ठाणे, दि. 12  - ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. कसारा रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे इगतपुरीच्या दिशेने जाणा-या वाहतुकीवर परिणाम झाला असून आसनगाव- कसारा मार्ग पूर्णतः ठप्प झाला आहे. या बिघाडामुळे संतप्त झालेेले अखेर उंबरमाली स्टेशनदरम्यान लोकलमधून ट्रॅकवर उतरले व अंधारातच पुढील दिशेनं पायी जाऊ लागले. 

हार्बर रेल्वेही झाली होती विस्कळीत
दरम्यान, शनिवारी सकाळी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. टिळकनगर-चेंबूर स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. या बिघाडामुळे हार्बर रेल्वेचं वेळापत्रक बिघडले होते. रेल्वे रुळाला तडा गेला असल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी वाहतूकही विस्कळीत झाली होती. परिणामी लोकल जवळपास 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत होत्या. सकाळच्या वेळस हा बिघाड झाल्याने मुंबईच्या दिशेने येणा-या चाकरमानी पुरते हैराण झाले होते.