बालेवाडीतील क्रीडासंकुल लवकरच स्वायत्त
By Admin | Updated: April 7, 2017 05:53 IST2017-04-07T05:53:16+5:302017-04-07T05:53:16+5:30
म्हाळुंगे-बालेवाडी (पुणे) येथे शिवछत्रपती क्रीडापीठाला यशदा व पोलीस अकादमीच्या धर्तीवर जून २०१७पर्यंत स्वायत्तता देण्यात येईल

बालेवाडीतील क्रीडासंकुल लवकरच स्वायत्त
मुंबई : म्हाळुंगे-बालेवाडी (पुणे) येथे शिवछत्रपती क्रीडापीठाला यशदा व पोलीस अकादमीच्या धर्तीवर जून २०१७पर्यंत स्वायत्तता देण्यात येईल, अशी माहिती क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दिली.
क्रीडा विभागासाठी सनदी लेखापालाची नियुक्ती केली असून, दरवर्षी जमा-खर्चाची तपासणी केली जाते. क्रीडाक्षेत्र व क्रीडापटूंना न्याय देण्यासाठी या क्रीडापीठाला स्वायत्तता देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. विवाह सोहळ्यांसाठी क्रीडा संकुलाची जागा देण्यात येणार नाही. या क्रीडापीठामध्ये अनेक वर्षे एकाच पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असून, ते बदलीच्या जागी हजर न झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही तावडे यांनी सांगितले. मेधा कुलकर्णी यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
सात एमआयडीसींमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्र
राज्यातील सात औद्योगिक विकास महामंडळांच्या ठिकाणी सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालविण्यासाठी देण्यात आले असून, भविष्यात औद्योगिक प्रदूषणाच्या तक्रारी आल्यास या औद्योगिक विकास महामंडळांवर कारवाई करण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत सांगितले.
डॉ. मिलिंद माने यांनी बुटीबोरी येथील इंडोरामा पॉवर प्लांट व शिल्पा रोलिंग मिलमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या कंपन्यांद्वारे प्रक्रिया केंद्र सुरू नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही कदम यांनी या वेळी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
अन्न व औषधी कायद्यात आमूलाग्र बदल करणार
अन्न व औषध प्रशासन कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करून बनावट सौंदर्य प्रसाधने व औषध कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. यासंदर्भातील कायदा केंद्र शासनाचा असून, त्यात आमूलाग्र बदल आवश्यक आहे.
त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने आवश्यक ती पावले उचलली असून, यासंदर्भातील गुन्हा अजामीनपात्र होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे अन्न व प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.
सदस्य योगेश सागर यांनी ठाणे आणि भिवंडी येथे अन्न व औषध प्रशासनाने औषधांचा साठा जप्त केल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. चर्चेत सदस्य राजेंद्र पटणी, हरीश पिंपळे यांनी भाग घेतला.
पाड्याला मिळाला गावाचा दर्जा
चोपडा तालुक्यातील उत्तमनगर पाड्याला गावाचा दर्जा देण्यासाठी ग्रामविकास वने व महसूल व पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची बैठक घेण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
धान साठवणुकीसाठी आदिवासी भागात गोदामे
राज्यातील आदिवासी भागात धान साठवणुकीसाठी पीपीपी तत्त्वावरील गोदामे बांधण्यात येतील, असे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. सरदार तारासिंह यांनी धान खरेदी केंद्रांतर्गत खरेदी केलेले धान मिल मालक उचलत नसल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
शाळांचे बांधकाम १५ जूनपूर्वी
लातूर जिल्ह्यातील मोटेगाव व सत्तरधरवाडी या दोन्ही गावांतल्या शाळा १५ जूनपूर्वी पूर्णपणे बांधण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. योगेश सागर यांनी मोटेगाव सत्तरधरवाडी येथील जि. प. शाळा इमारतींच्या झालेल्या दुरवस्थेबद्दल प्रश्न विचारला होता.