राजू शेट्टी मंत्रिपदाची अपेक्षा ठेवणारे नेते नाहीत : सदाभाऊ खोत
By admin | Published: June 22, 2017 06:41 PM2017-06-22T18:41:55+5:302017-06-22T18:43:58+5:30
केंद्रीय मंत्रिपदाच्या आशेने दुटप्पी राजकारण करण्याइतपत राजू शेट्टी छोटे नेते नाहीत. निरपेक्षपणे शेतक-यांसाठी काम करण्याची त्यांची पद्धत सर्वाधिक जवळून मी अनुभवली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 22 - केंद्रीय मंत्रिपदाच्या आशेने दुटप्पी राजकारण करण्याइतपत राजू शेट्टी छोटे नेते नाहीत. निरपेक्षपणे शेतक-यांसाठी काम करण्याची त्यांची पद्धत सर्वाधिक जवळून मी अनुभवली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील ही टीका चुकीची आहे, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली.
दोनच दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजू शेट्टी यांना केंद्रीय मंत्रीपदाचे डोहाळे लागल्याची टीका केली होती. त्यास उत्तर देताना खोत म्हणाले की, मंत्रीपदाची नव्हे तर कोणत्याच पदाची अपेक्षा राजू शेट्टी यांनी कधीच ठेवली नाही. शेतकºयांसाठीच त्यांनी आजपर्यंत चळवळ केली आहे. अनेक वर्षांपासूनचे आम्ही दोघे सोबती आहोत. त्यामुळे त्यांचा स्वभाव मला माहीत आहे. त्यामुळे अशाप्रकारची टीका योग्य नाही. माझ्याबद्दल कोण, कशी टीका करीत आहे, याच्याकडे मी लक्ष देत नाही. माझा चष्मा चांगला असल्यामुळे मला जग चांगलेच दिसते. दुसºयांचे चष्मे कसे आहेत, हे मला माहीत नाही.
ते म्हणाले की, कर्जमाफीच्या विषयावरून काहींनी ढोल-ताशे वाजविण्याचे काम केले आहे. मीही आंदोलने करीतच आलो आहे. मला या गोष्टी माहीत आहेत. चर्चेला जाण्याअगोदर ढोल-ताशे वाजवायचे असतात, तेव्हा कळते की पाहुणे येत आहेत. त्यामुळे काहींनी ढोल-ताशे वाजविले. तसे काही पाहुणे आलेही होते. आम्ही अशा पाहुण्यांनासुद्धा चर्चेला बोलावले. आता निर्णय झाल्यानंतरही कागद जाळून काहीजण पुन्हा त्याच गोष्टी करीत आहेत. या गोष्टी चालायच्याच.
ते म्हणाले की, आमच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सरकारचे दार उघडावे, यासाठी आम्ही आजपर्यंत आंदोलने केली. आता परिस्थिती तशी नाही. मी शेतक-यांचा प्रतिनिधी म्हणून मंत्रिमंडळात गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे समजूतदार मुख्यमंत्री भेटले. त्यांनी चर्चेचे दार उघडे केले. त्यामुळे आक्रमक होण्याची गरजच काय? पंढरपूर ते बारामती, तर कधी कराडपर्यंत आम्ही चालत जाऊन शेतकºयांसाठी आंदोलने केली, पण तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे दरवाजे कधीच उघडले नाहीत. देशातील व राज्यातील आजवरच्या शेतकरी आंदोलनात शेतकºयांचे बळी गेले. यावेळी प्रथमच हिंसा न होता, रक्त न सांडता शेतकºयांचे प्रश्न सुटलेले आहेत.
एन. डी. पाटील आदरस्थानीच-
ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील माझ्याबद्दल काहीही बोलले तरी त्यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. ते सामाजिक चळवळीतील भीष्माचार्य आहेत. त्यांच्याबद्दल मला नेहमीच आदर वाटतो, असे खोत म्हणाले. सदाभाऊ खोत सरकारधार्जिणे झाल्यामुळे त्यांची भाषा बदलली आहे, अशी टीका प्रा. डॉ. पाटील यांनी बुधवारी केली होती.