Video-सावंतवाडीत बिबट्याच्या बछड्याचा अमानुष छळ, प्राणी मित्रांना संताप अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 20:48 IST2018-11-08T20:43:59+5:302018-11-08T20:48:29+5:30
बिबट्याच्या बछड्याला अगदी मांजराप्रमाणे दोरीच्या सहाय्याने बांधून खेळण्याचा प्रकार तालुक्यातील सातार्डा येथील एका गावात घडला आहे.

Video-सावंतवाडीत बिबट्याच्या बछड्याचा अमानुष छळ, प्राणी मित्रांना संताप अनावर
सावंतवाडी- बिबट्याच्या बछड्याला अगदी मांजराप्रमाणे दोरीच्या सहाय्याने बांधून खेळण्याचा प्रकार तालुक्यातील सातार्डा येथील एका गावात घडला आहे. त्यात तो छोटा बछडा जिवाच्या आकांताने ओरडताना दिसत आहे. या प्रकाराची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, धुमाकूळ घालत आहे. व्हॉट्सअपवर आलेल्या क्लिपमध्ये बिबट्याच्या छोट्या बछड्याला दोरीने बांधून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर बाजूला बसलेले लोक त्याला बांधून उचलत आहेत. तसेच मांजराप्रमाणे त्याला खेळविले जात आहे. त्यामुळे नेमके त्याचे काय झाले याचा शोध घ्यावा, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
याबाबत वनअधिका-यांशी संपर्क साधला असता तो प्रकार चार ते पाच दिवसांपूर्वी तालुक्यात घडला. मात्र बांधून ठेवण्यात आलेल्या बछड्याला उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले, असे त्यांचे सांगण्यात आले आहे. परंतु जखमी बछड्याला जखमी अवस्थेत थेट जंगलात सोडणे चुकीचे आहे. त्याचं नेमकं काय झालं याची चौकशी व्हावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. मात्र या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, तालुक्यातील सातार्डा येथे एका गावात हा प्रकार घडला होता. पकडण्यात आलेल्या बछड्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले आहे. हा सर्व प्रकार चुकीचा आहे. अशा प्रकारे कोणी वन्य प्राण्यांची खेळू नये ते कायद्याने चुकीचे आहे. याची चौकशी सुरू आहे, असे सांगून त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.