महाराष्ट्राला सनातनची नको, फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा हवी: मल्लिकार्जुन खर्गे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 07:05 PM2018-08-31T19:05:32+5:302018-08-31T19:06:43+5:30

भाजप-शिवसेनेचे सरकार सनातनसारख्या कट्टरवादी संघटनांना पाठबळ देते आहे.

Maharashtra should not seek Sanatan's, Phule-Shahu-Ambedkar ideology: Mallikarjun Kharge | महाराष्ट्राला सनातनची नको, फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा हवी: मल्लिकार्जुन खर्गे

महाराष्ट्राला सनातनची नको, फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा हवी: मल्लिकार्जुन खर्गे

Next

कोल्हापूर- भाजप-शिवसेनेचे सरकार सनातनसारख्या कट्टरवादी संघटनांना पाठबळ देते आहे. हे धोरण निषेधार्ह असून, महाराष्ट्राला सनातनची नव्हे तर फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा हवी असल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचा शुभारंभ करताना ते बोलत होते. येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात यात्रेच्या उद्घाटनीय कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना खर्गे यांनी मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. ते म्हणाले की, भारतात अनेक पंतप्रधान होऊन गेले. पण कोणत्याही पंतप्रधानांनी जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणे लावण्याचे उद्योग केले नाहीत. परंतु मोदी सरकारच्या काळात देशातील वातावरण प्रचंड कलुषित केले जात आहे. आजवर कोणत्याही पंतप्रधानांनी आपला स्तर सोडला नाही. पण मोदींनी सर्व मर्यादा पार केल्या आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस देशामध्ये एकता कायम ठेवण्यासाठी लढाई लढते आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा केवळ निवडणूक जिंकण्यासाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी नाही. तर ही तत्त्वांची लढाई आहे.

संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात झालेल्या मेळाव्याला माजी मंत्री आ. मधुकरराव चव्हाण, ज्येष्ठ नेते कलाप्पा आवाडे, जयवंतराव आवळे, खा. कुमार केतकर, आ. शरद रणपिसे, आ. बसवराज पाटील, आ. आनंदराव पाटील, आ. डी.पी. सावंत, आ. विरेंद्र जगताप, आ. हुस्नबानो खलिफे, आ. रामहरी रूपनवर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुवा, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, महापौर शोभाताई बोंद्रे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्यासह अनेक प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रात परिवर्तन अटळ: खा. अशोक चव्हाण

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनीही यावेळी सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, भाजप-शिवसेनेने महाराष्ट्राचा अपेक्षाभंग केला आहे, फसवणूक केली आहे. म्हणून या सरकारला फडणवीस सरकार नव्हे तर फसणवीस सरकार म्हटले जाते. निवडणुकीच्या काळात दाखवलेले स्वप्न आणि आज राज्याची झालेली दुर्दशा पाहता 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?' असे विचारण्याची वेळ आली आहे. भाजप-शिवसेनेच्या सरकारविरूद्ध राज्यात प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे. २०१९ मध्ये या सरकारचे विसर्जन होणार, हे निश्चित आहे. भाजप-शिवसेनेला राज्याच चालवणे जमलेले नाही आणि ज्यांना हे जमत नाही, त्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. हे सरकार केवळ घोषणाबाज सरकार आहे. पण केलेल्या घोषणा पूर्ण करायला या सरकारकडे पैसाच शिल्लक नाही. म्हणूनच सतत दरवाढ, करवाढ करून जनतेवर नाहक आर्थिक बोजा लादला जात असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. काँग्रेसला भयमुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे. लोकांना सरकारची भीक नको तर त्यांचे हक्क हवे आहेत आणि यासाठीच पुढील निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यावेळी सांगितले. 

खोट्या घोषणांचा पर्दाफाश करणार: पृथ्वीराज चव्हाण

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या खोट्या घोषणांचा पर्दाफाश करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने मागील ४ वर्षात काय दिवे लावले? कोणती आश्वासने पूर्ण केली? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. निवडणूक प्रचारात भाजपने भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे आश्वासन दिले होते. नरेंद्र मोदी यांनी तर 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' अशी वल्गना केली होती. पण प्रत्यक्षात सर्वत्र भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. भ्रष्टाचार दडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकार सातत्याने लोकविरोधी निर्णय घेतले जात आहेत. त्याचा अतिशय प्रतिकूल परिणाम होत असताना सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही. या सर्व बाबींचा जनसंघर्ष यात्रेत समाचार घेतला जाईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

फुले-शाहू-आंबेडकरांची तसबीर लावणेही देशद्रोह!- राधाकृष्ण विखे पाटील 

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या राजवटीत घरात फुले-शाहू-आंबेडकरांची तसबीर लावणेही देशद्रोह ठरल्याचा ठपका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी ठेवला. नक्षलवादाच्या नावाखाली विचारवंत आणि साहित्यिकांवर होत असलेल्या दडपशाहीच्या अनुषंगाने त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हैद्राबाद येथील कवि वरावरा राव यांच्यावरील कारवाईचा संदर्भ देताना ते म्हणाले की, त्यांच्या मुलींच्या घराची झडती घेताना पुणे पोलिसांनी त्यांना हिंदू असताना घरी देवी-देवतांऐवजी फुले-आंबेडकरांच्या तसबीरी का लावता? असा संतापजनक सवाल केला. हे सरकार फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु, ही विचारधारा समाजात इतकी खोलवर रूजली आहे की, त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर येथील जनता भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे हे सरकार समूळ उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही विरोधी पक्षनेत्यांनी दिला.

हे सरकार फक्त ३-४ भांडवलदारांचे: बाळासाहेब थोरात

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे हे सरकार ना शेतकऱ्यांचे आहे, ना कामगारांचे आहे, ना व्यापाऱ्यांचे आहे. तर हे फक्त मोजक्या ३-४ भांडवलदारांचे सरकार असल्याचे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आ. बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ते म्हणाले की, या सरकारने लोकांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. काँग्रेस आघाडी सरकारचे निर्णय आणि वर्तमान युती सरकारच्या निर्णयांचा तुलनात्मक उहापोह करून थोरात यांनी या देशातील जनता पुन्हा काँग्रेसलाच निवडून देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Web Title: Maharashtra should not seek Sanatan's, Phule-Shahu-Ambedkar ideology: Mallikarjun Kharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.