स्वाईन फ्ल्यू रुग्णांवर खासगी रुग्णालयांनी आरोग्य विभागाच्या निर्देशांनुसार उपचार करावेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 03:40 PM2018-09-27T15:40:50+5:302018-09-27T15:41:57+5:30

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तातडीने घेतली बैठक

Swine flu patients should be treated at private hospitals according to the Health Department | स्वाईन फ्ल्यू रुग्णांवर खासगी रुग्णालयांनी आरोग्य विभागाच्या निर्देशांनुसार उपचार करावेत

स्वाईन फ्ल्यू रुग्णांवर खासगी रुग्णालयांनी आरोग्य विभागाच्या निर्देशांनुसार उपचार करावेत

Next

मुंबई : राज्यात स्वाईन फ्ल्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज मंत्रालयात राज्याच्या साथरोग नियंत्रण समितीची तातडीने बैठक घेतली. स्वाईन फ्ल्यूच्या संशयित रुग्णांवर उपचारात विलंब होत असल्याने मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील खासगी डॉक्टरांनी तापाच्या रुग्णांना औषधोपचारानंतर 24 तासात ताप कमी न झाल्यास तातडीने ऑसेलटॅमीवीर गोळ्या देण्यात याव्यात, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी आज केले.

गेल्या दोन महिन्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. पुणे, नाशिक विभागात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. राज्यात व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांवर नेमके काय उपचार करावे याबाबत आरोग्य विभागाकडून खासगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी प्रोटकॉल तयार करण्यात येत आहे. त्याचा अवलंब खासगी व्यावसायिकांनी करावा, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.

यावेळी आरोग्यमंत्र्यांनी स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, आदी साथीच्या आजारांचा आढावा घेतला. राज्यात सध्या 892 स्वाईन फ्लू चे रुग्ण आहेत. 88 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात नाशिक व पुणे विभागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. 1 जानेवारी ते 25 सप्टेंबर या कालावधीत 15 लाख 61 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 23 हजार 905 संशयित रुग्णांना ऑसेलटॅमीवीर गोळ्या देण्यात आल्या आहेत. 892 बाधित रुग्णांपैकी रुग्णालयात 337 रुग्णांवर उपचार सुरु असून 463 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे महापालिका क्षेत्रात 44 तर नागपूर येथे तीन रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. राज्यात नाशिक विभागात 26, पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात 18, अहमदनगर 8, पुणे मनपा क्षेत्रात 7, सातारा व ग्रामीण क्षेत्रात प्रत्येकी 6, सोलापूर 3, अकोला, नागपूर, चंद्रपूर, जळगाव प्रत्येकी 2, कोल्हापूर, वाशिम, उस्मानाबाद, बुलढाणा आणि मीर भाईंदर येथे प्रत्येकी एक अशा एकूण 87 रुग्णांचा मृत्यू झाला असून इतर राज्यातील एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

स्वाईन फ्लूचा प्रार्दुभाव मधल्या वयोगटातील व्यक्तींना जाणवत आहे. स्वाईन फ्लूचा व्हायरसमध्ये बदल झाला नसून त्यावरील उपचारात होत असलेल्या विलंबामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाल्याचा निष्कर्ष डेथ ऑडिट समितीने काढला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा या भागात ऑसेलटॅमीवीर गोळ्याची उपलब्धता सर्व औषध दुकानांमध्ये व्हावी तसेच या दुकानांमधून किती प्रमाणावर या गोळ्यांची विक्री झाली या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाने अहवाल देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी निर्देश दिले.

राज्यातील खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांनी सर्दी, तापाच्या रुग्णांवर उपचार केल्यानंतर एका दिवसात लक्षणे कमी झाली नाहीत तर अशा रुग्णांवर तातडीने ऑसेलटॅमीवीर गोळी देण्यात यावी. यामध्ये कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा करू नये, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. राज्यातील सर्वच मेडीकल स्टेअर्समध्ये ऑसेलटॅमीवीरच्या गोळ्यांची उपलब्धता असण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

स्वाईन फ्ल्यूच्या ज्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत त्या त्या महापालिका क्षेत्रातील आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यावर सनियंत्रण ठेवावे. या आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी महापालिका आयुक्तांनी आठवड्यातून एकदा आढावा बैठक घ्यावी, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात 1 लाख 28 हजार व्यक्तींना स्वाईन फ्लू प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले असून रुग्णांचे नियमित सर्वेक्षण केले जात आहे.

Web Title: Swine flu patients should be treated at private hospitals according to the Health Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.