कोल्हापूर : पाटाकडील ‘ब ’ - दिलबहार ‘ब’ यांच्यातील लढत बरोबरीत, के.एस.ए.वरिष्ठ गट लीग फुटबॉल स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 19:04 IST2017-12-28T19:00:52+5:302017-12-28T19:04:31+5:30
के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल लीग स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ (ब) व दिलबहार तालीम मंडळ(ब) यांच्यात गुरुवारी झालेला अटीतटीचा सामना संपूर्ण वेळेत गोलशून्य बरोबरीत राहीला. दोन्ही संघांना समर्थकांचे पाठबळ मोठ्या प्रमाणात लाभल्याने सामन्यांत रंगत वाढली होती.

कोल्हापूरातील शाहू स्टेडियम येथे सुरु असलेल्या के. एस. ए.वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी दिलबहार(ब) व पाटाकडील(ब)यांच्यात झालेल्या लढतीत पाटाकडील(ब) च्या समीर पठाणने अशी बायसिकल किक मारली. (छाया : नसीर अत्तार)
कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ गट फुटबॉल लीग स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ (ब) व दिलबहार तालीम मंडळ(ब) यांच्यात गुरुवारी झालेला अटीतटीचा सामना संपूर्ण वेळेत गोलशून्य बरोबरीत राहीला.
शाहू स्टेडियमवर पाटाकडील (ब) व दिलबहार (ब) या दोन पारंपारिक संघात तिसऱ्या फेरीत गाठ पडली. यात प्रारंभापासून पाटाकडील(ब)कडून ओंकार देवणे, रोहीत पोवार, समीर पठाण, ऋषिकेश मोरे, सुनीत पाटील, शुभम मोहिते, तर दिलबहार(ब) कडून ओंकार शिंदे, प्रशांत आजरेकर, शंशाक माने, प्रतिक व्हनाळीकर यांनी आक्रमक व वेगवान खेळाचे प्रदर्शन पुर्वार्धात केले. पण त्यांना गोल करण्यात यश आले नाही.
पुुर्वार्धात पाटाकडील(ब)कडून ओंकार देवणेच्या पासवर रोहन कांबळेची,तर रोहन कांबळेची समीर पठाणच्या पासवर गोल करण्याची संधी गेली. दिलबहार(ब)कडून प्रशांत आजरेकरच्या पासवर रोहन पाटील, प्रतिक व्हनाळीकरच्या पासवर गोल करण्याची संधी गेली. अखेरच्या काही मिनिटांमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक व वेगवान चाली रचत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला.
पाटाकडील(ब)कडून ओंकार देवणेचा फटका गोलपोस्टला थडकून बाहेर गेला. तर समीर पठाणची गोल करण्याची नामी संधी गेली. दिलबहार(ब)कडून प्रशांत आजरेकरने डाव्या पायाने मारलेला फटका गोलपोस्टजवळून गेला.
दोन्ही संघांना समर्थकांचे पाठबळ मोठ्या प्रमाणात लाभल्याने सामन्यांत रंगत वाढली होती. अखेरपर्यंत दोन्ही संघांना पूर्णवेळेत गोल करता न आल्याने सामना अखेर गोलशून्य बरोबरीत राहीला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण बहाल करण्यात आला.
सामने
दु. २ वा. साईनाथ स्पोर्टस विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादीक वाघाची तालीम
दु. ४ वा. प्रॅक्टिस क्लब(अ) विरुद्ध खंडोबा(अ)