आरएसएसचे समांतर शासन उलथून टाका- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 05:39 AM2019-01-29T05:39:36+5:302019-01-29T05:40:59+5:30

संविधान टिकवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन; पिंपरीत वंचित बहुजन आघाडीचा मेळावा

Overthrow RSS's Parallel Governance - Prakash Ambedkar | आरएसएसचे समांतर शासन उलथून टाका- प्रकाश आंबेडकर

आरएसएसचे समांतर शासन उलथून टाका- प्रकाश आंबेडकर

Next

पिंपरी : भाजपाच्या आडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात समांतर सरकार चालवत आहे. हे समांतर सरकार रोखण्यासाठी काँग्रेस पाऊल टाकत नाही, त्यामुळे काँग्रेसबरोबरचा समझोता फिस्कटला असे सांगून देशाचे संविधान कायम टिकविण्यासाठी समांतर शासन उलथून टाकण्याचा चंग बांधला आहे. अशी भूमिका बहुजन वंचित आघाडीचे नेते, भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

पिंपरीतील एच ए मैदानावर सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे महाअधिवेशन झाले. यावेळी आंबेडकर बोलत होते. आमदार इम्तीयाज जलील, माजी आमदार लक्ष्मण माने, भारिपचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, अशोक सोनोने, नाथन केंगार, नवनाथ पडळकर आदी उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, मुस्लिम समाजाच्या व्यकतीकडे हत्यारे आढळून आली, तर त्यास दहशतवादी ठरवले जाते. अदिवासींकडे असे काही आढळून आले तर त्यांना नक्षलवादी ठरविण्यात येते. आरएसएस तसेच सनातन संस्थेच्या सदस्यांकडे हत्यारे आढळून आल्यानंतर त्याबद्दल काहीच म्हटले जात नाही. वेगवेगळे मापदंड वापरले जात आहेत.

भाजपाच्याआडून आरएसएस, सनातन या संस्थां वेगळी समांतर व्यवस्था उभी करीत आहेत. राज्यघटना बदलण्याचे प्रयत्न होत आहे. ही समांतर व्यवस्था उलथून टाकण्यासाठी काँग्रेसने धोरण स्पष्ट करावे, असे सुचविले. भारिप बहुजन महासंघाने एमआयएमबरोबर जाण्याबाबत काँग्रेसचा आक्षेप होता, समांतर व्यवस्थेच्या विरोधात जाण्यास काँग्रेस तयार नाही. त्यामुळे आम्ही वंचित घटकांना बरोबर घेऊन जाण्याची दिशा निश्चित केली.

आरक्षणाने समाजात मनभेद ...
एखाद्या समाजाला खूश करण्यासाठी आरक्षणाची खिरापत वाटली जात आहे. आरक्षणाने विद्रोह शमणार नाही. आरक्षणामुळे आपापसात स्पर्धा निर्माण होऊन मनभेद होणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून विशिष्ट घरण्यांची सत्ता पहावयास मिळत आहे. मराठा समाजाला सत्तेवर संधी मिळाली, असे नव्हे तर मराठी समाजातील काही कुटूंबांनी सत्ता उपभोगली आहे. लोकशाहीत कुटुंबशाही नको, नात्यागोत्याची सत्ता आता पुरे झाली. व्देषाचे राजकारण न करता, वंचित घटकाच्या विकासाचे, सर्वसमावेशक विकासाचे राजकारण होणे
गरजेचे आहे.

सरकारची धोरणे चुकीची...
शिक्षणाचा खर्च सरकारने करणे अपेक्षित आहे. आपल्या येथे बँकेचे कर्ज घेऊन कुटुंबीय मुलांना शिक्षण देतात. हा खर्च कुटूंबाने केला असल्याने, तो खर्च वसूल करण्याची त्यांची मानसिकता असते. कर्ज काढून शिक्षण घेऊन डॉक्टर झालेले, अभियंता झालेले तरूण मानवतेच्यादृष्टीने विचार करीत नाही. सरकारच्या अशा चुकीच्या धोरणामुळे मानवतेचा बळी घेणारे लुटारू तयार होत आहेत. औरंगाबादचे एमआयमचे आमदार इम्तियाज जलील म्हणाले, अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांना आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात पाहतो.वंचित बहुजन आघाडी स्थापण्यामागे केवळ सत्ता मिळविणे हा उद्देश नाही, तर देशाच्या संविधानाचे रक्षण करणे हा मुख्य हेतू आहे. दरम्यान मार्गदर्शक तत्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे आगामी काळात वंचित बहुजन आघाडी सत्तेवर आल्यास राज्य घटनेतील मार्गदर्शक तत्वांचे रूपांतर मुलभूत अधिकारांमध्ये करण्यात येईल.असा ठराव पिंपरी येथे झालेल्या अधिवेशनात संमत करण्यात आला.

कुपोषणाची आकडेवारी पुढे येत नाही
पुणे जिल्हा हा सत्तेचे माहेरघर मानला जातो. जाणता राजाचे वास्तव्य असलेला हा जिल्हा आहे. मावळ आणि आंबेगाव भागात आदिवासींचे वास्तव्य आहे. नंदूरबार, मेळघाट, गडचिरोली येथील आदिवासी बालकांच्या कुपोषणाची आकडेवारी जाहीर केली जाते. परंतू जाणता राजा असलेल्या भागातील आदिवासींच्या कुपोषणाची आकडेवारी कधी पुढे येऊ दिली जात नाही. जाणत्या राजाला कुपोषणाची जाणीव नाही. अशी टिप्पणी अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांचे नाव न घेता केली. तसेच, एचएची जागा लाटण्याचा राष्ट्रवादी नेत्यांचा डाव होता, त्यामुळेच ‘एचए’चे पुनरूज्जीवन अद्याप होऊ शकले नाही. असा आरोपही त्यांनी केला.

Web Title: Overthrow RSS's Parallel Governance - Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.