मासिक पाळी ही तर गर्वाची बाब! पुरुषांमध्येही जागृती व्हावी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 07:00 AM2019-05-28T07:00:00+5:302019-05-28T07:00:03+5:30

आजही समाजात मासिक पाळीबाबतचा ‘टॅबू’ कायम आहे...

Menstruation is a matter of pride! There should be awareness among man too | मासिक पाळी ही तर गर्वाची बाब! पुरुषांमध्येही जागृती व्हावी 

मासिक पाळी ही तर गर्वाची बाब! पुरुषांमध्येही जागृती व्हावी 

Next
ठळक मुद्देमासिक पाळी स्वच्छता दिन विशेष : स्वच्छतेचे नियम समजून घेण्याची गरज ‘हॅपी टू ब्लीड’ या चळवळीने सोशल मीडियावर धरला जोर मासिक पाळी आणि स्वच्छता, त्याच्याशी संबंधित चुकीच्या धार्मिक संकल्पना

- प्रज्ञा केळकर-सिंग- 
पुणे : आजही समाजात मासिक पाळीबाबतचा ‘टॅबू’ कायम आहे. स्त्रियांना मासिळ पाळी, त्यामागील शास्त्र, पाळीशी संबंधित अनिष्ट प्रथा याबाबत खुलेपणाने चर्चा करता यावी, यासाठी ‘हॅपी टू ब्लीड’ या चळवळीने सोशल मिडियावर जोर धरला. मात्र, ही चळवळ सामान्य स्त्रियांमध्ये अद्यापही रुजलेली नाही. याबाबत कुटुंब, शाळा, महाविद्यालय आणि एकूणच समाजामध्ये मोकळेपणाने बोलले गेले पाहिजे; कारण, मासिक पाळी ही तर गर्वाची बाब आहे, असे मत जाणकारांकडून नोंदवण्यात येत आहे. पुरुषांमध्येही मासिक पाळीबाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचे चित्रही पहायला मिळत आहे.
सोशल मिडियावर ‘हॅपी टू ब्लीड’ या चळवळीला स्त्रीवादी महिलांकडून बळ देण्यात आले. स्त्रियांनी याबाबत मनात कोणताही न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही, तो शरीरप्रक्रियेचा एक भाग आहे, मासिक पाळी आणि स्वच्छता, त्याच्याशी संबंधित चुकीच्या धार्मिक संकल्पना याबाबत विस्तृत चर्चाही झाली. मात्र, अजून सोशल मिडिया सुशिक्षित वर्गापुरताच मर्यादित राहिलेला आहे. निम्न स्तरातील महिलांशी बोलून, त्यांच्याशी संवाद साधून जनजागृती करण्याचे गरजेचे असल्याचे मत समाजबंध संस्थेचे प्रमुख सचिन आशा सुभाष यांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तवले.
मासिक पाळीबाबत महिलांच्या पुरुषांकडूनही काही अपेक्षा असतात. पुरूषांचा मासिक पाळीबाबतचा दृष्टीकोन शास्त्रीय, अभ्यासू, चिकित्सक, प्रयोगशील, समंजस, सहकार्याचा असावा. प्रत्येक पुरूषाने दररोजच्या संपर्कातल्या एखाद्या महिलेशी बोलून स्वत:चा दृष्टीकोन तपासून बघावा, मासिक पाळीच्या प्रक्रियेची संपूर्ण शास्त्रीय माहिती घ्यावी, या काळात महिलेची मानसिक स्थिती आणि भावनिक गरज समजून घ्यावी, मासिक पाळीच्या काळात महिलांनी काय करावं आणि काय करू नये हे ठरवण्याचा अधिकार, स्वातंत्र्य महिलांनाच द्यावे, त्यात सकारात्मक सहभाग घेण्याचा प्रयत्न करावा, अशा अपेक्षा महिलांनी व्यक्त केल्या आहेत.
वयात येणा-या मुलींच्या मनात मासिक पाळीबाबत अनेक गैैरसमज असतात. पिढ्यानपिढ्या हे समज एका पिढीकडून दुस-या पिढीकडे संक्रमित होत आलेले असतात. हे गैैरसमज दूर करत कुटुंबामध्ये याबाबत चर्चा होणे गरजेचे असते. आईने मुलींना, शिक्षिकांनी विद्यार्थिनींना, डॉक्टरांनी स्त्रियांना मासिक पाळीबाबत शास्त्रशुुध्द ज्ञान देत मनातील भीती काढून टाकणे आवश्यक आहे, असे मत शिक्षिका अश्विनी जाधव यांनी नोंदवले.
--------------
सोशल मिडियावर प्रत्येक महिला सक्रिय नसते. त्यामुळे ‘हॅपी टू ब्लीड’ ही चळवळ काही महिलांपुरतीच मर्यादित राहते. खालच्या स्तरातील स्त्रियांना याबाबत काहीच गंध नसतो. मासिक पाळी हा शरीरप्रक्रियेचा एक भाग आहे. त्याबाबत स्त्रियांनी कमीपणा वाटून घेण्याचे कारण नाही. घरातील स्त्रीला या काळात प्रत्येकाने पाठिंबा दिला पाहिजे. धार्मिक गोष्टींशी संबंध न जोडता पुरुषांनी अहंकार बाजूला ठेवून याबाबत अधिक जाणून घ्यावे. स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात जास्तीत जास्त स्वच्छता पाळावी. घरगुती कापड न वापरता सॅनिटरी पॅड वापरावे आणि योग्य विल्हेवाट लावावी. - डॉ. शुभदा देऊस्कर, स्त्रीरोगतज्ज्ञ
............
समाजबंधच्या माध्यमातून मासिक पाळीच्या जनजागृतीसाठी ‘प...पाळीचा’ हा उपक्रम राबवला जात आहे. मासिक पाळीविषयी शास्त्रीय दृष्टीकोन, अनिष्ट प्रथांना विरोध, शरीराविषयी न्यूनगंड पाळला जाऊ नये हा संदेश हा या उपक्रमाचा उद्देश आहे. जाहिराती, सोशल मिडिया यामुळे किमान महिला पाळीविषयी बोलू लागल्या आहेत. सर्व स्तरांतील स्त्रियांपर्यंत पोचून याविषयी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
- सचिन आशा सुभाष, समाजबंध संस्था

Web Title: Menstruation is a matter of pride! There should be awareness among man too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.