तरुणाईची लगीनघाई! असला नवरा/नवरी नको गं बाई...

By सायली शिर्के | Published: May 16, 2019 03:46 PM2019-05-16T15:46:58+5:302019-05-16T16:19:57+5:30

लग्नाचं बघू, पण अटी-शर्ती लागू... बायको मिळत नाही म्हणून एका तरुणाने इच्छामरण मागितलंय. त्यावर तरुण-तरुणींना काय वाटतं?

Pune Man Seeks Permission For Euthanasia for marriage, what youngsters think about their life partner | तरुणाईची लगीनघाई! असला नवरा/नवरी नको गं बाई...

तरुणाईची लगीनघाई! असला नवरा/नवरी नको गं बाई...

googlenewsNext

लग्न हे प्रेमाचं बंधन असतं. लग्नामुळे आयुष्याला कलाटणी मिळते असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही पण हल्ली रिलेशनशीप, लग्न, संसार याबाबतची मतं तरुणाई जगासमोर ठामपणे मांडत आहे. 'शादी का लड्डू जो खाये वो पछताये, जो ना खाए वो भी पछताये' असं म्हटलं जातं तर वयात आलेल्या मुलामुलींना लग्न पाहावं करून असा सल्ला ही दिला जातो. पण हवी तशी मुलगीच मिळत नाही अशी अनेक तरुणांची तक्रार आहे. आईवडील आणि कुटुंबाचा सांभाळ करणारी बायको मिळत नाही म्हणून पुण्यातील एक तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. पण खरंच बायको म्हणजे रांधा वाढा उष्टी काढा, कुटुंब सांभाळा एवढंच तिचं आयुष्य असतं का?

आजकालच्या मुलामुलींचा लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. हल्ली तरुणाई आपल्या स्टेटसला मॅच होईल असाच जोडीदार शोधते. काहींना जबाबदाऱ्या, नातेवाईकांचा गोतावळा नको असतो तर काहींना याउलट अगदी कर्तव्यदक्ष, सर्वगुणसंपन्न बायको हवी असते. लग्नव्यवस्थेची पारंपरिक चौकट बदलण्याची खरंतर गरज आहे. लग्न म्हणजे adjustment, छोटी मोठी भांडणं, नाती सांभाळताना होणारी तारेवरची कसरत, एकमेकांना गृहीत धरणं हे नेहमीच समीकरण. अवाजवी अपेक्षा ही जोडीदाराकडून ठेवल्या जातात. लग्न म्हणजे नेमकं काय? बायको सुंदरच हवी का? किंवा नवरा कसा असावा? एकंदरीत लग्न या संकल्पनेबद्दल तरूणाईला काय वाटतं? नक्की बायको हवी की घरकाम करणारी बाई? या विषयी तरुणाईच्या डोक्यात काय विचारचक्र सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी मोकळेपणाने साधलेला संवाद...

आपल्याला हवी तशी जोडीदार मिळत नाही म्हणून पुण्यातील तरुणाने केलेला हा प्रयत्न वायफळ वाटतो. लग्न झाल्यावर सुरुवातीला सर्वकाही छान वाटतं नंतर मात्र त्या व्यक्तीच्या सहवासात राहून काही गोष्टी नावडत्या होतात. म्हणून मग अपेक्षा ठेऊन लोकांना काय सिद्ध करायचं असतं तेच माझ्या पचनी पडत नाही. कारण विनाकारण केलेल्या अपेक्षांनी दोन्हीं व्यक्तीचं आयुष्य पणाला लावलं जातं. लग्न संकल्पना समजून घेण्यासाठी संस्कारांचा ठेवा या पिढीला मिळायला हवा. अर्थात आपल्याला जोडीदार म्हणून कोण कसं आणि कधी हवं हे ठरवण्याचा वैयक्तिक अधिकार आहे.

- जाई कदम

 

लग्न ही आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मुलींनी देखील लग्नानंतर चूल आणि मूल या गोष्टीत अडकून राहू नये त्यांनी स्वत: चं वेगळं अस्तित्व निर्माण करावं. लग्न करताना मुलामुलींच्या अपेक्षा या हमखास वाढतात. पण लग्न ही काही काळासाठीची सोय नसल्याने दोघांनीही विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. सर्वच तरतुदी फायद्यासाठी नसतात. काही तरतुदी या अवघड परिस्थितीत उपाय म्हणून असतात. इच्छामरण हा एक उपायच आहे. त्यामुळे लग्नासाठी त्याचा दुरुपयोग कोणी करू नये. 

- विवेक साळुंखे

मुलामुलींच्या अपेक्षा या माझ्या मते काही योग्य आहेत तर काही अयोग्य आहेत. आजच्या काळात मुलगी नोकरी करत असली तरी हुंडा देणं, लग्नाचा पूर्ण खर्च करणं अशी मागणी लग्न करताना मुलीकडे केली जाते. तसेच नवऱ्या मुलाची आणि त्याच्या कुटुंबाची सुनेने काम करावं ही अपेक्षा असते पण ती वेळे अभावी पूर्ण करता येत नसल्याने तिची ओढाताण होते.  खरंतर सद्य परिस्थितीत कुटुंबाने आणि जोडप्याने एकमेकांना समजून घेतलं तरच सुखाने संसार करता येईल आणि घटस्फोटाच्या घटना कमी घडतील.

- शितल आसोलकर

 

स्वत: चं घर, एकुलता एक मुलगा, जास्त पगार, वेगळं राहायचं, मुलाचा फ्लॅट हवा, गाडी हवी अशा अनेक मुलींच्या अपेक्षा असतात. पण लग्न करताना जोडीदार हे एकमेकांना पूरक हवेत. मुलामुलींच्या लग्न करताना भरपूर अपेक्षा असतात. मात्र त्या दोघांनी मिळून पूर्ण करायला हव्यात तरच नातं घट्ट होतं. 

- राकेश कदम

 

मॅट्रीमोनीअल साईटवर मेंबर असल्याने तिथे अनेकजणांचे प्रोफाईल पाहता येतात. पण त्यातील अनेक मुलांची अपेक्षा ही आईला घरकामात मदत करणारी मुलगी हवी अशी असते. पण काम करणं ही अपेक्षा केवळ मुलींकडूनच का? तर त्याने देखील समजुतदारपणा दाखवावा. मुलगा आई-वडिलांना सांभाळू शकत नसेल, मुलीने त्यांची काळजी घ्यावी अशी त्याची इच्छा असेल तर तो त्या नवीन मुलीला कसं सांभाळून घेणार हा प्रश्नच आहे. अनेक मुलांची तक्रार असते की मुली पैसा पाहून लग्न करतात. पण असं असतंच असं नाही. प्रत्येक मुलीच्या या तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत वेगळ्या अपेक्षा असतात.  

- उज्वला देसाई

लग्नाचा विचार करताना मी जॉईंट फॅमेलीला प्राधान्य देईन. कारण एकत्र कुटुंबपद्धतीत मोठ्यांचा सल्ला घेता येतो. तसेच वेळोवेळी त्याचं मार्गदर्शन मिळतं. अनेकदा मुलीने आपल्या आईवडिलांची काळजी घ्यावी अशी मुलाची इच्छा असते तशीच अपेक्षा मुलींची देखील मुलाकडून असते. लग्न करताना सर्वच गोष्टींचा नीट विचार करणं गरजेचं आहे. काही मुलांना मुलीच्या चुकांचं खापर हे तिच्या आई-वडिलांवर फोडण्याची सवय असते. मात्र हे अत्यंत चुकीचं आहे. 

- अनामिका सिंग

 

लग्न करताना काही मुलींच्या अपेक्षा या उगाचच अवाजवी असतात. मुलगी स्वत: सुशिक्षित नसते पण नवरा मात्र खूप शिकलेला हवा. स्वत: ला चांगली नोकरी नसते पण मुलगा मात्र चांगल्या पदावर काम करणारा श्रीमंत हवा. तसेच तो सरकारी नोकर असावा किंवा मग गाडी, बंगलेवाला असावा या मुलींच्या अपेक्षा चुकीच्या आहेत. त्यांना सगळ्या सुखसोयी लग्नानंतर लगेच हव्या असतात पण सेटल होईपर्यंत वय 30 वर्षे होतं. 

- प्रशांत कवटे

 

Web Title: Pune Man Seeks Permission For Euthanasia for marriage, what youngsters think about their life partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.