पहाटेचा शपथविधी, शरद पवारांचा तो डाव, अखेर देवेंद्र फडणवीस बोलले, मोठे गुपित फोडले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 06:03 AM2023-06-29T06:03:15+5:302023-06-29T06:49:38+5:30

Devendra Fadnavis Vs Sharad Pawar: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीपूर्वी पडद्यामागे घडलेल्या अनेक घडामोडी आणि त्यात असलेली शरद पवार यांची भूमिका याबाबत अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Morning swearing-in ceremony, Sharad Pawar's ploy, Devendra Fadnavis finally spoke, broke the big secret, said... | पहाटेचा शपथविधी, शरद पवारांचा तो डाव, अखेर देवेंद्र फडणवीस बोलले, मोठे गुपित फोडले, म्हणाले...

पहाटेचा शपथविधी, शरद पवारांचा तो डाव, अखेर देवेंद्र फडणवीस बोलले, मोठे गुपित फोडले, म्हणाले...

googlenewsNext

२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावरून घेतलेल्या ताठर भूमिकेनंतर राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अचानक घडवून आणलेल्या शपथविधीमुळे खळबळ उडाली होती. मात्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्थापन केलेले सरकार अवघ्या काही तासांतच कोसळून अजित पवार माघारी गेल्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी नामुष्की ओढवली होती. दरम्यान, त्यावेळी पडद्यामागे घडलेल्या अनेक घडामोडी आणि त्यात असलेली शरद पवार यांची भूमिका याबाबत अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तेव्हाच्या घडामोडींबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. या मुलाखतीमध्ये २०१९ च्या त्या घडामोडींबाबत सांगताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांची मिस्ट्री समजून घ्यायची असले तर त्यांच्यां हिस्ट्रीमध्ये जावं लागेल. तेव्हाच तुम्ही ही मिस्ट्री समजू शकता. मी अगदी स्पष्टपणे सांगतो की, ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी असलेलं नातं तोडून मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणी सुरू केली. तसेच जसजशी ही बोलणी पुढे सरकू लागली तेव्हा उद्धव ठाकरे हे आमच्यासोबत येणार नाहीत, त्यांना खुर्चीची ओढ लागली आहे, याची जाणीव आम्हाला झाली. त्या काळात ते आमचा फोनही उचलत नव्हते. त्यावेळी सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे काय पर्याय आहेत, याची चाचपणी आम्ही सुरू केली. 

त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यासोबत येऊ शकते. आम्ही राज्याला स्थिर सरकार देऊ इच्छितो, असे सांगितले. त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली. त्यात महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन केलं जाईल, तसेच ते सरकार कसं स्थापन केलं जाईल, याबाबत आराखडा ठरवला गेला. अजित पवार आणि मी, आम्ही दोघे मिळून त्यासाठी पुढाकार घेऊ हेही ठरलं. आम्हा दोघांना सर्वाधिकार दिले गेले. त्याप्रमाणे आम्ही सर्व तयारी केली. मात्र सर्व तयारी झाल्यानंतर शरद पवार यांनी ऐनवेळी त्यातून माघार घेतली. आमचा शपथविधी होण्यापूर्वी तीन-चार दिवस आधी हे घडलं, असा दावा फडणवीस यांनी केला. 

ते पुढे म्हणाले की, त्यानंतर माझ्यासोबत येण्याशिवाय अजित पवार यांच्याकडे काही पर्याय नव्हता. कारण आम्ही सर्व तयारी पूर्ण केली होती. तसं केलं नसतं तर त्यांची अडचण झाली असती. त्यामुळे मी आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. एवढ्या सगळ्या बैठका झाल्या आहेत. स्वत: शरद पवार यांनी पुढाकार घेतलेला आहे. सर्व गोष्टी ठरल्या आहे. सर्व आमदार येतील. शरद पवार हेसुद्धा येतील, असं अजित पवार यांना वाटत होतं. मात्र शरद पवार आले नाहीत. त्यानंतर कोर्टात जे काही झालं ते सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आम्हाल सरकार सोडावं लागलं. मात्र मी वारंवार सांगतोय की, तेव्हा सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न आम्ही केला होता, त्याची सुरुवात शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच केली होती, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

शरद पवार यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला का, असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी केलेली ती दगाबाजी होती. त्यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं, असं म्हणता येईल. शरद पवार  आमच्यासोबत निवडून आलेले नव्हते. त्यांनी आमचा वापर करून घेतला, रणनीती आखली आणि एकप्रकारे आमची दिशाभूल करून निघून गेले. याला तुम्ही एकप्रकारचा डबलगेम म्हणू शकता. मात्र आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनीच केलं, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

अजित पवार आणि मी पहाटे अचानक उठून शपथविधीला गेलो नव्हतो. जे आधी ठरलं होतं. आम्हा दोघांवर जबाबादारी सोपवण्यात आली होती. त्यानुसारच तो शपथविधी घडला होता. मात्र नंतर सर्व गोष्टी बदलल्या, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Web Title: Morning swearing-in ceremony, Sharad Pawar's ploy, Devendra Fadnavis finally spoke, broke the big secret, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.