संक्रांतीत आनंदाचं वाण विधवा, गोरगरीब, पीडित मैत्रिणींनाही देऊ या की...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 05:18 PM2019-01-15T17:18:34+5:302019-01-15T17:19:34+5:30

आपले सणवार रीतीरिवाज जपत असताना त्यातील अन्यायकारक गोष्टी सोडून देणं काळाची गरज आहे. विविध स्तरांतील महिलांच्या नजरेतून हा सण नेमका कसा आहे?, कसा साजरा करावा?, यावर हेलन ओंबासे यांनी संक्रांतीनिमित्त मांडलेले विचार...

we should change the mindset of society while celebrating makar sankranti | संक्रांतीत आनंदाचं वाण विधवा, गोरगरीब, पीडित मैत्रिणींनाही देऊ या की...

संक्रांतीत आनंदाचं वाण विधवा, गोरगरीब, पीडित मैत्रिणींनाही देऊ या की...

Next

- हेलन ओंबासे

आपले सणवार रीतीरिवाज जपत असताना त्यातील अन्यायकारक गोष्टी सोडून देणं काळाची गरज आहे. विविध स्तरांतील महिलांच्या नजरेतून हा सण नेमका कसा आहे?, कसा साजरा करावा?, यावर हेलन ओंबासे यांनी संक्रांतीनिमित्त मांडलेले विचार...

"यंदाची संक्रांत सवितावर आली म्हणायची??"... "का काय झालं? मारलं वाटतं राती भिमानं. लुगडं आणि डोरलं मागितलं म्हणून.."
संक्रांतीच्या आधीची घराघरातून होणारी धुसफूस कानावर यायची. साड्या जोडवी डोरलं अशी नवीन स्वप्नं रंगवित ही संक्रांत धुमाकूळ घालीतच येते बायकांच्या आयुष्यात. गावातील सोनार आणि टेलर लोकांना तर या काळात डोकं वर काढायला वेळ नसतो. आजही सणासाठी म्हणून साड्या, जोडवी, डोरली, पैंजण अशा सौभाग्य अलंकारांसाठी बायका आपल्या नवऱ्याशी भांडतात आणि मारही खातात. मग संक्रांत चांगली की वाईट हा पडलेला प्रश्न दुर्लक्षित करून आम्ही नवीन फ्रॉक, परकर पोलकं, घालून उगीच इकडून तिकडून मिरवत असे. नटलेल्या बायका, नववधूच्या साड्या, दागिने आणि त्यांच्या हालचाली टिपण्यातच आम्ही रंगून जात असू.

संक्रांतीला काळ्या मातीतील सोनं म्हणजे ऊस, बोरं, हरबरा, गव्हाच्या लोंब्या, ज्वारीची कणसं यानी भरलेले सुगड पुजून देवाला अर्पण करतात. वाडी वस्तीवरून बायका ओवसायला गावातल्या देवाला येतात. आमच्या वाड्यात पाय ठेवायला जागा नसायची संक्रांतीच्या दिवशी. आजीही मोठं घमेलं भरून वाण करून ठेवायची. कुणाला कमी पडू नये म्हणून. काही ठिकाणी विडा किंवा दोरे घेण्याची प्रथा आहे. "सीताचा ओवसा आला नगरात, घ्या पदरात. घेते राणी कुणाची?" असा प्रश्न विडा देणारी विचारते. मग घेणारीही आपल्या नवऱ्याचं लाजून नाव घेत विडा घेते. या संक्रांतीत मारुतीसारखा ब्रह्मचारी देवदेखील कुंकवाने लालेलाल होतो.

संक्रांतीचा सण देशभर तसेच नेपाळमध्येही काही ठिकाणी 14 किंवा 15 जानेवारीला साजरा करतात. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो व उत्तरायणाला प्रारंभ होतो. दिवस मोठा होत जातो. महाराष्ट्रात मकर संक्रात तीन दिवस साजरी करतात. पहिला दिवस भोगीचा, दुसरा संक्रांतीचा आणि तिसरा किंक्रातीचा. हाच सण दाक्षिणात्य मंडळी पोंगल तर उत्तरेकडील लोक लोहडी म्हणून साजरा करतात.

संक्रांतीच्या आख्यायिका  
संक्रांतीच्या अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. त्रासदायक संक्रासूर राक्षसाचा वध करण्यासाठी देवीने याच दिवशी संक्रांतीचे रूप घेतले व वध केला म्हणून संक्रांत साजरी करतात, अशी एक अख्यायिका आहे. सूर्यदेव याच दिवशी आपला पुत्र शनीदेवाला भेटायला गेला. शनी मकर राशीचा स्वामी म्हणून या सणाला मकरसंक्रांत नाव पडलं. गंगा भगीरथाच्या मागोमाग पृथ्वीवर आली आणि समुद्राला मिळाली, म्हणून या दिवशी गंगेत स्नान करण्याला विशेष महत्व आहे. थंडीत येणाऱ्या या सणात तीळ आणि गूळ व त्यापासून बनवलेले पदार्थ एकमेकांना देऊन, गोड बोलण्याचं वचन दिलं घेतलं जातं.

संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत बऱ्याच ठिकणी हळदी कुंकवाचे छोटे मोठे कार्यक्रम ठेवले जातात. तीळगूळ आणि वाण म्हणून वस्तू दान केल्या जातात. नटून थटून मिरवायचं, भेटायचं, बोलायचं, हसायचं, व्यक्त व्हायचं याशिवाय सण तो कसला? पण काही ठिकाणी एकमेकींशी स्पर्धा करत या हळदी कुंकवाचा कार्यक्रम, खाणेपिणे, डेकोरेशन, आणि वाण देणे असा खर्च लाख ते दीड लाख रुपयांपर्यंत गेलेला पाहिलाय मी. आणि हा नक्कीच अतिरेक वाटतो. शिवाय सवाष्णं/ सौभाग्यवती बायकांनी मिरवण्याचा हा सण आहे या विचारधारेमुळे विधवा स्रिया एका विचित्र मनस्तापातून जाताना दिसतात. कमी वयात विधवा होणाऱ्या स्त्रिया सगळी जबाबदारी खांद्यावर घेऊन उभं राहतात, लढतात. पण केवळ सवाष्णं नाही म्हणून त्यांचा समाजाकडून जो मानसिक छळ होतो त्यामुळे मात्र त्या कोलमडून जातात. एका विधवा मैत्रिणीने मुलाचा संभाळ करीत नोकरी करून घर बांधलं. पण पूजेसाठी सवाष्ण बायकांना बोलावता येईना की हळदीकुंकू देखील देता येईना. मग तिच्या मैत्रिणींनी हट्टाने पूजेसाठी जाऊन तिच्याकडूनच हळदी कुंकू लावून घेतलं आणि तिला लावलंही.

आपले सणवार रीतीरिवाज जपत असताना त्यातील अन्यायकारक गोष्टी सोडून देणं काळाची गरज आहे. आपणही आपल्या थकलेल्या, दुखी, गोरगरीब सवाष्ण आणि,विधवा मैत्रिणींना या सणात, आपल्या आनंदात सहभागी करून घेण्याचा संकल्प करू या.

Web Title: we should change the mindset of society while celebrating makar sankranti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.