Marathi Bhasha Din: 'ट्विंकल ट्विंकल' पडतंय 'चांदोबा'ला भारी, घरातच अडकतेय मराठीची गाडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 04:58 PM2018-02-27T16:58:01+5:302018-02-27T17:47:58+5:30

परदेशात जन्मलेल्या, तिथेच लहानाचे मोठे झालेल्या मुलांचे मराठी भाषेचे ज्ञान फारच तोडके असते.

Marathi Bhasha Din: Children are not that connected to Marathi in Gulf Countries | Marathi Bhasha Din: 'ट्विंकल ट्विंकल' पडतंय 'चांदोबा'ला भारी, घरातच अडकतेय मराठीची गाडी 

Marathi Bhasha Din: 'ट्विंकल ट्विंकल' पडतंय 'चांदोबा'ला भारी, घरातच अडकतेय मराठीची गाडी 

Next

- यशोधन अभ्यंकर

परदेशात जन्मलेल्या, तिथेच लहानाचे मोठे झालेल्या मुलांचे मराठी भाषेचे ज्ञान फारच तोडके असते. काही बोटावर मोजण्याएवढे अपवाद वगळता, बहुतेकांची गाडी 'मराठीत संवाद साधता येतो' याच्या फारशी पलीकडे जात नाही. 

दोन तीन वर्षांची होईपर्यंत ही मुले 'ट्विंकल ट्विंकल' बरोबर 'चांदोबा चांदोबा भागलास का' पण ऐकत असतात. मराठीत बोलायला शिकलेली असतात. शाळा सुरू होण्यापूर्वी मात्र त्यांना इंग्रजीची सवय करावी लागते. सुरुवातीला शाळेतले शिक्षक देखील, 'मुलांशी घरी इंग्रजीतून बोला, म्हणजे त्यांना इथे अवघड जाणार नाही', असा सल्ला देतात. आता इथून पुढचा सगळा प्रवास इंग्रजीमधूनच होणार असतो

घराच्या चार भिंतींबाहेर, या मुलांचा मराठीशी संबंध संपतो. आजूबाजूची मुले, शिक्षक यापैकी कोणीच मराठीत बोलत नाहीत. मग घरी मराठी आणि बाहेर इंग्रजी असा प्रकार चालू होतो. जागरूक पालक मुलांशी जास्तीत जास्त मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांची मराठी भाषेशी जोडली गेलेली नाळ तुटणार नाही. 

घरात मराठीत संवाद साधणारी मुले, त्यांच्या अमराठी मित्रांशी साहजिकच इतर भाषेत बोलतात. खरी गंमत तेव्हा येते, जेव्हा दोन मराठी मुले एकमेकांशी बोलतात. एकमेकांशी मराठीत बोलणे सुरू झाल्यावर जेव्हा गप्पा मारायला लागतात, तेव्हा त्यांच्याही नकळत ते एकमेकांशी इंग्रजीत बोलायला लागतात. मग त्यांना आठवण करून द्यावी लागते, अरे तुम्ही दोघे मराठी आहात ना, मग मराठीत गप्पा मारा. मग थोडा वेळ मराठीत बोलल्यावर परत येरे माझ्या मागल्या.

मराठी अक्षरांशी त्यांची खरी ओळख होते हिंदीमुळे. केंद्रीय विद्यालयाच्या अभ्यासक्रमामुळे हिंदी शिकावे लागते. त्यामुळे आपसूकच मराठी वाचायला शिकतात. मातृभाषा मराठी असल्याने, इतर दक्षिण भारतीय मुलांपेक्षा यांना हिंदी जास्त चांगले समजते. पण प्रत्यक्षात मराठी वाड्मय मात्र त्यांना फारसे वाचायला मिळत नाही. चांगली गोष्टीची पुस्तके, मासिके या मुलांपर्यंत पोहोचतच नाहीत. मराठी साहित्याशी यांची ओळख होते, ती फक्त पु ल देशपांडे, व पु काळे यांची ध्वनिमुद्रित कथाकथने ऐकून. 

जो प्रकार साहित्याच्या बाबतीत, तोच इतर कलांच्या बाबतीत. चांगली मराठी नाटके, चित्रपट यापासून ही मुले चार हात लांब असतात. गंभीर विषयावरचे चित्रपट तळटिपा असल्याशिवाय बघू शकत नाहीत, कारण त्यांचा भाषेचा आवाकाच खूप छोटा असतो. मराठी गाणी आवडणारी मुले अगदी अभावाने सापडतात. गीतरामायणातली गाणी ऐकताना, त्यातल्या शब्दांचे अर्थ समजावून सांगावे लागतात, नाट्यसंगीत तर खूप दूरची गोष्ट. 

गल्फमधील बहुतेक सर्व देशात मराठी मंडळं आहेत. तिथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतल्यामुळे, थोडी फार मराठी कालाविश्वाशी तोंडओळख होते, इतकेच.

काही पालक मात्र, आपल्या मुलांना मराठी भाषेची आणि आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून मनापासून प्रयत्न करतात. रामायण, शिवकल्याण राजा अशा माध्यमांमधून मराठी भाषेची, गाण्यांची  आवड निर्माण करतात. अशा मुलांचे मराठी इतर मुलांपेक्षा खूप चांगले असते. इतर मुलांचे मराठी मात्र, संवाद साधायच्या फार पुढे जात नाही.

(लेखक गेली २३ वर्षं बहारिनमध्ये वास्तव्यास आहेत.)

Web Title: Marathi Bhasha Din: Children are not that connected to Marathi in Gulf Countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.