट हॉटेलजवळ एक जण संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती डोंगरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक विलास गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन तपास पथके वाडीबंदर परिसरात रवाना झाली. या पथकांनी सापळा रचून शनिवारी दुधवा याला अटक केली. त्याच्या अंगझडतीत गावठी पिस्तूल सापडले. पोलिसांच्या माहितीनुसार, मूळचा बुलडाणा येथील निमखेडचा रहिवासी असलेला दुधवा याचा शेतीचा व्यवसाय आहे. शेगावच्या तरुणाने हे पिस्तूल मुंबईत विकण्यास दिल्याचे त्याचे म्हणणे आहे.