वाद विकोपाला! स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून रविकांत तुपकर यांची हकालपट्टी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 09:17 PM2023-08-18T21:17:14+5:302023-08-18T21:18:49+5:30

रविकांत तुपकर यांनी मीडियातून जे आरोप केलेत तेच पत्रात आहे. तुपकरांनी ज्यांच्यावर आरोप केले ते राजू शेट्टी बैठकीला यायला तयार आहेत मग तुम्ही का टाळताय असा प्रश्न शिस्तपालन समितीने केला आहे.

Will Ravikant Tupkar be expelled from Swabhimani Farmers Association? | वाद विकोपाला! स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून रविकांत तुपकर यांची हकालपट्टी होणार?

वाद विकोपाला! स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून रविकांत तुपकर यांची हकालपट्टी होणार?

googlenewsNext

कोल्हापूर – गेल्या अनेक दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाला आव्हान दिल्यामुळे हा वाद निर्माण झाला. तुपकर आणि शेट्टी यांच्यातील वाद सुटावेत यासाठी शिस्तपालन समितीकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु रविकांत तुपकर यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची खंत संघटनेच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जालंधर पाटील यांनी व्यक्त केली आहे.

जालंधर पाटील म्हणाले की, रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्यावर आरोप केलेत. ८ ऑगस्टला शिस्तपालन समितीसमोर म्हणणं मांडावे असं तुपकरांना कळवले होते. या बैठकीला राजू शेट्टी उपस्थित होते. परंतु रविकांत तुपकर आले नाहीत. त्या बैठकीत शिस्तपालन समितीने निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु मी स्वत: या बैठकीत निर्णय घेऊ नये, आणखी ८ दिवसांचा कालावधी देऊ. १५ ऑगस्टपर्यंत तुपकरांनी बैठकीला येऊन त्यांनी जे आरोप केलेत त्याचा खुलासा द्यावा असं कळवले होते. पण १५ ऑगस्टला रात्री रविकांत तुपकर यांचे पत्र आले. मी शिस्तपालन समितीचा चेअरमन आहे. पत्र आल्यानंतर परत घाईघाईने निर्णय घेणे चुकीचे होईल असं आम्हाला वाटले. तुपकरांच्या आरोपावर राजू शेट्टी यांनी १९ ऑगस्टपर्यंत खुलासा करावा असं शिस्तपालन समितीने सांगितले आहे.

तसेच सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी झाली तेव्हा शिस्तपालन समितीचे सदस्य रविकांत तुपकर होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत लोकशाही वापरली जाते. शिस्तपालन समितीच्या बैठकीत रविकांत तुपकर यांनी यायला हवे होते. परंतु ते संघटनेतील वाद राजकीय करायला निघालेत असं वाटते. बैठकीत चर्चा करून संघटनेत एकोपा व्हायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. संघटनेच्या दृष्टीने चांगला संदेश कार्यकर्त्यांना जायला हवं. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद तुपकरांना दिले होते. सदाभाऊंना विधान परिषद दिली होती. ज्यांना पदे दिली तेच आरोप करतायेत असंही जालंधर पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान, आरोप एकांगीने असून चालणार नाही. राजू शेट्टींच्या उत्तराने तुम्ही समाधानी झाला असता. मीडियात फक्त आरोप करतात. फक्त टीआरपीसाठी ४ दिवस माध्यमात बातमी लागेल परंतु त्यानंतर टीआरपी मागे पडेल. आतापर्यंत दोन निवडणुकांमध्ये रविकांत तुपकर हे त्यांची ताकद दाखवू शकले नाहीत त्यामुळे नेमका त्यांच्यामागे जनाधार किती याचा अंदाज आम्ही कसा लावणार. अजूनही आम्ही अतातायीपणा केला नाही. प्रक्षोभक विधाने केली नाही. तुपकरांनी बैठकीला यावं, ते आले नाहीत तर शिस्तपालन समितीला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल असंही जालंधर पाटील यांनी सांगितले.

चळवळीतील एकसंघपणा कायम ठेवावा

निर्णय प्रक्रियेत आमची माणसे हवी यासाठी संघटनेने आंदोलन केली. प्रत्येक गोष्ट मलाच पाहिजे असं होऊ नये. आंदोलनात कार्यकर्त्यांनी लाठीकाठ्या खाल्ल्या. रविकांत तुपकर यांनी मीडियातून जे आरोप केलेत तेच पत्रात आहे. तुपकरांनी ज्यांच्यावर आरोप केले ते राजू शेट्टी बैठकीला यायला तयार आहेत मग तुम्ही का टाळताय. आम्ही संघटना एकत्र राहावी यासाठी प्रयत्नशील आहोत. राजकारण बाजूला ठेऊन चळवळीतील एकसंघपणा कायम ठेवावा, त्याच्याशी बांधील राहावे असं आवाहनही शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जालंधर पाटील यांनी केले आहे.

Web Title: Will Ravikant Tupkar be expelled from Swabhimani Farmers Association?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.