‘कोरेगाव भीमा हिंसाचार घडविण्यासाठी मोठे षडयंत्र’, ‘कम्युनिस्ट पार्टीशी असलेल्या संबंधांचा तपास करणे गरजेचे’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 06:29 AM2018-12-25T06:29:18+5:302018-12-25T06:29:56+5:30

कोरेगाव भीमा हिंसाचार घडवण्यासाठी मोठे षड्यंत्र रचण्यात आले होते आणि त्याचे फार गंभीर परिणाम झाले, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात प्रा. आनंद तेलतुंबडे यांना दिलासा देण्यास नकार देताना नोंदविले.

 'Big conspiracy to create violence in Koregaon,' should be investigated in connection with communist party ' | ‘कोरेगाव भीमा हिंसाचार घडविण्यासाठी मोठे षडयंत्र’, ‘कम्युनिस्ट पार्टीशी असलेल्या संबंधांचा तपास करणे गरजेचे’

‘कोरेगाव भीमा हिंसाचार घडविण्यासाठी मोठे षडयंत्र’, ‘कम्युनिस्ट पार्टीशी असलेल्या संबंधांचा तपास करणे गरजेचे’

Next

मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार घडवण्यासाठी मोठे षड्यंत्र रचण्यात आले होते आणि त्याचे फार गंभीर परिणाम झाले, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात प्रा. आनंद तेलतुंबडे यांना दिलासा देण्यास नकार देताना नोंदविले.

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर गुन्हा नोंदविला. मात्र अद्याप त्यांना अटक केलेली नाही. गुन्हा रद्द करण्यासाठी तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. बी. पी. धर्माधिकारी व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे होती. त्यांची याचिका फेटाळताना न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदविले.

आपल्याला नाहक या प्रकरणात गुंतविण्यात आले आहे. कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या घटनेवेळी आपण गोव्यात होतो. तसेच पोलिसांकडे आपल्याविरुद्ध सबळ पुरावे नाहीत, असा दावा तेलतुंबडे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मिहीर देसाई यांनी न्यायालयात केला. त्यावर सरकारी वकिलांनी न्यायालयात एक पत्र सादर केले. तसेच पोलिसांकडे तेलतुंबडे यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे असल्याचे न्यायालयाला सांगितले.
‘हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. फार मोठे षड्यंत्र रचण्यात आले होते. गुन्ह्याचे स्वरूप आणि गांभीर्य लक्षात घेता आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे,’ असे न्यायालयाने तेलतुंबडे यांची याचिका फेटाळताना म्हटले.

‘तेलतुंबडे हे सीपीआयचे सदस्य आहेत हे सिद्ध करण्यापलीकडेही तपास केला आहे. पोलिसांनी त्यांचा या प्रकरणातील सक्रिय सहभाग स्पष्ट करणारे पुरावे जमा केले,’ असेही न्यायालयाने म्हटले. सरकारी वकिलांनी एका आरोपीने लिहिलेल्या पत्रात आनंद तेलतुंबडे यांच्या नावाचा उल्लेख असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्याचा आधार घेत न्यायालयाने म्हटले की, पत्रात उल्लेख असलेला ‘आनंद’ किंवा ‘कॉ. आनंद’ आणि आनंद तेलतुंबडे एकच आहेत, हे पटवून देण्याइतपत पोलिसांकडे पुरावे आहेत. गेल्या महिन्यात पुणे पोलिसांनी कोरेगाव भीमाप्रकरणी १० आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले.

तपास यंत्रणेने केलेल्या तपासावर समाधान व्यक्त करताना न्यायालयाने म्हटले की, पुणे पोलिसांकडे तेलतुंबडे यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे असून त्यांनी केलेले आरोप तथ्यहीन नाहीत. सुरुवातीला हा तपास केवळ १ जानेवारी रोजी घडलेल्या घटनेपुरताच मर्यादित होता.
मात्र आता यामध्ये सहभागी असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या इतर कामांबद्दलही तपास करण्यात येणार आहे. त्यामुळे तेलतुंबडे यांचे बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टीशी काय संबंध आहेत, याचा तपास करण्याची आवश्यकता आहे,’ असे न्यायालयाने म्हटले.

Web Title:  'Big conspiracy to create violence in Koregaon,' should be investigated in connection with communist party '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.