कोल्हापूर : थकीत एफआरपीप्रकरणी ‘महाकाली’, ‘माणगंगा’ची मंगळवारी साखर आयुक्तांसमोर सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 17:49 IST2018-01-08T17:43:43+5:302018-01-08T17:49:57+5:30
कोल्हापूर विभागातील बारा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे विहीत वेळेत पैसे दिलेले नाहीत. त्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा लागू केल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील ‘माणगंगा’, ‘महाकाली’, ‘केन अॅग्रो’ या कारखान्यांची मंगळवारी आयुक्तांसमोर सुनावणी असल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

कोल्हापूर : थकीत एफआरपीप्रकरणी ‘महाकाली’, ‘माणगंगा’ची मंगळवारी साखर आयुक्तांसमोर सुनावणी
कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील बारा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे विहीत वेळेत पैसे दिलेले नाहीत. त्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा लागू केल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील ‘माणगंगा’, ‘महाकाली’, ‘केन अॅग्रो’ या कारखान्यांची मंगळवारी आयुक्तांसमोर सुनावणी असल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.
केंद्र सरकारच्या कायद्यानुसार शेतकऱ्यांचा ऊस गाळपास आल्यापासून चौदा दिवसांत एफआरपीप्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहेत. कोल्हापूर विभागातील साखर कारखाने साधारणत: ५ ते १० नोव्हेंबर या कालावधीत सुरू झाले.
कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे दिले की नाही याबाबत माहिती दर पंधरवड्याला साखर आयुक्त कार्यालयाकडून मागवली जाते. नोव्हेंबर २०१७ अखेर विभागातील नऊ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पैसे दिलेले नव्हते.
साखर आयुक्त कार्यालयाने त्यांना नोटिसा काढून त्यांची सुनावणी २ जानेवारीला घेण्यात आली. साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत शेतकऱ्यांची एफआरपी, कर्मचारी देणी यासह इतर देणी याबाबत माहिती घेण्यात आली.
संबंधित कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. ३१ डिसेंबरअखेर ज्यांनी एफआरपीप्रमाणे पैसे दिलेले नाहीत, त्यांना साखर आयुक्तांनी आज बोलाविले आहे.
यांची झाली सुनावणी :
उदयसिंह गायकवाड (अथणी शुगर्स), इंदिरा (अथणी शुगर्स), इको केन (चंदगड), केन अॅग्रो, महाकाली, निनाईदेवी, राजाराम बापू पाटील युनिट १, २ व ३.
यांची होणार सुनावणी :
केन अॅग्रो, महाकाली, माणगंगा.