आधी शिवसेना कोणाची? व्हीप कोणाचा? नंतर आमदार अपात्रतेवर निकाल; वाचनास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 05:29 PM2024-01-10T17:29:44+5:302024-01-10T17:30:11+5:30
नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालय, दोन्ही बाजुचे वकील आणि विधानसभा अधिकाऱ्यांचे आभार मानले.
राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला आमदार अपात्रतेवरील निकाल वाचनाला थोड्याच वेळापूर्वी सुरुवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याच्या वाचनास सुरुवात करताना निकालाचे स्वरुप कसे असेल यावर माहिती दिली आहे. सुरुवातीला शिवसेना कोणाची? व्हीप कोणाचा यावर निकाल देण्यात येणार असून नंतर आमदार अपात्रतेवर निकाल जाहीर करण्यात येईल असे नार्वेकर म्हणाले.
नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालय, दोन्ही बाजुचे वकील आणि विधानसभा अधिकाऱ्यांचे आभार मानले. आज सायंकाळी साडेचार वाजता निकाल वाचन केले जाणार होते. साऱ्या राज्याच्या नजरा निकालाकडे लागल्या होत्या. परंतु पाऊन तास उशिराने अध्यक्षांनी निकाल देण्यास सुरुवात केली. तसेच निकालाची प्रत सर्वांना दिली जाणार असल्याचेही नार्वेकरांनी स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाकडे राजकीय पक्षांसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण आजच्या निकालावर महाराष्ट्रातील पुढची राजकीय गणिते ठरणार आहेत. या निकालाचे लाईव्ह प्रेक्षपण सर्वसामान्य प्रेक्षकांनाही पाहता येणार आहे. विधिमंडळाने त्याची सुविधा सर्वांना उपलब्ध करून दिली आहे. तत्पूर्वी निकालाआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे प्रतिदावे केले जात आहे. हा निकाल मॅच फिक्सिंग असेल असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
त्याचसोबत आमदार नितीन देशमुखांनी तर राहुल नार्वेकरांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्याकडून बहुमत आमच्या बाजूने आहे. त्यामुळे आमचा विजय होईल असा विश्वास वर्तवला आहे. त्यामुळे निकाल नेमका काय लागणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.