वन्यजीवांसाठी समृद्धी महामार्ग ठरतोय वरदान; अंडरपास आणि ओव्हरपासचा करताहेत वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 06:07 AM2024-02-13T06:07:53+5:302024-02-13T06:08:42+5:30

क्रॉसिंग स्ट्रक्चर्सचा वापर लहान सस्तन प्राणी आणि मांसाहारी यांच्यासह विविध वन्यजीव प्रजाती करत आहेत

Samruddhi highway is a boon for wildlife; Underpasses and overpasses are used interchangeably | वन्यजीवांसाठी समृद्धी महामार्ग ठरतोय वरदान; अंडरपास आणि ओव्हरपासचा करताहेत वापर

वन्यजीवांसाठी समृद्धी महामार्ग ठरतोय वरदान; अंडरपास आणि ओव्हरपासचा करताहेत वापर

मुंबई : वाहतुकीसाठी वरदान ठरलेला ७०१ किमी लांबीचा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वन्यजीवांसाठीही वरदान ठरत असल्याची सुवार्ता आहे. या द्रुतगती महामार्गावर खास वन्यप्राण्यांसाठी उभारण्यात आलेल्या अंडरपास आणि ओव्हरपासचा सुयोग्य वापर होत असल्याचे अभ्यासाअंती निदर्शनास आले आहे. 

समृद्धी महामार्गाची उभारणी करताना तो वन्यजीवांचा अधिवास असलेल्या काही ठिकाणांवरून जात असल्याचे निदर्शनास आल्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वन्यजीवांच्या अधिवासाला महामार्गाचा अडथळा येऊ नये, याकरिता त्यांच्यासाठी उन्नत आणि भुयारी मार्गांची उभारणी केली. वन्यप्राण्यांनी या ठिकाणावरून जावे यासाठी खास प्रयत्न करण्यात आले. तसेच, संबंधित ठिकाणी ६४ कॅमेरा ट्रॅप्स लावण्यात आले आहेत. याच मार्गांचा वापर वन्यजीवांकडून केला जात असल्याचे आता समोर आले असून, त्याबाबत वन्यजीव अभ्यासकांनी समाधान व्यक्त केले आहे.

क्रॉसिंग स्ट्रक्चर्सचा वापर लहान सस्तन प्राणी आणि मांसाहारी यांच्यासह विविध वन्यजीव प्रजाती करत आहेत. यामध्ये नीलगाय, चिंकारा आणि जंगली डुक्कर, भारतीय ससा, मुंगूस या प्राण्यांचा समावेश आहे. आता पुढील पाच वर्षांसाठी अंडरपास आणि ओव्हरपासचे निरीक्षण केले जाईल. आणखी सुधारणा करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल, अशी अशा एमएसआरडीसीने व्यक्त केली आहे. एक्स्प्रेस वेवर पक्ष्यांची गणना केली जात आहे. आजपर्यंत ३१० ठिकाणी माहिती संकलित करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गावरील वन्यजीवांच्या हालचालींच्या निरीक्षणाचे प्रारंभिक परिणाम उत्साहवर्धक आहेत. चिंकारासारख्या प्रजातींद्वारे ओव्हरपासचा वापर हे उत्तम संकेत आहेत. - डॉ. बिलाल हबीब, वन्यजीव अभ्यासक

समृद्धी महामार्गावरील उपायांच्या अंमलबजावणीबाबत अधिक चांगले निर्णय घेतले जातील. नियोजनाच्या टप्प्यावर एकत्रितपणे अभ्यास केला जाईल. - वीरेंद्र तिवारी, संचालक, भारतीय वन्यजीव संस्था

Web Title: Samruddhi highway is a boon for wildlife; Underpasses and overpasses are used interchangeably

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.