दक्षिण मुंबईत दर रविवारी सायकल ट्रॅक, एनसीपीए ते सी-लिंक दरम्यान २२ किमीचा ट्रॅक प्रस्तावित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 20:18 IST2017-10-05T20:18:35+5:302017-10-05T20:18:45+5:30
प्रदूषणमुक्त मुंबईसाठी सायकलला प्रोत्साहन देण्याचे धोरण मुंबई महापालिकेने यापूर्वीच अवलंबले आहे. त्यानुसार मोफत सायकल पार्किंग सेवेनंतर आता सायकल ट्रॅक तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

दक्षिण मुंबईत दर रविवारी सायकल ट्रॅक, एनसीपीए ते सी-लिंक दरम्यान २२ किमीचा ट्रॅक प्रस्तावित
मुंबई- प्रदूषणमुक्त मुंबईसाठी सायकलला प्रोत्साहन देण्याचे धोरण मुंबई महापालिकेने यापूर्वीच अवलंबले आहे. त्यानुसार मोफत सायकल पार्किंग सेवेनंतर आता सायकल ट्रॅक तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. चर्चगेट स्टेशनजवळ असणा-या एनसीपीएपासून ते वरळी सी-लिंकपर्यंत दर रविवारी व काही शनिवारी सकाळी ६ ते ११ या वेळेत सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे सायकलप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
मुंबईच्या रस्त्यांवर गाड्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने सायकल टू वर्क म्हणजेच घर ते कार्यालय सायकलवरून प्रवास करण्याचे प्रोत्साहन देण्यासाठी दक्षिण मुंबईत मोफत सायकल पार्किंग सेवा गेल्या वर्षी जुलै महिन्यात आणली. त्यानंतर आता सायकल ट्रॅक तयार करण्याचे प्रस्तावित आहे. हा सायकल ट्रॅक एनसीपीए - नेताजी सुभाष मार्ग (मरिन ड्राइव्ह), बाबुलनाथ, गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड), ऍनी बेझंट मार्ग, खान अब्दुल गफ्फार खान मार्ग, राजीव गांधी सागरी सेतू (वरळी सी-लिंक) अशा सुमारे ११ किमीच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा म्हणजेच २२ किमी एवढ्या अंतराचा प्रस्तावित करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
या सुमारे २२ किमीच्या सायकल ट्रॅकसाठी पायाभूत सुविधा महानगरपालिकेतर्फे तयार केल्या जाणार आहेत. तर दर रविवारी व काही शनिवारी सायकल ट्रॅकचे व्यवस्थापन, संचलन व समन्वय करण्यासाठी महापालिकेने इच्छुक उद्योग समूह, स्वयंसेवी संस्था इत्यादींकडून प्रस्ताव मागविले आहेत. निवड होणा-या संस्थेला हे काम प्रायोजित करण्याच्या अटी व शर्तींवर जाहिरात करता येणार आहे. याबाबत इच्छुक उद्योग समूह, स्वयंसेवी संस्था १३ ऑक्टोबर २०१७ पर्यंत महापालिकेच्या 'ए' विभाग कार्यालयाशी संपर्क साधून आपले प्रस्ताव सादर करावे असे आवाहन पालिकेने केले आहे.