पिंपरी-चिंचवड, दि. 12 - चर्चेला वेळ न दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणा-या रिंगरोड बाधितांवर भोसरीत पोलिसांनी शनिवारी सायंकाळी 5.45 सुमारास सौम्य लाठीमार केला. अचानकपणे रस्त्यातच आंदोलकांनी गर्दी केल्याने नो एन्ट्रीतून ताफा काढूण देण्यात आला. ‘‘शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या रिंग रोड बाधितांचे आंदोलन पोलिसांनी चिरडण्याचा प्रयत्न केला, भाजपाच्या सत्ताधाºयांनी फसवणूक केली म्हणून रिंगरोड बाधितांनी निषेध केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील रिंगरोड विरोधात नागरी संघर्ष समितीचे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे. मुख्यमंत्र्याना पत्रे पाठविणे, संवाद यात्रा, स्मरण यात्रेद्वारे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्र्याचा दौरा शहरात असल्याने आणि भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहात सभा असल्याने रिंगरोड बाधितांचे म्हणने मुख्यमंत्री ऐकतील अशी आशा होती. त्यामुळे दुपारी एकपासून महिला, लहानमुले, ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमस्थळी पोहोचले होते. त्यावेळी समोर थांबण्यास पोलिसांनी मज्जाव केला. म्हणून कार्यकर्ते नाट्यगृहासमोर असणाºया मंगल कार्यालयाच्या मैदानात भर उन्हात बसले होते. त्यावेळी भाजपाच्या पदाधिकाºयांनी आंदोलनकर्त्यांना भेटून मुख्यमंत्र्यांशी आपली भेट घडवून दिली जाईल, असे आश्वासन दिले. 

कार्यक्रम संपला तरी शिष्टमंडळाला नाट्यगृहाच्या आवारात येऊ न दिल्याने मंगल कार्यालयात असणारे कार्यकर्ते नाट्यगृहाच्या बाजूस धावले. पावणे सहाला मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा निघण्याची वेळ झाली तरी शिष्टमंडळास आत न सोडल्याने जोरदार गोंधळ उडाला. घोषणाबाजी सुरू झाली. घर वाचविण्यासाठी नागरिकांनी अक्षरश टाहो फोडला. तरीही आत सोडत नसल्याने रस्त्यातच नागरिक उभे राहिले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून पोलिसांनी काही आंदोलकांना आत सोडले. तोपर्यंत मुख्यमंत्र्यांचा ताफा प्रवेशद्वारापर्यंत येऊन ठेपला होता. त्यावेळी काही क्षण मुख्यमंत्र्यांचे वाहन थांबले. त्यांनी निवेदन स्वीकारले आणि ताफा पुढे मार्गस्थ झाला. याच वेळी मोठ्याप्रमाणावर आंदोलक गाड्यामागे धावले. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला. जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी आंदोलनकर्त्यांचा जमाव फोडण्याचा प्रयत्न केला. पोलीस आंदोलन चिडताहेत ही बाब लक्षात येताच आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘‘आम्हाला अटक करा, पण आम्हाला मुख्यमंत्र्यांशी बोलू द्या, घर आमच्या हक्काचे अशा घोषणा दिल्या. यावेळी समजूत काढण्याऐवजी पोलीस यंत्रणा धक्काबुक्की करू लागल्याने रिंगरोड बाधितांनी ठिय्याच मांडला. त्यावेळी ‘आपण कायदा मोडत आहात, येथून निघून जावे, असे आवाहन पोलिसांनी केले.

पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनीही रिंगरोड बाधितांना शांत रहा, असे आवाहन केले. तसेच माजी नगरसेवक मारूती भापकर यांनी आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिस एकेका आंदोलकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागल्याने आंदोलनकर्ते संतप्त झाले होते. त्यामुळे रस्त्यावर वाहतूककोंडी निर्माण झाली होती. सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर सातच्या सुमारास परिस्थिती निवळली.

‘लोकमत’च्या छायाचित्रकारास धक्काबुक्की
पोलीस आंदोलन चिरडत असल्याच्या घटनेचे चित्रण करणाºया ‘लोकमत’चे छायाचित्रकार अतुल मारवाडी यांची गचांडी धरून बाहेर काढले. ‘आमचे छायाचित्र का काढतोस, बघून घेतो,  छायाचित्र काढण्यास मज्जाव केला. अर्वाच्य शिवीगाळ केली. हा प्रकार अन्य पत्रकारांच्या लक्षात आल्याने संबंधित छायाचित्रकास वाचविण्यासाठी सर्वजण धावले. तोपर्यंत धक्काबुक्की करून रस्त्याच्या बाजूला नेले. संबंधित अधिकाºयावर कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाने केली आहे. दरम्यान हा प्रकार लक्षात येताच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकारांची समजूत काढली दिलगीरी व्यक्त केली. 

सत्ताधा-यांनी फसविले
नागरी हक्क कृती समितीचे अध्यक्ष मानव कांबळे म्हणाले, ‘‘शांततेच्या मार्गाने आम्ही आमचे म्हणने मांडत होतो. सकाळपासून लहान मुले, महिला नागरिक याठिकाणी भेटीची वाट पाहत होते. उन्हा तान्हात बसले होते. भाजपाच्या पदाधिका-यांनी दुपारी आम्हाला भेटून आम्ही मुख्यमंत्र्यांशी आपली भेट घालून देतो, असे आश्वासन दिले होते. मात्र, शेवटपर्यंत भेटू दिले नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले. भाजपाच्या सत्ताधा-यांचे बांधकाम व्यावसायिकांशी हितसंबंध असल्याने पोलिसांमार्फेत आंदोलकांचा आवाज मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. पत्रकारांनाही धक्काबुक्की झाली. फसवूणक झाल्याची भावना झाल्याने आंदोलक संतप्त झाले होते.

माजी नगरसेवक मारूती भापकर म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणू असे आश्वासन दिल्याने आंदोलक शांत होते. कार्यक्रम संपूनही वेळ न मिळाल्याने नागरिक रस्त्यात आले. रस्ता अडविला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काही वेळ गाडी थांबविली. निवेदन घेतले मात्र, चर्चा न करताच निघून गेले. महिनाभर नागरिक रिंगरोड बाधितांचे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मार्ग काढतील, न्याय मिळेल, अशी आशा होती. मात्र, चर्चा न करताच निघून गेले. याचा आम्ही निषेध करतो.’’ 

 

 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.