केडीएमसी कर्मचाऱ्यांना 15 हजार सानुग्रह अनुदान जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 07:18 PM2021-10-27T19:18:58+5:302021-10-27T19:20:38+5:30
Kalyan News : महिन्याच्या पगारात महागाई भत्त्याचा फरक 11 टक्के रोखीने देण्यात येणार आहे.
कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळीसाठी 15,000 हजार सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आल्याने कर्मचारी वर्गात आनंदाचे व समाधानाचे वातावरण पसरले आहे.
गतवर्षी कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी 15 हजार सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यावर्षी महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. त्याचप्रमाणे या महिन्याच्या पगारात महागाई भत्त्याचा फरक 11 टक्के रोखीने देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता आयुक्त सूर्यवंशी यांनी यावर्षी वर्ग एक आणि वर्ग 2 चे अधिकारी वर्ग वगळून वर्ग-3 आणि वर्ग-4 कर्मचारी वर्गासाठी रुपये 15000 सानुग्रह अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे . या सानुग्रह अनुदानाचा लाभ महापालिकेतील व शिक्षण मंडळातील सुमारे 5 हजार 342 स्थायी, अस्थायी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना होणार आहे.