म्हातारपणी घटस्फोटाची आस! चळ, खुळ की गरज?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 06:00 AM2019-04-11T06:00:00+5:302019-04-11T06:00:05+5:30

दर महिन्याला किमान दोन ते तीन ज्येष्ठ जोडपी घटस्फोट मिळण्याकरिता कोर्टाची पायरी चढू लागली आहेत....

senior citizens divorce ! Need for trouble, openness? | म्हातारपणी घटस्फोटाची आस! चळ, खुळ की गरज?

म्हातारपणी घटस्फोटाची आस! चळ, खुळ की गरज?

Next
ठळक मुद्दे‘आजवर खूप सोसलं, आता नाही’ ही भावना पैसाही ठरतोय महत्वाचा

- युगंधर ताजणे 
पुणे  : गोड गुलाबीचा पस्तीस-चाळीस  वर्षांचा संसार झाल्यावर उताराला लागलेल्या गाडीला अचानक खीळ बसते. एवढ्या वर्षांचा संसाराची परिणिती थेट घटस्फोटात होते. आजवर कुठलेही निर्णय घेण्याचे अधिकार स्वातंत्र्य नसल्याचा शोध ‘तिला’ लागतो.  ‘त्याच्या’कडून झालेल्या अन्याय-अत्याचाराला वाचा फुटते. कधी ‘त्याला’ वाटते की आजवर खूप सोसले आता नको. सगळ्या बेड्या तोडून चक्क म्हातारपणात जोडीदार बदलण्याची लहर ज्येष्ठांना स्वस्थ बसू देत नसल्याचा कल अलिकडे वाढला आहे. दिसून येत  आहे. कुटूंब न्यायालयातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या वाढलेल्या घटस्फोटाच्या प्रमाणावरुन हे स्पष्ट होत आहे. 
दर महिन्याला किमान दोन ते तीन ज्येष्ठ जोडपी घटस्फोट मिळण्याकरिता कोर्टाची पायरी चढू लागली आहेत. वय वर्षे 60 ते 75 च्या दरम्यानची जोडपी परस्पर संमतीने काडीमोड घेत आहेत. ज्येष्ठांमध्ये घटस्फोट घेण्याची टक्केवारी 20 ते 25 टक्के असल्याचे पुणे फँमिली कोर्ट लॉयर्स असोशिएशनच्या अध्यक्ष अ‍ॅड. वैशाली चांदणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आर्थिक स्थैर्य नसणे, सहवास न लाभणे, एकमेकांचा आधार नसणे, काळजी घेणारे कुणी नसणे ही ज्येष्ठांच्या घटस्फोटामागची प्रमुख कारणे आहेत. 
 ज्येष्ठ व्यक्ती हल्लीच्या चौकौनी घरांमध्ये अडगळीच्या, अडचणीच्या ठरू लागल्या आहेत. गरजेइतका पैसा पुरवला की आपले काम झाले ही भावना मुलांबरोबरच, नव-यामध्येही बळावताना दिसत आहे. अशावेळी संबंधित ज्येष्ठ पुरुष व महिला हे आर्थिक संरक्षणाकरिता घटस्फोट मागतात. उच्चशिक्षित कुटूंबातील ज्येष्ठ जोडप्यांची संख्या यात लक्षणीय आहे. अनेकदा या निर्णयाला मुले, सुनांची संमती असल्याचे दिसले आहे. ज्या व्यक्तीबरोबर 25-30 वर्ष संसार केला तो केवळ तडजोडीपुरता असल्याने आता ते नाते बदलण्याची इच्छा ज्येष्ठ महिला व पुरुषांना होते, असे अ‍ॅड. चांदणे म्हणाल्या. 

* ज्येष्ठांच्या घटस्फोट कशामुळे? 

- गेल्या अनेक वर्षांपासून नव-याचा त्रास सहन करणा-यांना स्वत:च्या अस्तित्वाचा प्रश्न पडू लागल्याने ज्येष्ठांमध्ये घटस्फोटाचे प्रश्न निर्माण होत आहेत. आपण त्रास सहन का करायचा असा प्रश्न पडू लागल्यानंतर त्याचे उत्तर घटस्फोटात शोधले जाते. 
- कायद्याचा दुरुपयोग करुन पुरुषांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न महिलांकडून होतो. पुरुषांनी विश्वासाने महिलांच्या नावावर केलेल्या मालमत्तेतून त्यांना हद्द्पार केल्याच्या घटना आढळतात. त्यामुळे पुरुष घटस्फोटासाठी पुढे येतात.  
- उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयांमध्ये ज्येष्ठांच्या घटस्फोटांचे प्रमाण लक्षणीय आहे. सुरुवातीच्या काळात निर्णय स्वातंत्र्य नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ महिलांवर येते. त्यामुळे परिस्थितीत सुधारताच वेगळे पाऊ ल उचलण्याचा निर्णय घेतला जातो. 

* ‘‘आर्थिक स्थैर्य, वेगळे घर करुन राहण्याची इच्छा यामुळे म्हातारपणात घटस्फोट होतात. दोघांमधील वैचारिक मतभेद हे प्रमुख कारण आहे. आर्थिक क्षमता नसल्याने ज्येष्ठांमध्ये वादाला सुरुवात होते. मुलं स्थिरसावर होईपर्यंत महिला समजुतीने घेतात. मात्र त्यानंतर नव-याच्या आर्थिक मिळकतीत आपला सहभाग असला पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असते.’’ - अ‍ॅड. प्रतिभा घोरपडे 

* ‘‘ज्येष्ठ नागरिकांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण म्हणावे इतक्या मोठ्या स्वरुपात नाही. उतरत्या वयात त्यांना घटस्फोट घ्यावेसे वाटतात याचे मुख्य कारण म्हणजे एकमेकांचे स्वभाव. पूर्वीच्या काळी आई-वडिल लहानपणीच लग्ने लावून देत. अशावेळी महिलांना  ‘चॉईस’ नसे. चार-पाच मुले व्हायची. जसे जमेल तसे दिवस ढकलत तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करत राहणे असे चित्र होते. ६०-७० च्या दशकातील पिढीत वैचारिक मतभेदांचे प्रमाण तुलनेने जास्त आहे.’’ - माधव दामले (संस्थापक ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशनशिप मंडळ, पुणे) 

Web Title: senior citizens divorce ! Need for trouble, openness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.