वृक्षारोपणातील चुका तत्काळ सुधारा : आयुक्तांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 01:11 IST2018-04-08T01:11:19+5:302018-04-08T01:11:19+5:30
कोल्हापूर : शहराच्या विविध भागातील हरितपट्ट्या केंद्र सरकार पुरस्कृत वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविताना वृक्षमित्र, मनपा अधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार यांच्या संयुक्त सहमतीद्वारेच यापुढे वृक्ष लागवड

वृक्षारोपणातील चुका तत्काळ सुधारा : आयुक्तांचा आदेश
कोल्हापूर : शहराच्या विविध भागातील हरितपट्ट्या केंद्र सरकार पुरस्कृत वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविताना वृक्षमित्र, मनपा अधिकारी, ठेकेदार आणि सल्लागार यांच्या संयुक्त सहमतीद्वारेच यापुढे वृक्ष लागवड करण्याचा निर्णय शनिवारी महानगरपालिका प्रशासनाने घेतला. आतापर्यंत करण्यात आलेल्या वृक्षारोपणात ज्या काही चुका झाल्या आहेत, त्या तत्काळ सुधाराव्यात तसेच वृक्षमित्रांच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करावा, अशा सूचना आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी संबंधितांना दिल्या.
कोल्हापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून मिळालेल्या निधीतून जे वृक्षारोपण केले जात आहे ते अशास्त्रीय पद्धतीने केले जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसात केले जात आहे या घटनेकडे ‘लोकमत’ने मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे आयुक्त अभिजित चौधरी यांनी शनिवारी दुपारी या योजनेतून केल्या जात असलेल्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजल्यापासून टेंबलाई टेकडी, टाकाळा, मंगेशकरनगर व त्रिमूर्ती कॉलनी साळोखेनगर येथे केलेल्या वृक्षारोपणाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.यावेळी आयुक्त चौधरी यांच्यासोबत जैवविविधता समितीचे सदस्य डॉ. मधुकर बाचुळकर, अनिल चौगले, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, प्रकल्प अधिकारी अनुराधा वांडरे, ठेकेदार निसर्ग लॅन्डस्केपचे अजय फडतडे, सल्लागार कंपनीचे नागेश देशपांडे व प्रिया देशपांडे होते. या सर्वांनी अडीच तासाहून अधिक काळ पाहणी केली. वृक्ष लागवड करताना काही चुका झाल्याचे या पाहणीवेळी स्पष्ट झाले.
चार ठिकाणी केलेल्या पाहणीवेळी काही ठिकाणी जवळजवळ झाडे लावली आहेत. मोठ्या झाडाखाली त्याच प्रकारची मोठी झाडे लावली गेली असल्याचे दिसून आले. यामुळे निकषांचे उल्लंघन झालेली सुमारे १५० ते २०० झाडांचे पुनर्ररोपण करावे लागणार आहे. मंगेशकरनगर परिसरात मनपाच्या जागेत सहा झोपड्यांचे अतिक्रमण झाले असून, त्या तेथून हटवून ही झाडे तेथे लावणार आहेत. मंगेशकरनगर येथे बेलाची झाडे मोठ्या प्रमाणात लावण्याच्या सूचना यावेळी सर्वांनी केल्या. त्यानुसार अंमलबजावणी केली जाणार आहे. यापुढे टाकाळा, रंकाळा, सह्याद्री कॉलनी-राजेंद्रनगर, फुलेवाडी, घाटगे कॉलनी अशा ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविताना जैवविविधता समिती सदस्य, मनपा अधिकारी, ठेकेदार, सल्लागार यांनी संयुक्तपणे वृक्षारोपणाचा आराखडा तयार करावा आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. केलेल्या नियोजनाप्रमाणे वृक्षलागवड केली जाते का, याची पाहणीही संयुक्तपणे केली जावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
योग्य झाडे, दर्जा चांगला
मनपा प्रशासनाने केलेल्या वृक्षारोपणात काही ठिकाणी त्रुटी दिसून आल्या असल्या तरी त्या दुरुस्त करण्यासारख्या आहेत. लागवड करण्यात आलेले वृक्ष योग्य आणि चांगल्या दर्जाचे आहेत. त्याची वाढसुद्धा चांगल्या पद्धतीने झालेली आहे. झाडे जगविण्याकरिता पाण्याचीही सोय ठेकेदाराने चांगली केली आहे, अशी माहिती जैवविविधता समितीचे सदस्य डॉ. मधुकर बाचूळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
ठिबक सिंचनची व्यवस्था
दाट वृक्षारोपण झाल्यानंतर लावलेले सर्व वृक्ष जगविण्याची एक वर्षाची जबाबदारी ठेकेदाराची आहे. त्यामुळे ठेकेदाराने स्वत:च्या खर्चातून सर्व ठिकाणी ठिबक सिंचन योजना कार्यान्वित केली आहे. ठेकेदारावर ऐंशी टक्के वृक्ष जगविली पाहिजेत असे बंधन आहे.
असा आहे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम
सन २०१५-१६ सालात २८०० मोठ्या वृक्षांपैकी १५०० वृक्ष लावले. उर्वरित वृक्ष लावण्यास जागा उपलब्ध झालेली नाही. २८०० शोभिवंत वृक्ष लावायचे असून, जागा उपलब्ध नसल्यामुळे काम अपूर्ण आहे.
सन २०१६-१७ सालात मंगेशकरनगरात १०००, टेंबलाई परिसरात ६०००, तर त्रिमूर्ती कॉलनी साळोखेनगर येथे
१९०० वृक्ष लावण्यात आले.
सन २०१७-१८ सालात दहा हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, जागेअभावी एकही वृक्ष लावण्यात आलेला नाही.
सन २०१८-१९ सालाकरिता अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याकरिता सह्याद्री कॉलनी राजेंद्रनगर, टाकाळा, रंकाळा, फुलेवाडी, घाटगे कॉलनी अशा जागा निश्चित केल्या आहेत. त्याठिकाणी वृक्ष लावले जातील.