फेसबुकवर अवतरणार ४४ हजार ग्रामपंचायती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 06:58 IST2019-05-04T03:47:35+5:302019-05-04T06:58:00+5:30
व्हिलेज बुक : विकासकामांची माहिती होणार अपडेट; नगर जिल्ह्यात राबविला प्रकल्प

फेसबुकवर अवतरणार ४४ हजार ग्रामपंचायती
साहेबराव नरसाळे
अहमदनगर : राज्यातील ४४ हजार ग्रामपंचायतींची माहिती लवकरच फेसबुक टाकली जाणार आहे. राज्य सरकारने व्हिलेज बुक ही संकल्पना हाती घेतली असून, सर्व ग्रामपंचायतींचे फेसबुक पेज तयार करण्यात येत आहेत़ व्हिलेज बुक शब्दापुढे गावाचे नाव टाकून प्रत्येक गाव, पंचायत समिती, जिल्हा परिषद असे प्रत्येकाचे स्वतंत्र फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे़ अहमदनगर जिल्ह्यातील १ हजार ३१३ ग्रामपंचायतींचे फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे़ त्यावर शासनाच्या योजना, गावातील विकास कामांची माहिती, प्रकल्प, रस्ते, ग्रामबैठका आदी माहिती अपलोड करण्यात येणार आहे़ सरकारने फेसबुककडे तांत्रिक मार्गदर्शन मागविले होते़ त्यानंतर व्हिलेज बुक संकल्पना हाती घेण्यात आली.
थेट संवादाची सुविधा
ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवक, तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे हे पेज चालविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यावरून अधिकाऱ्यांशी थेट संवादही साधता येणार आहे़ मुख्यमंत्री, मंत्रालयातील अधिकारीही या पेजचा वापर करुन थेट गावाशी संवाद साधू शकतील, अशी माहिती ‘आपले सरकार’ योजनेचे अहमदनगर जिल्हा समन्वयक विठ्ठल आव्हाड यांनी दिली़
तक्रारीही करा ऑनलाइन
फेसबुक पेजवरून नागरिकांना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे थेट तक्रारी, सूचना करता येतील. त्यांची दखल घेण्याचे निर्देशही सरकारने दिले.