Lok Sabha Election 2019 : किरीट सोमय्या यांची उमेदवारी गुलदस्त्यातच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 11:31 AM2019-03-22T11:31:06+5:302019-03-22T11:32:52+5:30

भाजपकडून ईशान्य मुंबई मतदार संघातील उमेदवारी निश्चित करण्यात आली नसून भाजप नवीन चेहऱ्याच्या शोधात तर नाही ना, अशी चर्चा आहे.

Lok Sabha Election 2019: Kirit Somaiyas candidature not announced | Lok Sabha Election 2019 : किरीट सोमय्या यांची उमेदवारी गुलदस्त्यातच

Lok Sabha Election 2019 : किरीट सोमय्या यांची उमेदवारी गुलदस्त्यातच

Next

मुंबई - भारतीय जनता पक्षाने गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी १८४ उमेदवारांची यादी जाहीर केली. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांचा समावेश आहे. यामध्ये मुंबईतून पूनम महाजन आणि गोपाल शेट्टी यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. परंतु ईशान्य मुंबईतून इच्छूक असलेले खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीचा निर्णय भाजपकडून अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आला आहे.

किरीट सोमय्या यांना उमेदवारी न देण्यासाठी शिवसेना आक्रमक आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात युतीसंदर्भात झालेल्या चर्चेत शिवसेनेने तीन अटी ठेवल्या होत्या. यापैकी एक म्हणजे किरीट सोमय्या यांची उमेदवारी रद्द करवी, अन्यथा आम्ही सोमय्या यांचा प्रचार करणार नाही, असं म्हटले होते. यावर भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून देखील ईशान्य मुंबई मतदार संघातील उमेदवारी निश्चित करण्यात आली नसून भाजप नवीन चेहऱ्याच्या शोधात तर नाही ना, अशी चर्चा आहे.

मुंबई महानगर पालिका निवडणुकीत किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर अनेक आरोप केले होते. त्यामुळे नाराज असलेल्या शिवसैनिकांनी आमच्यावर कारवाई करा, पण लोकसभा निवडणुकीत सोमय्या यांचा प्रचार आम्ही करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यातच पहिल्या यादीत ईशान्य मुंबईची उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भाजपकडून महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बहुतांश विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिल्याचं पाहायला मिळालं, नागपूरमधून नितीन गडकरी, रावेरमधून एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे, जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुभाष भामरे, चंद्रपूर येथून हंसराज अहिर, नंदुरबारमधून डॉ. हिना गावित, अकोला लोकसभा मतदारसंघातून संजय धोत्रे, भिवंडीतून कपिल पाटील, उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी, बीडमधून प्रीतम मुंडे, मुंबई पश्चिम मध्य मुंबईतून पूनम महाजन, वर्धा येथून रामदास तडस, चिमूरमधून अशोक नेते, सांगली येथून संजयकाका पाटील या विद्यमान खासदारांना भाजपाने पुन्हा संधी दिली आहे.

दरम्यान अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट करत याठिकाणी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे पाटील यांना संधी देण्यात आली आहे. तर लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील गायकवाड यांच्याऐवजी सुधाकरराव श्रृंगारे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

 

 

Web Title: Lok Sabha Election 2019: Kirit Somaiyas candidature not announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.