फायनान्स कंपनीवरील दरोडा टळला

By admin | Published: September 20, 2016 03:12 AM2016-09-20T03:12:07+5:302016-09-20T03:12:07+5:30

पोलिसांच्या सतर्कतेमुळे घणसोली येथील फायनान्स कंपनीवरील दरोड्याचा प्रयत्न फसला आहे.

The robbery on the finance company was avoided | फायनान्स कंपनीवरील दरोडा टळला

फायनान्स कंपनीवरील दरोडा टळला

Next


नवी मुंबई : पोलिसांच्या सतर्कतेमुळे घणसोली येथील फायनान्स कंपनीवरील दरोड्याचा प्रयत्न फसला आहे. दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांनी सापळा रचून त्यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून देशी पिस्तूल व खंजीर अशी शस्त्रे जप्त करण्यात आली असून दहीहंडीच्या दिवशी त्यांनी केलेल्या एका गुन्ह्याची देखील उकल झाली आहे.
फायनान्स कंपनीवर दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. १४ सप्टेंबर रोजी पोलिसांनी केलेल्या या कारवाईत पाच जणांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे. ही टोळी घणसोली सेक्टर ३ येथील मुत्थुट फायनान्स कंपनीवर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात होती. त्याची माहिती कोपरखैरणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपआयुक्त प्रशांत खैरे, सहाय्यक आयुक्त दिलीप माने, वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजय तायडे यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला होता. सीवूड येथील पॉप्युलर फायनान्स कंपनीवर एक महिन्यापूर्वीच दरोडा पडलेला असल्यामुळे पोलिसांनी याचे गांभीर्य घेतले. दरोड्यापूर्वीच या टोळीला अटक करण्याच्या उद्देशाने सहाय्यक निरीक्षक रवींद्र अहिरे, उमेश मुंडे, उपनिरीक्षक योगेश देशमुख व विजय चव्हाण यांच्यामार्फत घणसोली परिसरात पाळत ठेवण्यात आली होती. यावेळी मोटरसायकलवर व रिक्षामधून त्याठिकाणी आलेल्या सहा जणांवर संशय येताच पोलिसांनी त्यांच्यावर झडप टाकली. या झटापटीमध्ये पाच जणांना पकडण्यात आले तर त्यांचा एक साथीदार पळून गेला. शोएब खान (२७), संतोष डोंगरे (१९), ननकू गौतम (३८), शब्बीर अली (२७) व आसिफ खान (२६) अशी त्यांची नावे आहेत. शोएब व संतोष हे दोघे रबाळेचे तर इतर वडाळा व भायखळा परिसरात राहणारे असून सराईत गुन्हेगार आहेत. अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल, खंजीर हे शस्त्र तर दरोड्याचा ऐवज लुटून नेण्यासाठी सोबत आणलेली बॅग जप्त केल्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले.
याच टोळीपैकी तिघांनी दहीहंडीच्या दिवशी घणसोली सेक्टर ४ येथील जय मातादी कॅटरर्समधील महिला कामगाराचे हातपाय बांधून दरोडा टाकला होता. त्याठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये हे दृश्य चित्रित झाले होते. सदर गुन्ह्याची देखील त्यांनी कबुली दिल्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The robbery on the finance company was avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.