मोदी सरकार विरोधात सिन्हा-पटोले यांच्यात खलबते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2017 10:01 PM2017-10-15T22:01:56+5:302017-10-15T22:02:22+5:30

सध्या भाजपापासून दुरावलेले खासदार नाना पटोले यांनी भाजपाचे ज्येष्ठ असंतुष्ट नेते यशवंत सिन्हा यांची रविवारी नागपूर विमानतळावर भेट घेतली.

Against the Modi government, Sinha-Patole | मोदी सरकार विरोधात सिन्हा-पटोले यांच्यात खलबते

मोदी सरकार विरोधात सिन्हा-पटोले यांच्यात खलबते

Next

नागपूर : सध्या भाजपापासून दुरावलेले खासदार नाना पटोले यांनी भाजपाचे ज्येष्ठ असंतुष्ट नेते यशवंत सिन्हा यांची रविवारी नागपूर विमानतळावर भेट घेतली. तब्बल दीड तासाच्या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर मंथन झाले. चर्चेत दोघांनीही सरकार विरोधात घेतलेल्या भूमिकेसाठी एकमेकांचे समर्थन केल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. या भेटीमुळे दिवाळीच्या तोंडावर पुन्हा केंद्र सरकारला फटाके लावण्याची मोहीम तीव्र होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

यशवंत सिन्हा यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अर्थनितीवर उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जेटली यांनी पलटवार केल्यावर सिन्हा यांनी त्यांना तेवढ्याच ताकदीने उत्तर दिले होते. या वादात सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंदद्र मोदी यांच्यावरही टीका केली होती. तर, खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी हे खासदारांचे ऐकूणच घेत नाही, त्यांना विरोधात बोललेले खपत नाही, असे उघड वक्तव्य करीत मोदी यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले होते. कृषी धोरणांबाबत मोदी सरकार गंभीर नाही, असा आरोप पटोले हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करीत आहेत. नाराज असलेल्या या दोन्ही नेत्यांची संघभूमी असलेल्या नागपुरात घेतलेल्या या भेटीमुळे भाजपाच्या गोटात वादळ उठले आहे.

यशवंत सिन्हा हे पत्नीसह अकोला येथील एक कार्यक्रम आटोपून दिल्ली येथे जाण्यासाठी सायंकाळी ६ च्या सुमारास नागपूर विमानतळावर आले. त्याच वेळी खासदार पटोले व जय जवान जय किसानचे संयोजक प्रशांत पवार तेथे पोहचले. या भेटीत नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी आंदोलन आदी विषयांवर चर्चा झाली. मी खासदार म्हणून सर्वप्रथम मोदींच्या कार्यशैलीवर आवाज उठविला, असे पटोले यांनी सांगताच ते पाहून इतर खासदारांची हिंमत वाढली असल्याचे सिन्ह यांनी सांगितले. चुकीच्या गोष्टींवर आपण बोललेच पाहिजे, असा सल्लाही सिन्हा यांनी दिली. पटोले म्हणाले, शेतकºयांच्या समस्या पंतप्रधान मोदी ऐकूणच घेत नाही. यवतमाळमध्ये कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतकरी व शेतकºयांचे मृत्यू झाले आहेत. हा मुद्दा आपण लावून धरला आहे. यासाठी खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला तरी तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. यावर सिन्हा यांनी त्यांचे समर्थन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सिन्हांपासून भाजपा नेते दूर -
सिन्हा अकोला येथून नागपूर विमानतळावर आले व विमानाने दिल्लीला रवाना झाले. मात्र, त्यांच्या स्वागतासाठी नागपुरातील भाजपाचे पदाधिकारी फिरकले नाहीत. याबाबत शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, सिन्हा यांचा हा खासगी दौरा असेल. पक्षाला याबाबत कुठलिही माहिती नव्हती.

Web Title: Against the Modi government, Sinha-Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.