कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी वकील, पक्षकारांना न्यायालयात जाण्यास रोखणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 01:14 AM2018-10-09T01:14:18+5:302018-10-09T01:16:46+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर सर्किट बेंचप्रश्नी सर्व वकील, पक्षकारांना येथील जिल्हा न्यायालयात जाण्यापासून रोखण्याचा निर्धार खंडपीठ नागरी कृती समितीच्या बैठकीत सोमवारी रात्री करण्यात आला. समितीचे निमंत्रक आर. के. पोवार अध्यक्षस्थानी होते.
या आंदोलनात कोल्हापूर महापालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवकही सहभागी होतील, असे महापौर शोभा बोंद्रे यांनी यावेळी सांगितले. सर्किट बेंचप्रश्नी भाजप-शिवसेना सरकार जनतेची फसवणूक करत असून, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याप्रश्नी लक्ष घालावे, अशा भावना यावेळी व्यक्त झाल्या. न्यायसंकुलमध्ये ही बैठक झाली.
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस म्हणाले, सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, शाहू महाराज यांच्यासमवेत बैठक झाली होती. त्यावेळी सर्किट बेंचच्या मूलभूत सुविधांसाठी ११०० कोटींची तरतूद करतो, सर्किट बेंचबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती यांना पत्र देतो, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते; पण त्यातील एकही मागणी त्यांनी पूर्ण केलेली नाही.
शोभा बोंद्रे म्हणाल्या, राज्यशासन याप्रश्नी दुजाभाव, वेळकाढूपणाचे धोरण अवलबंत आहे. सर्वांनी या लढ्यात सहभागी व्हावे. आर. के.पोवार म्हणाले, डिसेंबरपूर्वी उग्र आंदोलन करूया. पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊया.
माजी महापौर अॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, एकही वकील न्यायालयात जाणार नाही. ते तुमच्याबरोबर आंदोलनात सहभागी होतील. चंद्रकांत यादव म्हणाले, सरकारच्या हिताला बाधा आणली पाहिजे. प्रा. एन. डी. पाटील यांच्या समवेत बैठक होऊनही हे सरकार खोटे बोलत आहे.
आनंद माने म्हणाले, हे सरकार फसवे आहे. पुण्याच्या पगडीमुळे कोल्हापूर सर्किट बेंच होण्यास अडचणी येत आहेत. कोल्हापूर जिल्हा चेंबर्स आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, या आंदोलनात व्यापार, उद्योजक अग्रभागी सहभागी होतील. क्रीडाईचे अध्यक्ष महेश यादव म्हणाले, तुम्ही आंदोलन करा, आमचा पाठिंबा राहील.
यावेळी दीपा पाटील, दिलीप देसाई, पद्माकर कापसे, बाबा पार्टे, उदय लाड, सुभाष जाधव, पंडित कंदले, भगवान काटे, जयेश कदम, प्रसाद जाधव, सुनील सामंत, अशोक पोवार, किशोर घाटगे, बी. एल. बरगे, बाबूराव कदम, अॅड. पंडित सडोलीकर, आदींनी मनोगत व्यक्त केले. माजी अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे, उपाध्यक्ष अॅड. आनंदराव जाधव, अॅड. सुशांत गुडाळकर, अॅड. शिवाजीराव राणे, अॅड. अजित मोहित, प्राथमिक शिक्षण सभापती अशोक जाधव, सचिन तोडकर, सुहास साळोखे, चंद्रकांत बराले, आदी उपस्थित होते.