पुष्पांमाजी पुष्पा मोगरी... या ओळी कोणत्या ग्रंथातील आहेत?

By अोंकार करंबेळकर | Published: February 27, 2018 02:33 PM2018-02-27T14:33:11+5:302018-02-27T14:33:11+5:30

आज मराठी राजभाषा दिन. मराठी ग्रंथांचे उल्लेख शेकडो वर्षांपुर्वीच्या इतिहासात सापडत असले तरी पहिल्या मुद्रित मराठी ग्रंथाची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. या आज मराठी दिनाच्या निमित्ताने मुद्रित होणाऱ्या पहिल्या ग्रंथाची आणि त्याच्या लेखकाची माहिती करुन घेणे सयुक्तीक ठरेल.

Pushpamaji Pushpa Mogri ... Which textures are there in these lines? | पुष्पांमाजी पुष्पा मोगरी... या ओळी कोणत्या ग्रंथातील आहेत?

पुष्पांमाजी पुष्पा मोगरी... या ओळी कोणत्या ग्रंथातील आहेत?

googlenewsNext

मुंबई- आज मराठी राजभाषा दिन. मराठी ग्रंथांचे उल्लेख शेकडो वर्षांपुर्वीच्या इतिहासात सापडत असले तरी पहिल्या मुद्रित मराठी ग्रंथाची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. या आज मराठी दिनाच्या निमित्ताने मुद्रित होणाऱ्या पहिल्या ग्रंथाची आणि त्याच्या लेखकाची माहिती करुन घेणे सयुक्तीक ठरेल.

22 ऑक्टोबर १५७९ रोजी गोव्याच्या किनाऱ्यावर लागलेल्या बोटीतून ती व्यक्ती उतरली. त्यानंतर गोवा हीच कर्मभूमी मानून मृत्यूपर्यंत तिने गोवा, ख्रिस्तीबांधव आणि मराठी-कोकणीची सेवा केली. बायबल आणि ख्रिस्तजीवनाला मराठीत आणले, कोकणीचे व्याकरण लिहून भारतीय भाषेतील व्याकरण प्रथम छापून आणण्याचा मान मिळवला आणि १६१९ साली चिरनिद्रेसाठी गोव्यातच देह ठेवला. भारतात पाऊल ठेवणारी पहिली ब्रिटिश व्यक्ती असे समजली जाणारी आणि ख्रिस्तपुराण लिहिणारी ही व्यक्ती होती फादर थॉमस स्टीफन्स. माझ्या मराठीची बोलु कौतुके, परिं अमृतातेही पैजा जिंके या मराठीच्या ज्ञानेश्वरांनी केलेल्या अजरामर वर्णनाप्रमाणे, 
जैसी पुष्पांमाजी पुष्पा मोगरी, 
की परिमळांमाजी कस्तुरी, 
तैसी भाषामांजी, साजिरी मराठिया 

असे वर्णन फादर स्टीफन्सनी केले. मराठीचे त्यांनी केलेल्या या कौतुक आणि ख्रिस्तपुराणास यंदा चारशे वर्षे पूर्ण झाली आहेत.
थॉमस स्टीफन्स यांचा जन्म १५४९ साली इंग्लंडमध्ये विल्टशायर परगण्यातील क्लिफ पिपर्ड येथील बुश्टेन येथे झाला. विन्चेस्टर कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले. प्रोटेस्टंट चर्चच्या छळाला कंटाळून कॅथलिक लोकांना पळून जावे लागले. त्यामुळे शिक्षणानंतर स्टीफन्सही रोमला गेले. तेथे जेसुईट संघामध्ये प्रवेश झाल्यानंतर समुद्रमार्गे मोठा प्रवास करून ते भारतामध्ये आले. अनोळखी प्रदेशातून प्रवास करतानाही त्यांची चौकस आणि अभ्यासू वृत्ती दिसून येते.

गोव्यापर्यंतच्या प्रवासाचे साद्यंत वर्णन त्यांनी पत्राद्वारे आपल्या वडिलांना केले आहे. वाटेत लागलेला प्रदेश, प्रवासात दिसलेले पक्षी, मासे, लोक यांचेही वर्णन त्यांनी या पत्रांमध्ये केले आहे. गोव्यामध्ये आल्यानंतर येथील मातीशी आणि भाषेच्या प्रेमातच ते पडले. त्यांना पोर्तुगीज, इंग्रजी या भाषा आधीच अवगत होत्या. त्यानंतर त्यांनी मराठी व कोकणी भाषा आत्मसात केल्या. लोकजीवनाचा अभ्यास करत स्टीफन्सनी भारतीय संस्कृतीचीही माहिती गोळा केली. याच काळामध्ये त्यांनी कोकणी भाषेचे व्याकरणही लिहिले. भारतामध्ये येताना किंवा भारतात आल्यावर त्यांच्यासाठी सर्वच अनोख्या गोष्टींच्या भेटी झाल्या. त्या काळात नव्याने धर्मांतर केलेल्या लोकांना देवाची स्तुती किंवा पुराणासारखी रचना वाचण्यासाठी हवी होती. ज्या लोकांसाठी आपण काम करत आहोत त्यांच्या भाषेत आपल्याला संवाद साधता आला पाहिजे हे जाणवल्यामुळेच त्यांनी कोकणी आणि मराठीचा अभ्यास सुरू केला.

लोकांच्या या मागणीनुसार त्यांनी बायबल आणि येशू ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित ११,००० ओव्यांचा ख्रिस्तपुराण हा ग्रंथच सिद्ध केला. स्टीफन्सनी महाराष्ट्रातील भक्ती संप्रदायात प्रसिद्ध असणाऱ्या संतांच्या ग्रंथांप्रमाणेच ख्रिस्तपुराणाची रचना केली आहे. संत एकनाथांचे ते समकालीन होते, त्यांच्या पुस्तकातील शैलीही एकनाथकालीन भाषेच्या शैलीप्रमाणे आहे. ख्रिस्तपुराणाचे स्टीफन्सनी दोन भाग केले आहेत. त्यातील पहिला भाग पहिले पुराण (आदि पुराण) हे जुना करार किंवा ओल्ड टेस्टामेंटवर आधारित आहे, तर दुसरे पुराण (देव पुराण) हे नवा करार किंवा न्यू टेस्टामेंटवर आधारलेले आहे. पहिल्या पुराणात विश्वाची निर्मिती, अ‍ॅडम-इव्हची गोष्ट, तर दुसऱ्या पुराणात येशूच्या जीवनाची माहिती गोष्टीरूपाने दिली आहे.

ख्रिस्ताच्या जीवनाचे मराठीकरण करताना स्टीफन्सनी सगळा बाज अस्सल देशी आणि भारतीय संस्कृतीच्या आधाराचा वापरला आहे. 
शं. गो. तुळपुळे यांनी यासंदर्भात अत्यंत मार्मिक आणि चपखल वर्णन केले आहे. ते म्हणतात, स्टीफन्स यांनी भाषा, विचार, कल्पना आणि काव्यात्मक रचना मराठीच वापरल्या आहेत. बाहेरून एखाद्या हिंदू देवळाप्रमाणे तर आतमध्ये फक्त येशूची मूर्ती अशी या पुराणाची रचना केली आहे. तुळपुळे यांनी म्हटल्याप्रमाणे खरच स्टीफन्स यांनी उत्तमोत्तम शब्दांची रचना केली आहे. काही परदेशी संकल्पनांना नव्या संज्ञाही दिल्या आहेत, तर काही शब्द त्यांनी तयारही केले आहेत. बाप्तिस्माला त्यांनी ज्ञानस्नान हा सुंदर शब्द वापरला आहे. तसेच सॅक्रीफाईसला पूजा आणि क्रुसला सिळुवी (सुळी) असे शब्द वापरले आहेत.

संपूर्ण पुराणामध्ये नैवेद्य, पुराण, ग्रंथ, वैकुंठ, ब्राह्मण, नमन, देवस्तुती, संतमहंतस्तुती, होम, अर्पण, समर्पण, शास्त्र, वचन असे अनेक शब्द वापरले आहेत. याबरोबरच दोन शब्द एकत्र करूनही काही नव्या संज्ञा त्यांनी तयार केल्या आहेत. देव-पूजा, भव-कर्म, पाप-कर्म, कर्म-तम, शास्त्र-पुराण, सत्त्व-कृपा, परम-शास्त्र, मोक्ष-माहेर, आनंद-स्थान असे शब्द एकत्र करून नव्या संज्ञा किंवा शब्दसमूहांची योजना त्यांनी केली आहे. तसेच वाचक किंवा या पुराणाचे श्रवण मराठी, कोकणी करणार आहेत याचा पुरेपूर अभ्यास त्यांनी केला असावा असे वाटते. कोकणी माणसाला समजावे म्हणून मेंढपाळाऐवजी गोपाळ असा शब्द वापरण्यामागे तोच हेतू असावा. 

ख्रिस्तपुराण लिहून झाल्यावर तो छापण्यापर्यंतही स्टीफन्स यांना अनेक अडथळे आले असावेत. कारण ग्रंथाचे काम १६०८ सालीच पूर्ण झाले होते; पण तो छापायला आठ वर्षांचा काळ जाऊन १६१६ वर्ष उजाडावे लागले. १५५६ साली एक प्रिटिंग प्रेस इथिओपियामध्ये पाठविण्यात येणार होती. मात्र तेथील राजाचे कॅथलिक धर्माबाबतचे मत फारसे अनुकूल नव्हते त्यामुळे ती भारतात पाठविण्यात आली. गोव्याच्या गव्हर्नरनी ती गोव्यात असावी अशी इच्छा दर्शविली म्हणून ती गोव्यात आली. त्या प्रेसमध्ये १५५६ साली Conclusões e outras coisasआणि त्याच्या पुढच्या वर्षी सेंट झेवियर्सनी लिहिलेले Doutrina Christa छापलं गेलं आणि त्यानंतर तिसरं पुस्तक औषधोपचारावर छापण्यात आलं. स्टीफन्सनी लिहिलेले ख्रिस्तपुराण १६१६ साली छापलं गेलं, ते याच प्रेसमध्ये छापलं गेलं असं मानण्यात येतं. 

कोकणी आणि मराठीतले शब्द छापणे त्याकाळात अवघड होते. १६०८ साली स्टीफन्स यांचे सर्व काम पूर्ण झाले होते. गोव्याच्या जेसुइट फादर प्रोव्हिन्शिएलला हे छपाईचे काम करण्यासाठी व शिफारस करण्यासाठी स्टीफन्सनी रोमचे जनरल वरिष्ठ फादर क्लौडियस आक्वाकिवा यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी इथल्या भाषेत आपल्या भाषेप्रमाणे सुटी अक्षरे नसल्यामुळे सहाशे साचे करावे लागतील असे लिहिले आहे. या सहाशे साच्यांचा खर्च मोठा असल्यामुळे दोनशे साचे कमी करून चारशे साच्यांमध्ये हे पुराण देवनागरीऐवजी रोमन लिपीत छापले गेले. १६११-१२ या कालावधीत स्टीफन्सची बदली वसईला भाषेचे शिक्षक म्हणून झाली होती. या वर्षभरामध्ये त्यांनी ख्रिस्तपुराणात दुरुस्ती आणि संपादन केले असावे. हे वर्ष त्यांनी वसईच्या किल्ल्यामध्ये जेसुइट हाऊसमध्येच काढले. ग्रंथ छापण्याचे कायदे त्याकाळी अत्यंत कडक होते. या ग्रंथाचा दृष्टिकोन मूळ पोर्तुगीज भाषेतील ग्रंथाच्या दृष्टिकोनाशी जुळतो की नाही हे पडताळण्यात आले. त्यानंतर पाऊलो मास्कारेनस, फ्रान्सिस्को बार्जेस देसुझा, जोआवो फर्नांडिस दे अल्मेडा, फादर ख्रिस्तोवांवो, आचर्बिशप प्रिमेट, फ्रान्सिस्को व्हिएरा यांनी दिलेल्या अभिप्रायानंतरच हा ग्रंथ छापण्यास सिद्ध झाला. 

फादर स्टीफन्स यांनी ख्रिस्तपुराणाबरोबर आर्ते दि लिंगोआ कानरिम आणि दोत्रिना ख्रिस्तां एम लिंगोआ ब्रमाना-कनारिम ही पुस्तके लिहिली. मात्र ती त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाली आहेत. ख्रिस्तपुराणाची रोमन लिपीतील पहिली प्रत १६१६ साली गोव्यात रायतूर येथे प्रसिद्ध करण्यात आली. दुसरी प्रत तेथेच १६४९ साली आणि १६५४ साली ओल्ड गोव्यामध्ये तिसरी प्रत प्रसिद्ध झाली. त्यानंतर १९०७ साली मंगळुरूमध्ये जोसेफ एल. सलडान्हा यांनी प्रकाशित केली. या सर्व प्रती रोमन लिपीमध्ये होत्या. पाचवी आणि देवनागरीमधील पहिली प्रत पुण्यामध्ये १९५६ साली शांताराम बंडेलू यांनी प्रकाशित केली, तर देवनागरीतील दुसरी प्रत मुंबईमध्ये फादर कारिदाद द्रागो एस. जे. यांनी प्रसिद्ध केली. आजच्या देवनागरी ख्रिस्तपुराणाबाबतचा सर्वात महत्त्वाचा शोध लंडनमध्ये जस्टीन अ‍ॅबट यांनी लावला. 
अ‍ॅबट यांना ती प्रत तेथील द स्कूल आॅफ ओरिएंटल स्टडीज येथे मर्सडन कलेक्शनमध्ये मिळाली. त्यातील देवनागरी लिपी, मराठी व कोकणी भाषा पाहून अ‍ॅबट यांनी ती प्रत ख्रिस्तपुराणाची असल्याचे ओळखले. यानंतर सर्व प्रतींचा अभ्यास करून तसेच तौलनिक विचार करून वसईच्या फादर नेल्सन फलकाव यांनी ख्रिस्तपुराण मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या पीएच.डी.चा विषयच त्यावर आधारित होता. त्यांच्याआधी असे पहिले संशोधन सं. ग. मालशे आणि इटालियन भाषेत बेनेदत्ता क्वाद्रा यांनी केले आहे.
स्टीफन्सनी वापरलेले शब्द आणि ओवीबद्ध रचना रसाळ म्हणावी अशीच आहे. ग्रंथाच्या सुरुवातीस ते श्री सर्वेश्वर प्रसन्न, श्री देवमाता प्रसन्न, श्री गुरू प्रसन्न असे लिहून देवाला वंदना करतात. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीस त्यांनी हे वंदन केले आहे. ओम नमोजी आद्याप्रमाणे त्यांनी 
ओम नमो वीस्वभरिता, 
देवबाप्पा सर्व समर्था 
परमेश्वरा सत्यवंता, 
स्वर्ग पृथ्वीच्या रचणारा
अशा शब्दांमध्ये सुरुवात केली आहे, तर शेवटी न्यून ते माझेच्या धरतीवर 
या दोहि पुराणां भितरि, 
काहिं चुकि देखाल जरि
तरि क्षेमा करोन मांझेवरी, 
न किजे कोपु

अशी वाचकांची माफीही मागितली आहे. जर मी सांगितलेल्या पुराणांमध्ये काही चुका असतील तरी लोकहो तुम्ही रागावू नका, मला क्षमा करा, असे नम्रपणे स्टीफन्सनी लिहून ठेवले आहे. 
अ‍ॅडम इव्हची गोष्ट, डेव्हिड, जेकब यांच्यासारखी पात्रे त्याचप्रमाणे वैकुंठवर्णन वगैरे प्रसंग स्टीफन्सनी लिहिलेल्या पुराणात वाचल्याच पाहिजेत इतक्या सुंदर शब्दरचनेत त्यांनी मांडल्या आहेत. येशू ख्रिस्ताच्या जन्मप्रसंगाचे वर्णन करताना ते लिहितात,
राहेल मेघांचे वरुशण, 
निर्मळ जाहाले गगन
ते जें फांकले गगन, तारामंडळी
अंकुवारिचा प्रसुतकाळ, 
पाहावयालागी निर्मळ
चंद्र जाला उताविळ, तारांगणेसि
नक्षत्रे दुसरा प्रहरि, 
तापली होती पुडारि
ते नवल पाहावया आबंरि, 
स्छिराऊ पाहति 

..म्हणजे (ख्रिस्त जन्मावेळेस) ढगांनी पाऊस पाडायचे थांबवले, आकाश स्वच्छ झाले, आकाशात ताऱ्यांचे तेज पसरले. कुमारिकेचा निर्मळ प्रसूतीकाळ पाहण्यासाठी चंद्र तारांगणात उतावीळ झाला. दुसऱ्या प्रहरांमध्ये जी नक्षत्रे उगवली होती, ती ते पाहण्यासाठी थांबली होती अशा शब्दांमध्ये त्यांनी येशूजन्माचे वर्णन केले आहे. 
येशूच्या मृत्यूनंतर त्याचे शरीर पुन्हा सचेतन झाले त्याचे वर्णन भगवद्गीतेतील नैनं छिन्दंती शस्त्राणी प्रमाणे आहे. सचेतन झालेल्या शरीराबाबत येशू स्वत:च म्हणाला, 
ना आंग्नीचेन जाळिजे, 
ना उदकाचेन न भीजजे
ना वायूचेन शोखीजे, 
ऐसी कुडि उतमी

(गीतेतील वर्णन आणि यातील वर्णनात इतकाच फरक म्हणजे गीतेमध्ये आत्म्याचे वर्णन केले आहे आणि येथे शरीराचे वर्णन केले आहे.) 
अशाप्रकारे एकाहून एक सरस ओव्यांमध्ये येशूचे जीवन दुसऱ्या पुराणात स्टीफन्स यांनी बांधले आहे. 
नक्की कोणत्या कारणामुळे ते सांगता येणार नाही मात्र मराठी वाचक आजही पुष्पामाजी पुष्पा मोगरीच्या पलीकडे स्टीफन्सकडे गेलेले नाहीत. त्यामुळेच भाषेच्या, इतिहासाच्या अभ्यासकांनी आणि वाचकांनी ख्रिस्तपुराण वाचणे आवश्यक वाटते.

देशीवादाचे आद्य प्रणेते
आपण ज्या प्रदेशात राहतो तेथील लोकांना धर्मग्रंथ समजावेत यासाठी त्यांच्याच भाषेत आणण्याचा सर्वात महत्त्वाचा प्रयत्न फादर स्टीफन्स यांनी केला. माझ्यामते आज ज्या देशीवादाचा उल्लेख केला जातो त्याचे आद्य प्रणेते स्टीफन्स आहेत. गोव्यातील भूमीची, लोकांची, संस्कृतीची ओळख त्यांनी करून आणि यातील प्रत्येक घटकाची सांगड ख्रिस्तपुराण लिहिताना त्यांनी घातली. त्यांनी धर्मग्रंथ आणि परंपरांचे सांस्कृतिकीकरण आणि भारतीयीकरण केले. ख्रिस्ताविषयी त्यांनी वापरलेली विशेषणे अभिनव, कल्पक (ओरिजिनल) अशी आहेत. ख्रिस्तपुराणाची काव्यरचना एकदम रसात्मक असून, शृंगार वगळता सर्व रस त्यामध्ये योजले आहेत. कॅथलिक चर्चच्या कडक नियमांचे प्रभाव असूनही स्टीफन्सनी भरपूर स्वातंत्र्य घेतले आहेत. नैवेद्यासारखे शब्द ख्रिस्ताच्या संदर्भात वापरणे त्यामुळेच धाडसाचे वाटते. आजचे संदर्भ वापरले तर स्टीफन्स यांनी वापरलेल्या नव्या शब्दांमुळे आणि त्यांनी सिद्ध केलेल्या या ग्रंथामुळे क्रांतिकारकच म्हटले पाहिजे. त्यांचा कोकणी व्याकरणाचा उत्तम अभ्यास होता, त्यांच्या शैलीची एकनाथांच्या शैलीशी तुलना केली जाते.
- फादर फ्रान्सिस दिब्रिटोलेखक, वसई

सांस्कृतिकीकरणाचे जनक
फादर स्टीफन्स हे दोन धर्मांच्या गाठीभेटीचे साक्षीदार आहेत. धर्माच्या गाठीभेटी, संवाद होताना होणाऱ्या घडामोडींमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांच्यापूर्वीच्या प्रसारकांनी आणि धर्मगुरूंनी प्रार्थनांचा अनुवाद करणे किंवा शिकवण देणे इथपर्यंतच प्रयत्न केले. पण स्टीफन्स त्या सर्वाच्या पलीकडे गेले. त्यांनी भाषांवर प्रभुत्व मिळवले. येथील भाषांच्या व्याकरणाचा अभ्यास केला. ख्रिस्तपुराण वाचले की त्यांची कल्पक दूरदृष्टी दिसून येते. स्थानिक लोकांसाठी त्यांनी सांस्कृतिकीकरणाचे जे प्रयत्न केले ते त्यांच्या आधी कोणीच केलेले नव्हते.
- फादर नेल्सन फलकाव, एस.डी.बी., वसई 
(फलकाव यांनी ख्रिस्तपुराण इंग्रजी व सध्याच्या मराठीत अनुवादित केले आहे. ते ख्रिस्ती धर्माचे अभ्यासक असून, अध्यापनही करतात.)

भाषेचा अभ्यासक
चारशे वर्षांपूर्वी सर्व साहित्य भक्तिरसाच्या आधारावर निर्माण होत असे. या भक्तिरसामध्ये ओवीबद्ध रचना केल्याशिवाय ती मराठी माणसाला समजणार नाही हे फादर स्टीफन्सनी ओळखले आणि इथल्या भाषा शिकून घेतल्या. त्यांच्या लेखनाचा अभ्यास केला की त्यांनी संत वाङ्मय आणि वेदांचाही अभ्यास केला असावा हे जाणवते. 
- कृष्णाजी कुलकर्णी 
(निवृत्त प्राध्यापक) बोरी, गोवा

Web Title: Pushpamaji Pushpa Mogri ... Which textures are there in these lines?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.