नयनतारा सहगल यांना दिलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण आयोजकांकडून रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 14:45 IST2019-01-06T14:44:52+5:302019-01-06T14:45:22+5:30
प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केले आहे.

नयनतारा सहगल यांना दिलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण आयोजकांकडून रद्द
पुणे - प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केले आहे. सुरक्षेच्या कारणावरून निमंत्रण रद्द करण्यात आल्याचे कारण देणारा ईमेल सहगल यांना आयोजकांकडून पाठवण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षाकडून आलेल्या राजकीय दबावामुळे सहगल यांना पाठवण्यात आलेले निमंत्रण रद्द करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील साहित्यविश्वात खळबळ उडाली असून, आयोजकांच्या कृतीचा निषेध केला जात आहे.
देशात होत असलेल्या साहित्यिक, विचारवंत यांच्या हत्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्यवर आलेली गदा, मॉब लिंचीग याबाबत नयनतारा सहगल यांची मते परखड आणि झुंजार आहेत. या सर्व मुद्द्यांचा नयनतारा सहगल यांच्या भाषणात उल्लेख होणार होता. त्यांच्या या भूमिकेचा आगामी निवडणुकांवर परिणाम होईल, या भीतीतून सहगल यांना काही राजकीय दबावामुळे संमेलनाला न येण्याचे पत्र यवतमाळ आयोजकांकडून सहगल यांना ईमेलद्वारे कळवण्यात आले आहे, अशी माहिती विशवसनीय सूत्रांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
नयनतारा सहगल व्यासपीठावर आल्यास संमेलनाचे पैसे मिळू देणार नाही, अशी धमकी पालकमंत्र्यांनी आयोजकांना दिल्याचे समजते. मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून सहगल यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ऐन वेळी मनसेने माघार घेतल्याने आयोजकांवर दबाव आला. त्यामुळे सुरक्षेचे कारण देऊन रात्री आयोजकांडून ईमेलद्वारे पत्र पाठवण्यात आले. याबाबत सहगल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. तरीही, त्या आयोजकांकडे भाषणाची प्रत पाठवण्यावर ठाम आहेत.