श्री एकविरा देवीच्या महानवमी होमाला हजारो भाविक उपस्थित
By admin | Published: October 10, 2016 01:00 PM2016-10-10T13:00:56+5:302016-10-10T13:06:22+5:30
महाराष्ट्रातील लाखों भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कार्ला गडावरील श्री एकविरा देवीचा महानवमी होम आज पहाटे
Next
>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. १० - महाराष्ट्रातील लाखों भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कार्ला गडावरील श्री एकविरा देवीचा महानवमी होम आज पहाटे ४:३० वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार अनंत तरे व विश्वस्त तसेच पुरोहितांच्या हस्ते हजारों भाविकांच्या उपस्थिती मध्ये पेटविण्यात आला. महानवमी होम व देवीच्या दर्शनासाठी हजारों भाविकांनी रविवारी रात्री पासूनच गर्दी केली होती.
घटस्थापनेने देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला १ आँक्टोबर रोजी सुरुवात झाली होती. तेव्हा पासून गडावर देवीचा सप्तशृंगी पाठ व चंडीका पाठ सुरु होते. आज महानवमीच्या दिवशी होमात पुर्णाहुती देत नवरात्राची सांगता होणार आहे. नवरात्र उत्सवात देवीच्या होमाला प्रचंड महत्व असल्याने हजारों भाविक भल्या पहाटे होमाच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. काही दूरवरुन आलेली भाविक रात्रीच गडावर मुक्कामी आले होते. पहाटे ३ वाजल्यापासून मंदिरात धार्मिक विधी व पुजाअर्चा सुरु करण्यात आली. ४ वाजता विधीवत अभिषेक करुन देवीची पहाटेची आरती करत मंदिरा शेजारील मोकळ्या जागेत होम पेटविण्यात आला. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे, उपाध्यक्ष मदन भोई, खजिनदार नवनाथ देशमुख, सचिव संजय गोविलकर, विश्वस्त काळूराम देशमुख, विलास कुटे, विजय देशमुख, गुरव समाजाचे अध्यक्ष अँड. जयवंत देशमुख, शरद कुटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. गडावर देवीचे व होमाचे दर्शन भाविकांना सुलभतेने घेता यावे याकरिता लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील यांच्यासह उपनिरीक्षक अनिरुध्द गिझे, शिवाजी दरेकर, उपनिरीक्षक देशमुख मँडम व कर्मचारी यांनी योग्य नियोजन व बंदोबस्त तैनात केला होता.
नवरात्र उत्सवाच्या काळात जवळपास ३ लाख भाविकांनी गडावर येऊन देवीचे दर्शन घेतले अशी माहिती अनंत तरे यांनी दिली. तरे म्हणाले गडावर भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी सुसज्ज दर्शन रांग बनविण्यात आली असून भविष्यात देवीच्या मंदिरापर्यत भाविकां येता यावे याकरिता रस्ता तसेच लिफ्टची सुविधा उपलब्ध करण्याचा ट्रस्टचा मानस आहे. शासनाकडे देखिल निधीची मागणी करण्यात आली असून भाविकांच्या या श्रध्दास्थानाच्या विकासाकडे शासनाने गांर्भियांने पाहण्याची गरज आहे.