जगण्यायोग्य शहरांच्या यादीत पुणे अव्वल; बघा मुंबई, ठाण्याचा कितवा नंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 17:34 IST2018-08-13T17:34:19+5:302018-08-13T17:34:40+5:30
केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याकडून यादी जाहीर

जगण्यायोग्य शहरांच्या यादीत पुणे अव्वल; बघा मुंबई, ठाण्याचा कितवा नंबर
मुंबई: देशातील जगण्यायोग्य शहरांच्या यादीत पुण्यानं अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर या यादीत देशाची आर्थिक राजधानी मुंबई तिसऱ्या स्थानी आहे. जगण्यालायक शहरांच्या यादीत नवी मुंबईनं दुसरं स्थान मिळवलं आहे. जगण्याच्या दृष्टीनं सर्वात योग्य असणारी देशातील पहिली तीन शहरं महाराष्ट्रातील आहेत. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास खात्यानं ही यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत देशाची राजधानी दिल्ली 65 व्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्रातील तब्बल चार शहरांचा समावेश जगण्यायोग्य असलेल्या देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये झाला आहे. पुणे, नवी मुंबई आणि मुंबईनं पहिले तीन क्रमांक पटकावल्यावर या यादीत ठाण्यानं सहावा क्रमांक मिळवला आहे. मात्र उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि कोलकात्यामधील एकाही शहराला पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळालेलं नाही. विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगढच्या राजधान्यांचा समावेशदेखील पहिल्या दहा शहरांच्या यादीत आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर या यादीत सातव्या, तर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ दहाव्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेशमधील इंदूरला जगण्यायोग्य शहरांच्या यादीत आठवं स्थान मिळालं आहे.
केंद्रशासित प्रदेशांचा विचार केल्यास केवळ चंदिगडला पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळवण्यात यश आलं आहे. चंदिगडला पाचवा क्रमांक मिळाला आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती आणि विजयवाडा ही शहरंदेखील पहिल्या दहांमध्ये आहेत. त्यांना अनुक्रमे चौथा आणि नववा क्रमांक मिळवण्यात यश आलं आहे. देशातील शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं जीवनमान सुधारावं, यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याकडून जगण्यायोग्य शहरांची यादी प्रसिद्ध केली जाते. शहरातील संस्था, प्रशासन, मूलभूत सुविधांचा दर्जा लक्षात घेऊन जगण्यायोग्य शहरांची यादी तयार केली जाते.