‘ते’ कमी वजनाचे गॅस सिलेंडर पोहोचवायचे घरोघरी अवैधरित्या गॅस काढून कमर्शियल सिलेंडरममध्ये

By प्रशांत माने | Published: April 12, 2024 07:41 PM2024-04-12T19:41:52+5:302024-04-12T19:42:11+5:30

भरून विक्री करणारे रॅकेट उध्वस्त

'They' used to deliver light weight gas cylinders door to door illegally extracting gas in commercial cylinders | ‘ते’ कमी वजनाचे गॅस सिलेंडर पोहोचवायचे घरोघरी अवैधरित्या गॅस काढून कमर्शियल सिलेंडरममध्ये

‘ते’ कमी वजनाचे गॅस सिलेंडर पोहोचवायचे घरोघरी अवैधरित्या गॅस काढून कमर्शियल सिलेंडरममध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली: भारत गॅसच्या घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या गॅस काढून तो कमर्शियल गॅस सिलेंडरमध्ये भरून कमी वजनाचे गॅस सिलेंडर ग्राहकांना वितरीत करणारे रॅकेट मानपाडा पोलिसांनी उध्वस्त केले आहे. याप्रकरणी गॅस घरोघरी पोहोचविणा-या दोन डिलिव्हरी बॉयसह अन्य एकाला पोलिसांनी अटक करून चार लाख ६७ हजार ५८५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सुरज कदम (वय ३०) रा. चिकणघर कल्याण पश्चिम, पप्पु मिश्रा ( वय ३२ ) रा. टाटा नाका पिसवली गाव कल्याण पूर्व आणि उत्तम बनकर (वय ५५ ) रा. आनंदनगर, कल्याण पूर्व अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पप्पु आणि उत्तम हे दोघे डिलिव्हरी बॉय असून सुरज हा त्यांच्याकडून घरगुती गॅस सिलेंडर घ्यायचा आणि त्यातील दोन किलो गॅस काढून तो कमर्शियल गॅसमध्ये भरून त्याची विक्री करायचा. तर डिलिव्हरी बॉय हे कमी वजनाचे गॅस सिलेंडर ग्राहकांना पोहोचवायचे. गुप्त बातमीदारामार्फत ही माहिती मानपाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत आंधळे यांना मिळाली. त्यांच्या पथकाने वरीष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने मार्गदर्शनाखाली कल्याण शिळफाटा रोडवरील विको नाका येथे सापळा लावला आणि सिलेंडर वाहतूक करणारा टेम्पो पकडला. यात इलेक्ट्रीक वजन काटा यासह घरगुती ३५ व कमर्शियल ९ असे एकूण ४४ गॅस सिलेंडर असा एकुण ४ लाख ६७ हजार ५८५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तासाभरात प्रत्येक सिलेंडरमधून गॅस काढला जायचा

उत्तम आणि पप्पु हे दोघेजण घरगुती ग्राहकांना गॅस सिलेंडर वितरीत करण्यासाठी सकाळीच निघायचे. तेव्हा त्यांना सुजय भेटायचा आणि त्यांच्याकडून काही सिलेंडर ताब्यात घ्यायचा. त्यातील दोन किलो गॅस कमर्शियल सिलेंडरमध्ये काढून तासाभरात सुजय कमी वजन झालेले सिलेंडर दोघांना परत करायचे.

ग्राहकांनी सिलेंडरचे वजन तपासून घ्यावे

घरगुती सिलेंडरवर वजनाचा उल्लेख केलेला असतो त्यामुळे डिलिव्हरी बॉय घरी सिलेंडर घेऊन आल्यास त्याचे वजन करून ते बरोबर आहे का याबाबत खात्री करून घ्यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: 'They' used to deliver light weight gas cylinders door to door illegally extracting gas in commercial cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.