धन्य धन्य निवडणूक

By Admin | Published: October 2, 2014 10:10 PM2014-10-02T22:10:11+5:302014-10-02T22:23:09+5:30

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रंग राजकारणाचे

Blessed Blessed Election | धन्य धन्य निवडणूक

धन्य धन्य निवडणूक

googlenewsNext

प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, असं म्हणतात. पण आता प्रेम आणि युद्धासोबत राजकारणातही सर्व काही माफ असतं, असं म्हणायची वेळ आली आहे. खुर्चीवरचं प्रेम आणि खुर्चीसाठी युद्ध असा दोन्हीचा मिलाफ राजकारणात दिसत असल्यामुळे राजकारणातही सर्व काही माफ करायची वेळ आली आहे. राजकारण ही खरं तर आताची नवीन गोष्ट नाही. ते फार पूर्वीपासून केलं जातंय. पण आताच्या राजकारणाला जे रंग दिसू लागले आहेत, ते मात्र याआधी कधीच दिसले नव्हते. आताच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेभरवशीपणा. कुठल्याही राजकीय पक्षाचे अध्यक्षही आपल्या पक्षातील कोण कुठे आहेत आणि कुठे जातील, याचा भरवसा देऊ शकत नाहीत. जे आपल्या पक्षाच्या नेत्यांचा विश्वास जिंकू शकत नाहीत, ते मतदारांकडून मात्र विश्वासाची अपेक्षा ठेवतात, असं अजब चित्र राजकारणात दिसत आहे. कुठलाही जिल्हा याला अपवाद नाही. प्रत्येक जिल्ह्यात कुणी ना कुणी बड्या नेत्याने पक्षांतर केलेले दिसते. या पक्षांतराला कितीही सबबी दिल्या जात असल्या तरी स्वार्थ हेच त्यामागचे एकमेव कारण आहे. अनेक वर्षे ज्या पक्षात विविध पदे उपभोगली, त्या पक्षातून तडकाफडकी बाहेर पडून दुसऱ्या पक्षाची उमेदवारी हातात घेऊन पक्षांतराची घोषणा करण्यामागे दुसरे काही कारण असू शकते का? ही कारणे न समजण्याइतके लोक मूर्ख नाहीत. किंवा राजकीय पक्षांनी लोकांना इतके मूर्ख समजू नये. तसं पाहिलं तर पक्षांतर हाही नवीन विषय नाही. वर्षानुवर्षे राजकारणात पक्षांतरे सुरू आहेत. पण आता त्याला कसला धरबंधच राहिलेला नाही. कोणीही कधीही पक्षांतर करू लागले आहेत. पक्षांतरासाठी निवडणुकीचा मुहूर्त तर साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो की काय, असं वाटण्यासारखी पक्षांतरे निवडणुकीच्या तोंडावर केली जातात. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणही गेल्या काही वर्षात पूर्णपणे बदलून किंवा बिघडून गेले आहे. पैशाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या निवडणुकीत पक्षांतराचा मुद्दा फारसा नव्हता. पण यावेळी पैशाबरोबरच पक्षांतरही गाजत आहे. रत्नागिरीत उदय सामंत यांनी केलेले पक्षांतर हे नेमके कशासाठी, याचा अधिकृत उलगडा कोणालाही झालेला नाही. दापोली मतदार संघात किशोर देसाई यांनी बंडखोरी केली आहे. पक्षाने उमेदवारी दिली नाही, म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, हे एका मर्यादेपर्यंत मान्यही करता येते. पण उदय सामंत यांना पक्षाने तिकीट नाकारले नव्हते. ते मावळत्या सरकारमधील मंत्री होते. त्यांच्यावर झालेल्या पक्षांतर्गत अन्यायाची दखल घेऊन त्यांना शेवटचे काही महिने मंत्रीपदही देण्यात आले होते. मात्र, तरीही त्यांनी केलेले पक्षांतर अनाकलनीय आहे. आताच्या घडीला राजकीय लोकांनी सर्वसामान्य माणसाला विचारात घेतले नाही तर त्यांना लोकही विचारात घेणार नाहीत. उदय सामंत यांना दोनवेळा राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून देण्यामागे मतदारांच्या मनात त्यांच्याबद्दलच्या काही कल्पना असणारच ना? आता सामंत यांनी केलेल्या पक्षांतराला सर्वसामान्य माणसांकडून सकारात्मकच प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा करणे, जरा जास्तच होईल. आता काहीही गृहीत धरा, पण सर्वसामान्य माणसाला गृहीत धरू नका. सामान्य माणूस हुशार आहे आणि तो काय करू शकतो, हे सर्वांना दिसलंच आहे. तेव्हा राजकारणाचे रंग दाखवताना सावध राहा.

-मनोज मुळ्ये

Web Title: Blessed Blessed Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.