डिसेंबर अखेर ‘स्लीपर शिवशाही’ धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 04:41 IST2017-12-08T04:41:20+5:302017-12-08T04:41:30+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शयनयान (स्लीपर) शिवशाही आता प्रवासी सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज होत आहे. डिसेंबरअखेर वातानुकूलित शिवशाही आंतरराज्य मार्गावर धावणार आहेत.

डिसेंबर अखेर ‘स्लीपर शिवशाही’ धावणार
महेश चेमटे
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शयनयान (स्लीपर) शिवशाही आता प्रवासी सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज होत आहे. डिसेंबरअखेर वातानुकूलित शिवशाही आंतरराज्य मार्गावर धावणार आहेत. ही शिवशाही ३० आसनी असणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुणे येथून आंतरराज्य मार्गावर ही स्लीपर शिवशाही धावणार आहे. भाडेतत्त्वावर असलेल्या १५० शिवशाही मार्च अखेर रस्त्यावर उतरतील. ‘स्लीपर शिवशाही’मुळे एसटी महामंडळाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला जाणार आहे.
एसटी महामंडळाची वातानुकूलित आणि अत्याधुनिक ‘ड्रीम एसटी’ म्हणून शिवशाही ओळखली जाते. २ बाय १ अशी आसन व्यवस्था असलेल्या या बसमध्ये एकूण ३० प्रवासी एकाचवेळी प्रवास करू शकतील. पूर्ण वातानुकूलित असलेल्या या एसटीत मोबाइल चार्जिंगसह मोबाइल रॅकची सोय आहे. बैठक आसनी शिवशाहीप्रमाणे सर्व सुविधा या बसमध्येदेखील आहेत. प्रवाशांच्या मागणीनुरूप चादर आणि उशी महामंडळातर्फे प्रवाशांना पुरवण्यात येईल.
पहिल्या टप्प्यांतर्गत ४६० शिवशाही एसटी ताफ्यात दाखल होतील. सध्या १०७ शिवशाही महामंडळाच्या ताफ्यात आहेत. यात महामंडळाच्या स्वमालकीच्या ७० आणि भाडेतत्त्वावर ३७ बसेसचा समावेश आहे.
मुंबई आणि पुणे येथून आंतरराज्य मार्गावर स्लीपर शिवशाही धावणार आहे. मुंबई-हैदराबाद, मुंबई-पणजी आणि मुंबई-नागपूर अशा संभाव्य मार्गावरून स्लीपर एसटी धावणार आहे. पुणे येथून पुणे-सुरत, पुणे-पणजी आणि पुणे-इंदौर या संभाव्य मार्गावर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मार्च अखेर २ हजार शिवशाही महामंडळाच्या ताफ्यात दाखल होतील. त्यात स्लीपर शिवशाहीचादेखील समावेश आहे. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर तीन टप्प्यांत प्रवासी सेवेत त्या दाखल होतील. पहिल्या टप्प्यांतर्गत डिसेंबरअखेर स्लीपर शिवशाही महामंडळातील प्रवाशांसाठी उपलब्ध होतील. लांब पल्ल्यांच्या अंतरावर त्या चालवण्यात येतील.
- रणजीत सिंह देओल,
एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक