जीएसटी गेमचेंजर ठरेल
By admin | Published: June 9, 2017 05:38 AM2017-06-09T05:38:29+5:302017-06-09T05:38:29+5:30
वस्तू व सेवा कर (जीएसटी)च्या अंमलबजावणीनंतर दोन वर्षांत देशाचा विकासदर सात टक्क्यांवरून नऊ ते साडेनऊ टक्कयांपर्यंत पोहचेल,
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वस्तू व सेवा कर (जीएसटी)च्या अंमलबजावणीनंतर दोन वर्षांत देशाचा विकासदर सात टक्क्यांवरून नऊ ते साडेनऊ टक्कयांपर्यंत पोहचेल, असे भाकीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी वर्तविले. कोणतेही आर्थिक अरिष्ट नसताना आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबविणारे मोदी सरकार हे स्वतंत्र भारतातील पहिलेच सरकार असून जीएसटी गेमचेंजर ठरेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल षण्ण्मुखानंद सभागृहात मुंबई भाजपाने मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी राजनाथ सिंह यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुंबईतील भाजपाचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, स्वतंत्र भारतात काँग्रेसव्यतिरिक्त कोणत्याच पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. २०१४ साली प्रथमच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या कर्मठ आणि समर्पित कार्यकर्त्यांनी इतिहासाला कलाटणी दिली. आज देशातील तेरा राज्यात भाजपाचे मुख्यमंत्री आहेत तर तीन राज्यात भाजपा आघाडी सत्तेवर आहे. महाराष्ट्रात कधी भाजपाचा मुख्यमंत्री असेल असे मला स्वत:ला वाटत नव्हते, असे राजनाथ सिंह म्हणाले.
देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जो विश्वास दाखविला तो त्यांनी आपल्या कामगिरीने सार्थ ठरविला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात देशातील जनतेचा राजकारणावरचा विश्वास उडाला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार सत्तेत आल्यानंतर जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यास आम्हाला यश आले आहे. काँग्रेसच्या काळात होलसेलमध्ये भ्रष्टाचार व्हायचा. तीन वर्षांच्या आमच्या कामगिरीत कट्टर विरोधकसुद्धा आमच्यावर भ्रष्टाचाराचा साधा आरोपसुद्धा करु शकत नाहीत, असे सिंह म्हणाले.
सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती नेहमीच चालू असतात.मात्र आता त्या सहन केल्या जाणार नाहीत. भारत पहिली गोळी चालविणार नाही. मात्र जर समोरून गोळी आली तर इतक्या गोळया आमच्याकडून चालतील की समोरच्याला त्या मोजताही येणार नाहीत, असा इशाराही राजनाथ सिंह यांनी यावेळी दिला.
>देवेंद्र फडणवीस यांना साथ द्या
शेतकऱ्यांप्रती आम्ही संवेदनशील आहोत. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काहीजण राजकारण करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान शेतकऱ्यांच्या विकासासाठी मेहनत घेत आहेत. हे दोन्ही मुख्यमंत्री ज्या तडफेने आणि निष्ठेने काम करत आहेत, असे काम मीसुद्धा मुख्यमंत्री म्हणून करु शकलो नाही.
अलीकडेच उद्भवलेल्या प्रश्नही त्यांनी योग्य पद्धतीने हाताळले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा हा नेता आहे त्याला राज्यातील जनतेने शेतकऱ्यांनी साथ द्यावी, असे आवाहन राजनाथ यांनी करताच सभागृहातील भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा जयघोष केला.
महाराष्ट्राच्या पाठीशी केंद्र हिमालयाप्रमाणे उभे - मुख्यमंत्री
महाराष्ट्राला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकाळात जितकी मदत मिळाली नाही त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त मदत गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारकडून मिळाली आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी हिमालयाप्रमाणे भक्कमपणे उभे राहिले आहे. दुष्काळातील भरघोस मदत असो किंवा राज्यात रस्ते, रेल्वे आदी विकासकामे महाराष्ट्राला केंद्राकडून सर्वाधिक निधी मिळाला आह, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.