वर्षभरात राज्यात १६ हजार ३३६ अर्भकांचा मृत्यू; मुंबईत सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 10:59 AM2019-05-06T10:59:08+5:302019-05-06T11:00:07+5:30

स्वच्छता, पोषणमूल्य व आरोग्य सुविधांचा अभाव

16 thousand 336 infant deaths in the 2018 19 Most in Mumbai | वर्षभरात राज्यात १६ हजार ३३६ अर्भकांचा मृत्यू; मुंबईत सर्वाधिक

वर्षभरात राज्यात १६ हजार ३३६ अर्भकांचा मृत्यू; मुंबईत सर्वाधिक

Next

- स्नेहा मोरे 

मुंबई : राज्यात अर्भकमृत्यूचे प्रमाण केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही मोठे असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, २०१८-१९ मध्ये राज्यात तब्बल १६ हजार ३३६ अर्भकांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात थोडी घट झाली आहे. २०१७-१८ मध्ये १७,२६५ अर्भकांच्या मृत्यूची नोंद झाली होती.

मुंबईत सर्वाधिक अर्भकांचा मृत्यू झाला आहे. मुंबई शहर उपनगरात तब्बल १ हजार ७६३ अर्भकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीही मुंबईत १ हजार ७९६ अर्भकांचे मृत्यू झाले होते. पाणी, स्वच्छता, पोषणमूल्य व प्राथमिक आरोग्य सुविधांच्या अभावामुळे हे मृत्यू होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान मोहिमेंतर्गत राज्यातील अर्भकमृत्यूदर १० पर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने २०१३ मध्येच निश्चित केले असले, तरी अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण अजूनही जास्तच आहे. राज्यातील २७ महापालिकांपैकी बहुतेक ठिकाणी नवजात शिशुंसाठी पुरेशी आरोग्य यंत्रणाच उपलब्ध नाही. परिणामी, अनेक महापालिकांमधील त्यातही मुंबईलगतच्या पाचही महापालिकांमधील नवजात अर्भके ही उपचारासाठी मुंबई महापालिकेच्या केईएम व शीव रुग्णालयात आणली जातात. मुंबई खालोखाल पुण्यात ९६० अर्भकांचे मृत्यू झाले आहेत, तर पुण्यानंतर सोलापूरमध्ये ८९२, नाशिकमध्ये ८५१ आणि सांगलीत ८४५ असे चित्र आहे.

गेल्या वर्षभरात ९.७ टक्के मृत्यू संसर्गामुळे तर १०.८ टक्के अर्भकमृत्यू हे श्वसनाच्या त्रासामुळे झाल्याची नोंद आहे. राज्यातील महापालिका क्षेत्रांमध्ये पुरेशी व्यवस्था नसल्यामुळेच, २०१५ ते १८ या तीन वर्षांत तब्बल ३१ हजार ३३४ अर्भकमृत्यूंची नोंद झाली. त्यात मुंबई महापालिका क्षेत्रात १४ हजार १३६ अर्भकांचा मृत्यू झाल्याची माहिती नागपूर येथील अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

अनेक नवजात अर्भकांना मातेचे दूध मिळत नाही. त्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती क्षीण होते व बालकांवर विषाणूंचा हल्ला होतो. श्वसनाचा संसर्ग हेदेखील नवजात अर्भकांच्या मृत्यूमागचे प्रमुख कारण आहे.
- डॉ. नयना भारद्वाज, बालरोगतज्ज्ञ

      अर्भकमृत्यूची आकडेवारी
वर्ष           २०१८-१९      २०१७-१८
मुंबई          १,७६३          १,७९६
पुणे              ९६०             ५३७
सोलापूर       ८९२             ८७२
नाशिक        ८५१            १,१४८
सांगली         ८४५             ६४२
अकोला       ८४१              ९३९
महाराष्ट्र    १६, ३३६       १७,२६५

Web Title: 16 thousand 336 infant deaths in the 2018 19 Most in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.