काँग्रेसने ७२ वेळा संविधान तोडले- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 11:23 PM2018-05-25T23:23:39+5:302018-05-25T23:23:39+5:30

काँग्रेस समाजात गैरसमज पसरवून भोळ्या आणि गरीब जनतेला भीती दाखवून मतांचे राजकारण केले.

Congress break constitution several times says Nitin gadkari | काँग्रेसने ७२ वेळा संविधान तोडले- नितीन गडकरी

काँग्रेसने ७२ वेळा संविधान तोडले- नितीन गडकरी

googlenewsNext

भंडारा : ६० वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसनेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान ७२ वेळा तोडले. भाजपाने कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही, तरीही काँग्रेस समाजात गैरसमज पसरवून भोळ्या आणि गरीब जनतेला भीती दाखवून मतांचे राजकारण केले, असा आरोप केंद्रीय महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केला.

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारार्थ भंडारा येथे आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.डॉ.विकास महात्मे, माजी खा.शिशुपाल पटले, उमेदवार हेमंत पटले, आ. रामचंद्र अवसरे, आ.विकास कुंभारे, आ.मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाध्यक्ष तारीक कुरेशी, नागपूरचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार, विकास तोतडे, नगराध्यक्ष सुनील मेंढे, डॉ.प्रकाश मालगावे, रोशनी पटेल, अविनाश ठाकरे, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे उपस्थित होते.

रामभाऊ अस्वले, लक्ष्मणराव मानकर, श्यामरावबापू कापगते, बापूसाहेब लाखनीकर या कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भाजपचा विचार समाजात पोहोचवल्याचे सांगून ना.गडकरी म्हणाले, त्यावेळी मानसन्मान मिळत नव्हता, प्रतिष्ठा नव्हती तरीही या कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम केले. अशा असंख्य कार्यकर्त्यांचा हा पक्ष असून त्यानंतर नवीन लोकांना पक्षाशी जोडण्याचा निर्णय घेतला. त्यांना सामावून घेतले. अशावेळी नाना पटोले आमच्याकडे आले. प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करण्यासाठी मला लोकसभेची उमेदवारी द्या, अशी मागणी केली. आम्ही सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना उमेदवारी दिली. प्रचंड मतांनी ते निवडूनही आले होते. परंतु आता मात्र प्रफुल्ल पटेल यांचा झेंडा घेऊन ते मते मागत आहेत. राजकारण हे विचारासाठी असते. विचारात मतभेद समजू शकतात पण मनभेद नको. ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि कार्यकर्तेच आमची ताकद असल्याचेही ना.गडकरी म्हणाले.

महाराष्ट्राला मी १ लाख कोटी रूपये दिले. ४४० कोटींचा गोसेखुर्द प्रकल्प १८ हजार कोटींचा कसा झाला हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला विचारा? आमच्याबद्दल खोटा प्रचार, जातीयतेचे विष लोकांच्या मनात कालवून, भीती दाखवून मते मागितली जातात. पण सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय प्रस्थापित केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही, असेही नितीन गडकरी म्हणाले.
 

Web Title: Congress break constitution several times says Nitin gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.