दीडशे कोटींचा चिरेखाण घोटाळा, तत्कालीन जिल्हाधिका-यांपासून तलाठी सामील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 07:27 PM2017-11-03T19:27:13+5:302017-11-03T19:28:22+5:30

सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा येथे असलेल्या उत्तम स्टील कंपनीने दहा वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली आहे.

Twenty-crores crores scam, the talukas from the then district collectors | दीडशे कोटींचा चिरेखाण घोटाळा, तत्कालीन जिल्हाधिका-यांपासून तलाठी सामील

दीडशे कोटींचा चिरेखाण घोटाळा, तत्कालीन जिल्हाधिका-यांपासून तलाठी सामील

Next

सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा येथे असलेल्या उत्तम स्टील कंपनीने दहा वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली आहे. या जमिनीत कंपनीच्या आशीवार्दाने अनधिकृतपणे दगड खाण व्यवसाय सुरू आहे. या चिरेखाण व्यवसायाचे हप्ते तत्कालीन जिल्हाधिका-यांपासून तलाठ्यांपर्यंत या सर्वांनाच मिळत असल्याने या खाणकामाचा कोणताही महसूल सरकार दरबारी भरण्यात आला नाही.

कंपनीच्या कृपेने या दोन हजार एकर जमिनीत तब्बल दीडशे कोटींचा खाण घोटाळा झाला आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी सातार्डा येथील जमीन मालक गोविंद प्रभू यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. ते सावंतवाडीत बोलत होते. प्रशासनाने न्याय दिला नाही, तर उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.

सातार्डा येथे गेल्या 20 ते 25 वर्षांत तीन कंपन्या आल्या होत्या. यात प्रथम टाटा मॅटेलिक, नंतर उषा इस्पात व आता उत्तम स्टील या तीनही कंपन्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने हजारो एकर जमिनी सातार्डा व सातोसे परिसरात खरेदी केल्या आहेत. यातील उषा इस्पात कंपनीने खरेदी केलेली जमीन लिलाव पद्धतीने उत्तम स्टील कंपनीने 2007पासून खरेदी केली आहे. आतापर्यंत या कंपनीने अडीच हजार एकरच्या घरात जमीन खरेदी केली असल्याचे प्रभू यांनी सांगितले आहे. या कंपनीने खरेदी केलेल्या जमिनीत प्रभू कुटुंबीयांची तब्बल दीड हजार एकर एवढी जमीन आहे. पण या जमिनीतील बहुतांशी मोबदला आम्हाला अद्याप मिळाला नाही.

या कंपनीने जर सर्व जमीन खरेदी केली आहे तर त्या जमिनीत दगड खाण उत्खनन कसे ? त्याची परवानगी कोणी घेतली आहे का ? आतापर्यंत लाखो टन दगड काढण्यात आला, मात्र शासनाकडे एक रूपयाही महसूल भरला नाही किंवा याची कोणतीही नोंद प्रशासनाकडे नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे हा सर्व पैसा कोणाच्या खिशात गेला याची चौकशी झाली पाहिजे. मी अनेक वेळा सरकार दरबारी अर्ज केला. सध्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे तीन वेळा गेलो. त्यांना सर्व हकिगत सांगितली. मात्र त्यांनी या प्रकरणाची कोणतीही दखल घेतली नाही.

मुख्यमंत्र्यांनी सांगूनही प्रशासन ऐकत नाही. खाणीची मोजमापे योग्य प्रकारे घेणे गरजेचे होते. पण तशी न घेतल्याने दंड कमी झाला आहे. प्रशासनाने पुन्हा मोजमाप केले नाही, तर प्रसंगी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून नंतरची जबाबदारी प्रशासनाची राहणार आहे, असेही प्रभू यांनी सांगितले आहे.

आपले सरकार पोर्टलकडून दखल
त्यामुळे हा सर्व प्रकार आपले सरकार या वेब पोर्टलवर टाकला. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि मला मुंबई येथे बोलावले. तेथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझा प्रश्न ऐकून घेतला व चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व यंत्रणेची पळापळ झाली. सरकारी यंत्रणेने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे उत्खननाचे मोजमाप केले, पण मोजमापे चुकीच्या पद्धतीने घेतली आहेत. ज्या ठिकाणी दीडशे कोटी रुपयांचा दंड झाला पाहिजे तेथे अवघा सहा कोटींचा दंड करण्यात आला आहे, असा आरोप प्रभू यांनी केला आहे.

काही स्थानिक राजकीय पुढारी सामील
हे प्रकार २००७ पासून सुरू आहेत. त्यामुळे या दहा वर्षांच्या काळात असलेले जिल्हाधिकारी तसेच प्रांताधिकारी व तहसीलदार हे सर्व यात दोषी असून कंपनीचे अधिकारीही यात सहभागी आहेत. त्यांनाही खाण व्यावसायिकांनी पैसे दिले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारणाची सखोल चौकशी तेवढीच गरजेची आहे. आमचा कंपनीला विरोध नाही; पण चुकीच्या पद्धतीने कंपनीच्या नावावर सरकारच्या महसूलची लूट सुरू आहे. हे आम्हाला सहन होणारे नाही. यात काही स्थानिक राजकीय पुढारी असून त्यांच्याही चिरे खाणी असल्याचे प्रभू यांनी सांगितले.

उत्तम स्टील कंपनी गाशा गंडाळून पळून जाण्याच्या तयारीत
सातार्डा येथील उत्तम स्टील कंपनी अगोदरच्या कंपनीप्रमाणे गाशा गुंडाळून जाण्याच्या तयारीत आहे. ही कंपनी जमिनी खरेदी केल्याच्या नावाखाली सरकारकडून अनुदान घेणार आहे आणि नंतर गाशा गुंडाळून पळून जाणार आहे. यापूर्वीच्या कंपन्यांनीही असाच प्रकार केला आहे. तसाच प्रकार ही कंपनी करणार आहे, असे मत गोविंद प्रभू यांनी मांडले आहे.

चिरेखाणच्या दगडातून कंपनीच्या भोवताली भिंत
सातार्डा येथील उत्तम स्टील कंपनीने जी कंपनीच्या भोवती भिंत उभारली आहे, त्याचा सर्व दगड याच ठिकाणचा आहे. त्याचा कोणतीही महसूल भरण्यात आला नाही. मग हा एवढा दगड आला कोठून याची तरी चौकशी करा, अशी मागणी प्रभू यांनी केली. आतापर्यंत अधिका-यांनीच यातून कोट्यवधी रूपयांची वरकमाई केली आहे. कंपनीचे अधिकारीही या सर्व प्रकारात सामील असून, आपण त्यातले नाही असा आव आणत आहेत.

Web Title: Twenty-crores crores scam, the talukas from the then district collectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.