राज्यातील पोलिओ लस १०० टक्के सुरक्षित!; दीपक सावंत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 02:26 AM2018-10-08T02:26:27+5:302018-10-08T02:27:06+5:30

सोमवारी शहर-उपनगरातील निवडक विभागांत लसीकरण मोहीम घेण्यात येणार आहे. यात सर्वांनी न घाबरता सहभागी होऊन नवजात बालकांना पोलिओ लस द्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

 Polio vaccine in the state is 100 percent safe! Deepak Sawant's information | राज्यातील पोलिओ लस १०० टक्के सुरक्षित!; दीपक सावंत यांची माहिती

राज्यातील पोलिओ लस १०० टक्के सुरक्षित!; दीपक सावंत यांची माहिती

Next

मुंबई : गाझियाबाद येथील पोलिओ लसीच्या प्रकरणानंतर व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर पोलिओ डोस पाजू नका, अशा आशयाचे असंख्य मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र, हा पूर्णपणे चुकीचा संदेश असून राज्यातील पोलिओ लस १०० टक्के सुरक्षित असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे. सोमवारी शहर-उपनगरातील निवडक विभागांत लसीकरण मोहीम घेण्यात येणार आहे. यात सर्वांनी न घाबरता सहभागी होऊन नवजात बालकांना पोलिओ लस द्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
मुंबईत एल, एम-ईस्ट, के-ईस्ट आणि एस वॉर्डमधील एका परिसरात सोमवारी लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. यात कुर्ला, गोवंडी, अंधेरी आणि भांडुप परिसराचा समावेश आहे, अशी माहिती पालिकेचे उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष रेवणकर यांनी दिली.
ही लस सुरक्षित आहे, याउलट अशा संदेशांना बळी पडून जी बालके पोलिओ लसीपासून वंचित राहतील त्यांच्या आरोग्याला धोका संभवेल. त्यामुळे पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या पाल्यांना पोलिओ डोस द्यावा, असे आवाहन पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी केले.

‘केंद्रासमवेत चर्चा करणार’
शरीरामध्ये रोगप्रतिबंधक शक्ती तयार करण्यासाठी क्षीण व्हायरस या लसींमध्ये असतात. ते संबंधित आजाराविरुद्ध लढण्याची ताकद शरीरात निर्माण करतात, अशी माहिती डॉ. दीपक सावंत यांनी दिली. यासंदर्भात केंद्र शासनासोबत चर्चा करून पुढील दिशा ठरविली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. ज्या कंपनीच्या पोलिओ लसींच्या उत्पादनात ‘टाइप टू’ विषाणू आढळला आहे, त्या बॅचचा पुरवठा महाराष्ट्रात झाला नाही, असे केंद्र शासनाच्या लसीकरण विभागाने स्पष्ट केले आहे.

Web Title:  Polio vaccine in the state is 100 percent safe! Deepak Sawant's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.