योगी, तुमचे गुंड तुम्हीच सांभाळा - उद्धव ठाकरे
By Admin | Published: March 29, 2017 08:42 AM2017-03-29T08:42:03+5:302017-03-29T08:50:16+5:30
योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील गुंडांना सुधारा अन्यथा राज्यातून चालते व्हा, असा इशारा दिलाय. यावर सामना संपादकीयमधून टीका करण्यात आली आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याची सूत्रं हाती घेतल्यापासून धडाकेबाज निर्णय घेण्याचा सपाटाच लावला आहे. राज्यातील गुंडगिरी आणि गुन्हेगारीला चाप बसावा, म्हणून त्यांना गुंडांना सज्जड दम भरत सुधारणा कराव अन्यथा चालते व्हा, असा इशाराच दिला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या या विधानावर सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.
'गुंडांनी उत्तर प्रदेश सोडून जावे, योगींचे हे विधान देशाची चिंता वाढवणारे आहे. योगींच्या राज्यातील गुंडांनी उत्तर प्रदेश सोडून इतर प्रांतांत जाऊन जुनाच धंदा करायचे म्हटल्यावर संपूर्ण देशात अराजक माजेल', अशी भीती सामनातून व्यक्त करण्यात आली आहे.
यावर, तुमचे गुंड तुम्हीच सांभाळा असे सांगत उद्धव यांनी, 'राज्य त्यांनी करायचे व गुंडांना इतर प्रांतांनी पोसायचे हेच धोरण असेल तर ते गंभीर आणि देशाची चिंता वाढवणारं असल्याचं सामना संपादकीयमध्ये उल्लेख केला आहे.
काय आहे नेमके सामना संपादकीयमध्ये
कायद्याचे राज्य होईल काय?
योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यातील गुंडांना दम भरला आहे. गुंडांनी सुधारावे, नाहीतर उत्तर प्रदेश सोडून चालते व्हावे, असे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी जाहीर केले आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करावेच लागेल, पण गुंडांनी सुधारावे म्हणजे काय? उत्तर प्रदेश हे देशातील लोकसंख्या व भूगोलाच्या दृष्टीने बलाढ्य राज्य आहे. २२ कोटी इतकी प्रचंड लोकसंख्या आहे आणि तिथे बंदुका व दंडुक्यांचेच राज्य चालते. योगी आदित्यनाथ हे गोरखपूरचे सर्वेसर्वा असताना त्यांची खासगी सेना हा वादाचाच विषय ठरला होता. जाती व धर्मानुसार गुंडांच्या फौजा या राज्यात आहेत आणि त्यांच्याच जोरावर येथे राज्य केले जाते. भारतीय जनता पक्षाचे ३२५ आमदार निवडून आले आहेत. इतर पक्षांचेही सर्व मिळून शंभरच्या आसपास आमदार निवडून आले. त्यापैकी किती जण धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत? काळ्या पैशांच्या राशी मोजून निवडून यायचे व मग काळ्या पैशांच्या विरोधात बोंब मारायची, त्यातलाच हा प्रकार; पण गुंडांना कायद्याने मोडून काढायची गरज असते व सुधारण्यासाठीच त्यांना तुरुंगात पाठवायचे असते ही राजमान्य आणि लोकमान्य अशी पद्धत आहे. गुंडांनी आजपासून त्यांचे कामधंदे बंद करावेत, दहशतवादी व धर्मांधांनी यापुढे
मेलेल्या सापासारखे
पडून राहावे असे फर्मान सोडून कोणत्याही राज्यातील गुंडशाही थांबणार नाही. ‘‘नवे राज्य कायद्याचे राज्य आहे व कायदा मोडणा-यांची खैर नाही. नवे तुरुंग निर्माण करू, पण गुंडांचे कंबरडे मोडू,’’ असा दम नव्या मुख्यमंत्र्यांनी भरायला हवा. नवे राज्य आले म्हणून एकजात सर्व गुंड सूतकताईस बसणार नाहीत किंवा शरयूच्या तीरी भिक्षापात्रे घेऊन बसणार नाहीत. जयप्रकाश नारायण यांनी दरोडेखोरांचे मनपरिवर्तन करून त्यांना शस्स्त्र खाली टाकण्याची मोहीम राबवली होती. तशी काही योजना नवे मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत काय? उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले आहे की, गुंडांनी उत्तर प्रदेश सोडून जावे. त्यांचे हे विधान देशाची चिंता वाढविणारे आहे. योगींच्या राज्यातील गुंडांनी उत्तर प्रदेश सोडून इतर प्रांतांत जाऊन जुनाच धंदा करायचे म्हटल्यावर संपूर्ण देशात अराजक माजेल. मुंबई-दिल्लीसारखी शहरे हे भोग याआधीच भोगत आहेत, त्यात आणखी नवी भर कशाला! तुमचे गुंड तुम्हीच सांभाळा. त्यांना कायद्याने मोडून काढा नाहीतर त्यांचे मनपरिवर्तन करा. हा संपूर्णपणे त्या त्या राज्याचा प्रश्न आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने एका रात्रीत कत्तलखाने बंद झाले. पार्कात किंवा इतरत्र ‘मजनू’गिरी करणाऱयांविरोधात योगी सरकारने
विशेष पथके नेमून कारवाई
सुरू केली आहे. गोहत्या करणाऱयांचे हात-पाय तोडू अशी धमकी भाजप आमदारांनी दिलीच आहे. मग गुंडांच्याच बाबतीत इतका हळुवारपणा का? ‘‘गुंडगिरी कराल तर हातपाय तोडू, याद राखा!’’ असा जोरदार दम देऊन गुंडांची मस्ती व माज उतरवायला हवा होता. म्हणजे राज्य त्यांनी करायचे व गुंडांना इतर प्रांतांनी पोसायचे हेच धोरण असेल तर ते गंभीर आणि देशाची चिंता वाढविणारे आहे. ‘‘गुंडांनी चालते व्हावे!’’ असे योगीजी सांगत असताना तिकडे रविवारीच फतेपूर जिल्हा तुरुंगात दंगल उसळली व त्या संपूर्ण तुरुंगावर कैद्यांनी नियंत्रण मिळवले. जेलर व पोलिसांनी कैद्यांचा बेदम मार खाल्ला. म्हणजे तुरुंगातले गुंडही सुधारायला तयार नाहीत. हे चित्र बदलण्याची जबाबदारी नियतीने योगींवर टाकली आहे. कायद्याचे राज्य सर्वात जास्त कुठे असायला हवे ते फक्त योगींच्या उत्तर प्रदेशात. देशाचे गृहमंत्री व पंतप्रधान याच राज्याचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे येथे गुंडांवर वचक हवाच. हा वचक ठेवण्यासाठी योगींना कठोर व्हावे लागेल. गुंडांना त्यांच्याच राज्यात जेरबंद करावे. गुंडांना सुधारण्यासाठी त्यांना वाटल्यास अयोध्येच्या करसेवेस लावावे, पण उत्तर प्रदेश सोडून गुंडांनी इतर राज्यांत जाण्याचे फर्मान सोडून देशाच्या पोटात भीतीचा गोळा आणू नये. आम्ही समस्त देशवासीयांचीच भावना व्यक्त केली आहे. योगीजी भावना समजून घेतील!