श्रेयवादाच्या विमानाचे ‘उडाण’ महाडिक-संभाजीराजे : पत्रकबाजी रंगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:54 IST2017-12-15T00:51:34+5:302017-12-15T00:54:27+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर विमानसेवा सुरू करण्यावरून खासदार धनंजय महाडिक व खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यात श्रेयवादाचे राजकारण चांगलेच रंगले आहे

Shreevada's flight 'Udan' Mahadik-Sambhajiaraje: The booklet played | श्रेयवादाच्या विमानाचे ‘उडाण’ महाडिक-संभाजीराजे : पत्रकबाजी रंगली

श्रेयवादाच्या विमानाचे ‘उडाण’ महाडिक-संभाजीराजे : पत्रकबाजी रंगली

ठळक मुद्दे दोन खासदारांमध्ये रंगलेला श्रेयवाद आगामी लोकसभेची चुरस दर्शविणारा समर्थकांकडून सोशल मीडियावर गुरुवारी व्यक्त

कोल्हापूर : कोल्हापूर विमानसेवा सुरू करण्यावरून खासदार धनंजय महाडिक व खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यात श्रेयवादाचे राजकारण चांगलेच रंगले आहे. विमानसेवा माझ्या प्रयत्नांमुळे सुरू झाल्याचे संभाजीराजे यांनी सगळ्यात अगोदर जाहीर केल्यानंतर आपणच हा प्रश्न सोडविला, अशी केविलवाणी धडपड संभाजीराजे यांनी करू नये, अशी प्रतिक्रिया महाडिक समर्थकांकडून सोशल मीडियावर गुरुवारी व्यक्त झाली. मुळात २४ डिसेंबरपासून विमानसेवा नक्की सुरू होईल का, त्याची वेळ पाहता कोल्हापूरकरांचा त्यास किती प्रतिसाद मिळतो याबद्दल साशंकताच जास्त असताना तोपर्यंत दोन खासदारांमध्ये रंगलेला श्रेयवाद आगामी लोकसभेची चुरस दर्शविणारा आहे.

खासदार संभाजीराजे ज्या पद्धतीने विविध विषयांमध्ये लक्ष घालून पाठपुरावा करू लागले आहेत ते पाहता ते भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढविणार आहेत की काय, अशीही शंका जाणकारांतून व्यक्त झाली. लोकसभेच्या सन २००९ च्या निवडणुकीत संभाजीराजे यांचा पराभव दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून झाला; परंतु मंडलिक यांना महाडिक गटाने ताकद दिल्यानेच आपल्या हाता-तोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावून घेतल्याची सल संभाजीराजे यांच्या मनात आहे. हा देखील एक पदर या दोघांतील राजकीय ईर्ष्येला आहे. त्यामुळे जिथे संधी मिळेल त्यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू आहे.

कोल्हापूरची विमानसेवा गेली सहा वर्षे बंद आहे. ही सेवा सुरू व्हावी यासाठी या दोन्ही खासदारांसह पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही तितकेच प्रयत्न केले आहेत हे कुणीच नाकारू शकणार नाही; परंतु आता मात्र माझ्यामुळेच ही सेवा सुरू होत आहे, असे चित्र रंगविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. निर्यातवृद्धी कार्यशाळेत मंगळवारीच संभाजीराजे यांनी विमानसेवा लवकरच सुरू होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे बुधवारी सकाळीच त्यांनी ही सेवा सुरू होत असल्याची माहिती सगळ्यात अगोदर ‘ब्रेक’ केली.

त्याच्या बातम्या सुरू झाल्यावर महाडिक यांची पहिली प्रतिक्रिया ‘एवढ्यात ही सेवा सुरू होणार नाही’ अशी होती; परंतु सायंकाळीही त्यांनी दोन पानांचे स्वतंत्र पत्रक प्रसिद्धीस देऊन आपण ही सेवा सुरू होण्यासाठी किती तारखेला, कुठे व कुणाला भेटलो, याचा ताळेबंदच जाहीर केला. सायंकाळी पालकमंत्री पाटील यांनीही त्यात उडी घेत त्यांनी यासाठी काय प्रयत्न केले, याची माहिती दिली. ‘ही विमानसेवा कधी सुरू होईल हे देवालाच माहीत,’ असेही वक्तव्य पालकमंत्र्यांनी गेल्याच महिन्यांत केले होते.

केविलवाणी धडपड
कोल्हापूरची विमानसेवा सुरू होण्याचे खरे शिल्पकार कोण, हे जाणकार जनतेला माहीत आहे. खासदार महाडिक यांनी गेल्या ३ वर्षांत पाठपुरावा केला, चारवेळा लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. अधिकाºयांच्या भेटीगाठी व बैठका घेतल्या. विमानतळ विकासाचा २७४ कोटींचा आराखडा मंजूर करून घेतला आणि जेव्हा प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होण्याची घोषणा झाली, तेव्हा मात्र अनेकांनी श्रेयवादासाठी केविलवाणी धडपड केली. राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत आपणच हा प्रश्न मार्गी लावला, असा दिखावा केला जात असल्याची टीका महाडिक समर्थकांकडून केली जात आहे.

Web Title: Shreevada's flight 'Udan' Mahadik-Sambhajiaraje: The booklet played

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.