उजळाईवाडीत कोट्यवधींचा गुटखा जप्त- महामार्ग पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 01:07 AM2019-03-12T01:07:52+5:302019-03-12T01:08:27+5:30
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याहून हैदराबादकडे जाणाऱ्या दोन ट्रकमधून उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचा पानमसाला ( गुटखा ) जप्त केला. या ट्रकमध्ये
उचगाव : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याहून हैदराबादकडे जाणाऱ्या दोन ट्रकमधून उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचा पानमसाला ( गुटखा ) जप्त केला. या ट्रकमध्ये हिरा पान मसाल्याने भरलेली २५० पोती सापडली. ही कारवाई सोमवारी सकाळी ८.१५ वाजता उजळाईवाडी येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन ट्रकसह सलमान अमितखान (वय २५, रा. अहमदनगर) व परवेज अजीज उल्ला खान (४०, रा. औरंगाबाद) यांना ताब्यात घेतले आहे.
उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या समोर ट्रक (क्र. एमएच ११ ए ५५०५ व एमएच २१ एक्स ७७४०) याचे चालक सलमान अमितखान (वय २५, रा. अहमदनगर) व परवेज अजीज उल्ला खान (४०, रा. औरंगाबाद) यांचा संशय आल्याने महामार्ग पोलिसानी त्यांची चौकशी केली. त्यावेळी दोन्ही ट्रकमध्ये हिरा पान मसाला नावाच्या गुटख्याची २५0 ते ३00 पोती सापडली.
याबाबत ट्रॅफिक पोलिसांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज खाडे यांना कल्पना देत दोन ट्रक व चालकांना ताब्यात घेतले आहे. याबरोबर अन्न भेसळ प्रतिबंध खात्याच्या अधिकाऱ्यांनाही या कारवाईची कल्पना देण्यात आली. या पान मसाल्याची अंदाजे किमत पावणे दोन कोटी असल्याचा अंदाज आहे. या कारवाईमध्ये महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पोवार, सपोनि जगन्नाथ जानकर, सहा. फौजदार शंकर कोळी, पोलीस हवालदार संदीप पाटील, तात्यासाहेब मुंढे, रवींद्र नुल्ले, प्रकाश कदम, शहाजी पाटील, योगेश कारंडे, अभिजित चव्हाण, तौसिफ मुल्ला, आशिष कोळेकर, रामदास मेंटकर यांनी सहभाग घेतला.
चालकांकडून उडवाउडवीची उत्तरे...
पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतल्यानंतर चालकांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. चालक हे ट्रक घेऊन साताºयाहून हैदराबादकडे निघाले होते; पण प्रत्यक्षात ट्रक हे उचगाव ब्रीज खालून हुपरी रोडकडे जाणार होते असे एका ट्रकचालकाने सांगितले.
दुसरा चालक म्हणत होता की, आम्ही लक्ष्मी टेकडी कागलकडून आलो आहोत. मग लक्ष्मी टेकडीकडून येणारी वाहने पुण्याकडे जाणार. ट्रक नेमके कोठून कोठे चालले होते याची माहिती ट्रकचालक लपवण्याचा प्रयत्न करत होते.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उजळाईवाडी येथे महामार्ग पोलिसांनी दोन ट्रकमधून पावणे दोन कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला. सपोनि अविनाश पोवार, सपोनि युवराज खाडे, अन्न व औषध प्रशासनचे आर. पी. पाटीलसह त्यांच्या सहकाºयांनी सोमवारी ही कारवाई केली.