सर्वांत आकर्षक चेहरा

By admin | Published: January 15, 2017 01:22 AM2017-01-15T01:22:37+5:302017-01-15T01:22:37+5:30

आकर्षक चेहरा ही दैवी देणगी असते. आकर्षक चेहरा खेचून घेतो, मोहिनी घालतो, सारेकाही विसरायला लावतो आणि हो तो पहिल्यावर अन्य काही पाहण्याची इच्छाच उरत नाही.

The most attractive face | सर्वांत आकर्षक चेहरा

सर्वांत आकर्षक चेहरा

Next

- डॉ. नीरज देव

चाकोरीबाहेरचा विचार करून त्यातून तात्त्विक बोधाची जाणीव करून देणारं हे सदर दर १५ दिवसांनी.

आकर्षक चेहरा ही दैवी देणगी असते. आकर्षक चेहरा खेचून घेतो, मोहिनी घालतो, सारेकाही विसरायला लावतो आणि हो तो पहिल्यावर अन्य काही पाहण्याची इच्छाच उरत नाही.
जगात सर्वांत आकर्षक चेहरा कोणाचा असावा यावर मात्र सगळ्यांची मते वेगवेगळी येतील. कोणी म्हणेल मधुबालाचा तर कोणी ऐश्वर्या, ऊर्मिला वा दीपिकाचा द मर्लिन मेन्रोचा.
पण, हाच प्रश्न एखाद्या छोट्या बाळाला विचारला तर तो म्हणेल, माझ्या आईचा! कोणत्याही स्वरूपसुंदरीपेक्षा त्याची आई त्याला आधिक आकर्षक वाटेल मग ती कुरुप असली तरीही. अगदी भिकारणीच्या मुलालासुद्धा असेच वाटेल. पण जसजसे वय वाढते तसतशी आकर्षकतेची व्याख्या बदलते.
खरे सांगायचे तर चेहऱ्याची आकर्षकता चेहऱ्यात नसते; ती असते पाहणाऱ्याच्या नजरेत. कधीकधी तर मला वाटते त्याहीपेक्षा ती असते गरजेत. गरजेशिवाय आकर्षण निर्माणच होत नाही. म्हणून तर लहान मुलाला त्याच्या आईचा, प्रियकर - प्रेयसीला परस्परांचा, बुभुक्षिताला दात्याचा आणि मरणाऱ्याला मृत्यूचा चेहरा हवाहवासा वाटतो.
मृत्यूचा चेहरा? म्हणजे यमाचा की काय? कसा असेल हा यम? पुराणांनी तर वर्णन करून ठेवलेय, काळाकुट्ट, बलशाली व रेड्यावर बसून येणारा, कर्दनकाळ, रौद्र-भीषण, कठोर चेहऱ्याच्या यमाचा मला प्रश्न पडतो, या अशा भयप्रद व अनाकर्षक यमासोबत लोक का जात असतील? कोणी म्हणेल, मरणे का आपल्या हातात असते? मरण आले की जावेच लागते.
पण अनेक तत्त्ववेत्ते व मनोविश्लेषक सांगतात की, मरण्याची इच्छा झाल्याशिवाय मरण येतच नाही. फ्र ॉईड या इच्छेला नाव देतो ‘मृत्युएषणा’ - मरण्याची इच्छा. यावर कोणी
म्हणेल अपघातात मरणाऱ्याला कसली आली मरणेच्छा? आपण नेहमीच बघतो; ऐकतो अपघातात गंभीर जखमी झालेले म्हणतात, ‘यापेक्षा मरण परवडले.’ मग कल्पना करा त्या तीव्र यातनेत मरणाऱ्यालाही हेच वाटले असणे संभवनीय आहे. अगदी एका पळासाठी. म्हणतात ना, पानाला लावलेला चुना वाळायला
वेळ लागतो; पण त्याला यायला वेळ लागत नाही, मग पळभरासाठी डोकावलेला हा विचार त्याला यायला पुरेसा नाही का?
मला आठवतात परांजपेकाका. डॉक्टरांनी त्यांची आतडी काढून टाकली होती. तोंडाने अन्नपाणी घेता येत नव्हते. चालता येत नव्हते, उठून बसता येत नव्हते. डॉक्टरांनी व घरच्यांनी आशा केव्हाच सोडलेली होती. तरीही त्यांची जगण्याची जिद्द दांडगी होती. तब्बल सहा महिने ते या अवस्थेत जगले ते त्यांच्या मुलीचे लग्न ठरलेले पाहण्यासाठी. बाजी प्रभू नाही का सांगत होता, ‘तोफेआधी मरे न बाजी सांगा मृत्यूला.’ ही जिजीवीषाच सिद्ध करते की मृत्युएषणा असते. आपली तीव्र इच्छा पूर्ण झाली वा पूर्ण होतेय किंवा पूर्ण होण्यासाठी आपण संपूर्ण प्रयास केले. आता ती होईल वा पूर्ण होणे आजिबात शक्य नाही हे ध्यानात आले की जिजीवीषा सरून मृत्युएषणा येत असावी.
ही मृत्युएषणा केव्हा निर्माण होईल? जेव्हा आपण मृत्यूला पाहू तेव्हाच ना? आणि त्याला पहिल्यावर; कुणीतरी जिवलग भेटल्यावर जसे आपण आपली सारी सुख-दु:खे, व्याप-ताप सारेकाही क्षणभर विसरून जातो अगदी तसेच सगळेकाही सोडून माणसे त्याच्या सोबत निघून जात असावीत.
प्रत्यक्षात जगात काय दिसते; जीवनभराची साथ निभावयाची शपथ घेतलेले पण अर्ध्या वाटेवर हात सोडलेले प्रेमिक, लहानग्या बाळाला उघड्यावर टाकून जाणारी आई, आईला सोडून कोणाजवळ न जाणारे मात्र यमाच्या मिठीत सहजपणे शिरणारे बाळ, मुलीच्या लग्नाआधी मरणार नाही असे म्हणणारा पण ऐनवेळी निघून जाणारा पिता... जीवनाकडे पाहिले की अर्ध्यावर डाव सोडून जाणारे अनेक जण आढळतात व त्यांच्यामागे ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’ म्हणत तळमळणारे त्यांचे प्रियजनही डोळ्यांपुढे तरळतात. तुमच्याही पुढे असे अनेक चेहरे तरळत असतील. पण, सोडून जाणाऱ्याच्या नजरेपुढे केवळ यमाचाच चेहरा तरळत असावा, त्याला भुरळ पाडत असावा.
आपले कर्तव्य, आपल्या दायित्वापेक्षाही जाणाऱ्याला मृत्यू जवळचा का वाटत
असावा? वीतरागी साधूंना वा मृत्यूशी लढा
देत जगतो म्हणणाऱ्या वीरालासुद्धा
मृत्यूला भेटण्याची आस का निर्माण
व्हावी? मला वाटते जाणाऱ्याला कोठेतरी
या संसारापेक्षा मृत्यूचा चेहरा अधिक
आकर्षक वाटत असावा. त्याचा चेहरा पहिल्यावर इतर कोणताच चेहरा पाहू नये
असे वाटावे इतका तो आकर्षक असल्याने; त्याला पहिलेले आपल्याला कधीच भेटत नसावेत...?

Web Title: The most attractive face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.