बारावीचा इंग्रजीचा पेपर तासाभरातच फुटला; माहिती देणाऱ्या तरुणाचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 01:43 PM2018-02-21T13:43:06+5:302018-02-21T15:10:01+5:30

परीक्षा सुरु झाल्यानंतर तासाभरातच इंग्रजीचा पेपर व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाला.

HSC exam Maharashtra English paper leaked on whatsapp | बारावीचा इंग्रजीचा पेपर तासाभरातच फुटला; माहिती देणाऱ्या तरुणाचे अपहरण

बारावीचा इंग्रजीचा पेपर तासाभरातच फुटला; माहिती देणाऱ्या तरुणाचे अपहरण

सोलापूर: पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना केल्याचा दावा करणारे राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण माध्यमिक मंडळ बुधवारी बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तोंडघशी पडले आहे. आज बारावीची परीक्षा सुरु झाल्यानंतर तासाभरातच इंग्रजीचा पेपर व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाला. सोलापूरच्या तांबेवाडी येथील वसंत महाविद्यालयाच्या परिसरातील काही जणांच्या मोबाईलमध्ये ही प्रश्नपत्रिका आढळून आली. पण पेपर फुटला असला तरी ही प्रश्नपत्रिका परीक्षा हॉलमधून बाहेर कशी आली, याचा खुलासा झालेला नाही. सेक्शन ए, बी आणि सी या प्रश्नपत्रिका लीक झाल्या आहेत. 

यंदा बारावीच्या परीक्षेदरम्यान पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण माध्यमिक मंडळाकडून कठोर उपाययोजना करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. कॉपीमुक्त परीक्षेसाठी राज्यभरात 252 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. व्हॉट्सअॅपवरून पेपर फुटण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्रश्नपत्रिकांचे सिलबंद पाकीट पर्यवेक्षकांनी परीक्षा केंद्रातील 2 विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेतल्यानंतरच उघडण्याचा निर्णय घेतला होता. व्हॉट्सअॅप पेपरफुटीला आळा घालण्यासाठी पेपरला उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. गेल्यावर्षी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणा-या प्रश्नपत्रिकेमुळे यंदा विशेष खबरदारी घेत वर्गातच 10 वाजून 50 मिनिटाला प्रश्नपत्रिकांचे पाकीट उघडण्यात येणार होते. मात्र, इतके करूनही अवघ्या तासाभरातच इंग्रजीचा पेपर फुटल्याने मंडळाची चांगलीच नाचक्की झाली आहे. 
 

Web Title: HSC exam Maharashtra English paper leaked on whatsapp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.