आंबेडकरांच्या हयातीत उभारलेला देशातील पहिला पुतळा बिंदू चौकात
By Admin | Updated: December 5, 2014 23:29 IST2014-12-05T22:28:43+5:302014-12-05T23:29:41+5:30
महापरिनिर्वाणदिन विशेष : भाई माधवराव बागल यांचा पुढाकार

आंबेडकरांच्या हयातीत उभारलेला देशातील पहिला पुतळा बिंदू चौकात
संदीप खवळे - कोल्हापूर -दलित, श्रमिक आणि शोषितांच्या न्याय्य हक्कांसाठी हयातभर इथल्या सामाजिक व्यवस्थेविरुद्ध एकाकी लढणारे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन... ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि देशातील करोडो दलितांवर दु:खाचा डोंगर कोसळला. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारादरम्यान प्र. के. अत्रे यांनी त्यांना आदरांजली वाहताना एक वाक्य उच्चारले होते, ‘बाबांचा देह आता जळत आहे; पण त्यांना दलितांच्या हक्कांची लढाई लढताना आयुष्यभर जळावे लागले होते.’ डॉ. बाबासाहेबांच्या या लढाईत कोल्हापूरकरांनी मात्र त्यांना चांगली साथ दिली होती. राजर्षी शाहू महाराजांचे सहकार्य, माणगाव येथील अस्पृश्य परिषद आणि ऐतिहासिक बिंदू चौकात डॉ़ आंबेडकरांचा त्यांच्या हयातीत उभारण्यात आलेला पहिला अर्धाकृती पुतळा, अशी काही उदाहरणे सांगता येतील.
कोल्हापुरातील बिंंदू चौक येथे डॉ. बाबासाहेबांचा पुतळा ९ डिसेंबर १९४९ रोजी तत्कालीन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई माधवराव बागल यांच्या पुढाकाराने उभारण्यात आला होता. डॉ. बाबासाहेबांच्या हयातीत उभारण्यात आलेला हा भारतातील पहिलाच पुतळा आहे. बाळ चव्हाण या शिल्पकाराने बाबासाहेबांचा अर्धाकृती पुतळा तयार केला आहे़ तत्कालीन नगराध्यक्ष द़ मा़ साळोेखे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रतिमा समितीकडून नगरपालिकेस करवीर जनतेच्यावतीने तो प्रदान करण्यात आला़ तेव्हापासून जिल्ह्यातील तमाम आंबेडकरप्रेमींसाठी बिंदू चौक हे आदराचे आणि
शक्तीचे ठिकाण ठरले आहे़ बहुजन समाजाच्या चळवळीचे अनेक प्रबोधनपर कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले आहेत़
दरवर्षी जिल्ह्यातील विविध आंबेडकरप्रेमी संघटनांकडून येथे भीमगीते सादर करून महामानवाला वंदना दिली जाते़ यातील अनेक गीते स्थानिक कलाकारांनी तयार केलेली आहेत. डॉ़ आंबेडकरांचा जीवनपट डोळ्यांसमोर उभा करण्याची ताकद या गीतांमध्ये असते़
ऐतिहासिक असा हा बिंदू चौक जिल्ह्यातील तमाम दलित बांधवांसाठी एक ऊर्जेचे आणि पे्ररणेचे केंद्र ठरत आलेला आहे़ मराठवाड्यातील दलित बांधव जेव्हा कोल्हापुरात येतात, तेव्हा ते माणगाव आणि बिंदू चौक येथे आवर्जून भेट देतात अन् कोल्हापूरच्या पुरोगामी दृष्टीला सलाम करून जातात़