मुंबई - दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास अपयशी ठरलेल्या राज्य सरकारवर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घणाघाती टीका केली आहे. 1 ऑक्‍टोबरपासून कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची सरकारची घोषणा फोल ठरली असून, दिवाळीपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासनही सरकार पाळू शकलेले नाही. शेतकऱ्यांची दिवाळी अंधःकारमय करणाऱ्या या सरकारला आता शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचाही नैतिक अधिकार राहिलेला नाही, अशी टीका विखे-पाटील यांनी केली आहे. 

अहमदनगर जिल्‍ह्यातील सर्व तालुका काँग्रेस कमिटींचे नवनिर्वाचित अध्‍यक्ष,पदाधिकारी आणि शिर्डी विधानसभा मतदार संघातील नुकत्‍याच निवडून आलेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्‍यांच्या सत्‍कार समारोहात ते बोलताना त्यांनी ही टीका केली.  कार्यक्रमाला संबोधित करताना विखे पाटील यांनी राज्यातील अनेक प्रश्नांचा उहापोह केला. कर्जमाफीसंदर्भात सरकारची उदासीनता चव्हाट्यावर आणताना ते म्हणाले की, "दिवाळीपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने आता घुमजाव केले आहे. बॅंकांकडून माहिती न आल्यामुळे दिवाळीपूर्वी कर्जमाफी शक्य नसल्याचे सहकार मंत्र्यांनी म्हटले आहे.राज्‍यातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा दिमतीला असताना सरकारशेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती जमा करू शकत नसेल तर हे सरकारचे राज्यावर नियंत्रण नसल्याचे प्रतीक आहे."
 
सरकारकडून केवळ घोषणाबाजीच सुरू आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे."या सरकारचे केवळ घोषणाबाजी करून वेळ मारून नेण्‍याचे काम सुरु आहे. गोबेल्‍स नीतीप्रमाणे केवळ मीडियात फोटो छापून स्‍वत:चीच पाठ थोपटून घेण्याचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे. सर्वसामान्‍य नागरिक आणि शेतकऱ्यांची वारंवार फसवणूक करणाऱ्या या सरकारच्‍या विरोधात जनतेचा असंतोषतीव्र झाला असून, नांदेडचा महानगर पालिका निवडणुकीचा निकाल या सरकारला जनतेने हाणलेली सणसणीत चपराक आहे. राज्‍याला अंधारात लोटणाऱ्या सरकारला आता नागरिकांना दिवाळीच्‍या शुभेच्‍छा देण्‍याचा नैतिक अधिकारही राहिलेला नाही." 

नांदेड महानगर पालिकेत काँग्रेसपक्षाला मिळालेले अ‍भूतपूर्व यश हे सरकारच्‍या विरोधातील असंतोषाचा उद्रेक असून, मतदारांनी सरकारला एकप्रकारे धडा शिकवला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालासंदर्भात सोशल मीडियावरूनभारतीय जनता पक्षाने चुकीची आकडेवारी मांडली. पण या निवडणुकीत देखील काँग्रेस पक्षानेच सर्वाधिक जागा जिंकल्‍या, ही वस्तुस्थिती असल्याचे विरोधीपक्षनेत्यांनी सांगितले. ग्रामपंचायत निकालांची वस्‍तुस्थिती जाणून न घेतापंतप्रधानांनी राज्यातील भाजप नेत्यांचेअभिनंदन केले, ही बाब दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले.