मिरजेत फुटबॉल सामन्यात हाणामारी
By admin | Published: January 6, 2016 12:06 AM2016-01-06T00:06:49+5:302016-01-06T00:17:03+5:30
पोलिसांचा जमावावर लाठीमार
मिरज : मिरजेत सुरू असलेल्या फुटबॉल स्पर्धेत सोमवारी रात्री मिरजेतील संघांमधील टायब्रेकरवेळी दोन गटांत मारामारी झाली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत जमावाला पिटाळून लावले. फुटबॉल सामन्यातील मारामारीबाबत गांधी चौक पोलिसांत चौघांविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. मिरजेतील शिवाजी क्रीडांगणावर विद्युतझोतातील फुटबॉल स्पर्धेचा सोमवारी अंतिम सामना होता. मिरजेतील न्यू स्टार विरुद्ध सिटी क्लब संघांदरम्यान हा सामना झाला. अटीतटीच्या सामन्यात प्रेक्षकांनी दोन्ही स्थानिक संघांना जोरदार प्रोत्साहन दिले. मात्र, सामना बरोबरीत संपल्याने टायब्रेकरवर सामन्याचा निकाल झाला. टायब्रेकर सुरूअसताना काही प्रेक्षक मैदानात आल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जानीब मुश्रीफ व नदाफ गल्लीतील तरुणांत बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. यावेळी जानीब मुश्रीफ यांना मारहाण करण्यात आली. खा. संजय पाटील व्यासपीठावर उपस्थित असतानाच प्रेक्षकांत मारामारी सुरू झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत जमावाला पिटाळले. मारामारीच्या घटनेमुळे प्रेक्षकांची पळापळ झाली. मारहाणीचे वृत्त समजताच मुश्रीफ समर्थकांच्या जमावाने मैदानाकडे धाव घेतली. परंतु, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्यासह पोलीस पथकाने त्यांना रोखले. दोन दिवसांपूर्वी प्रेक्षकांत मारामारी व पंचांना मारहाणीचा प्रकार घडला होता. मारहाणीबाबत जानीब मुश्रीफ यांनी गांधी चौक पोलिसांत तक्रार दिली आहे. जमीर नदाफ, कमाल नदाफ, इम्रान नदाफ, आयुब नदाफ (रा. नदाफ गल्ली) यांनी काठ्या व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)