औरवाडमध्ये पारंपरिक गटांतच लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:54 PM2017-10-01T23:54:48+5:302017-10-01T23:54:48+5:30
अजित चंपुणावर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुबनाळ : औरवाड (ता. शिरोळ) येथील सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी खुले असल्याने इच्छुकांच्या भाऊगर्दीत बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेचे केवळ बुडबुडेच आहेत. नुकतीच झालेली जिल्हा परिषदेची निवडणूक, त्यानंतर जात पडताळणीकडे झालेली तक्रार यांची किनार निवडणुकीला लाभली आहे. ही निवडणूक पक्ष, गटा-तटापेक्षा व्यक्तिगत पातळीवर प्रतिष्ठेची व लक्षवेधी चुरशीची ठरत असून, दुरंगी लढतीची चिन्हे दिसत आहेत.
औरवाड येथील ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. सरपंच निवड थेट जनतेतून होणार असल्याने सत्तारूढ ग्रामपंचायत सदस्य दादेपाशा पटेल व विरोधी माजी उपसरपंच आशरफ पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या ग्रामपंचायतीवर जि. प. सदस्या परवीन पटेल यांची सत्ता आहे. मागील निवडणुकीत या गटाने ११ पैकी तीन बिनविरोधसह नऊ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले होते, तर विरोधी माजी उपसरपंच आशरफ पटेल गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते.
गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी गटाने विविध विकासकामांतून गावाचा कायापालट केला आहे. त्याचबरोबर दर १२ वर्षांनी येणाºया कन्यागत महापर्वकालात बहुतांश मुस्लिम सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत सरपंचपद पूनम शिंदे यांना देऊन हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविले. ही सत्ताधारी गटाची जमेची बाजू असल्याने निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.
तर विरोधी आघाडीप्रमुख उपसरपंच आशरफ पटेल यांनीही आपले बंधू दिवंगत माजी जि. प. सदस्य शौकत पटेल यांच्या पश्चात सहकारी संस्थेतील राजकारणासह समाजकारणातून आपल्या गटाला उभारी दिली आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्याची जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
दरम्यान, ग्रा. पं. सदस्य दादेपाशा पटेल यांनी आपला यशस्वी राजकीय श्रीगणेशा विरोधी आशरफ पटेल यांच्या बालेकिल्ल्यातील प्रभागातून निवडून येऊन केला.
त्यानंतर गेल्या पाच वर्षांत औरवाडचे राजकारण या दोघांभोवतीच केंद्रित झाले आहे. त्याचाच परिपाक म्हणजे नुकतीच पार पडलेली जिल्हा परिषदेची निवडणूक़ त्याचबरोबर जि. प. सदस्या परवीन पटेल यांच्याविरोधात आशरफ पटेल यांचे बंधू लायकअली पटेल यांनी जात पडताळणी कार्यालयाकडे जातीच्या दाखल्यासंदर्भात केलेली तक्रार होय.
या दोन्ही वेळा दादेपाशा पटेल यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे या दोघांमध्येच राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्याचे पडसाद या निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.
गावचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच या दोघांमधील शिगेला पोहोचलेला राजकीय संघर्ष कमी व्हावा, यासाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू होते. यामध्ये प्रामुख्याने विद्यमान सदस्य रामदास गावडे, प्रतापराव आगरे, जयवंत कोले, गोपाळ रावण, साबीर पटेल, बशीर पटेल, आदींचा समावेश होता.